मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आणि ती हिंदु धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांच्या माध्यमातून सनातन वैदिक हिंदु धर्म आणि संस्कृती वर्षानुवर्षे टिकून आहे. पूर्वी मंदिरे १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे माध्यम होती. मंदिरांच्या माध्यमातून भक्त आणि भाविक यांना चैतन्याच्या अखंड स्रोताचा लाभ होत असतो. मंदिरांच्या माध्यमातून हिंदु धर्मातील रूढी, प्रथा, परंपरा यांचे जतन होते आणि धर्माचरण अन् धर्मपालन करण्यास प्रोत्साहन मिळून आचार आणि विचार यांची शुद्धी होते. ज्याप्रमाणे आपल्या घरात देवघराला महत्त्वाचे स्थान असते, तेच स्थान समाजामध्ये मंदिरांचे आहे. मंदिरे समाजाचे संघटन आणि सुसंस्कृत समाजनिर्मिती यांचे प्रभावी माध्यम आहेत. हिंदूंचे राजे आणि महाराजे यांनी मंदिरांचे महत्त्व ओळखले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच पूर्वीचे अनेक राजे, महाराजे यांनी मंदिरांची निर्मिती, त्यांचा जीर्णोद्धार, त्यांची व्यवस्था आणि त्यांचे व्यवस्थापन यांसाठी अतुलनीय कार्य केले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज यांच्या दृष्टीने मंदिरांचे असलेले महत्त्व पहाता मंदिराचे विश्वस्त होणे, ही पुष्कळ मोठी भाग्याची गोष्ट आहे. मंदिरांचे विश्वस्त हे देवतांचे एकप्रकारे प्रतिनिधीच असतात !
– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ.
विश्वस्तांनी मंदिराच्या परंपरांचे पालन तंतोतंत होते ना ?, हे पहाणे आवश्यक !

मंदिरांमुळे हिंदु धर्मातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांचे जतन होते. मंदिरांमुळे धर्माचरण आणि धर्मपालन करण्यास प्रोत्साहन मिळून हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण होत असल्याने मंदिरांमध्ये पिढ्यान्पिढ्या चालू असलेल्या रूढी, प्रथा आणि परंपरा या तशाच चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विश्वस्त मंदिरातील परंपरांचे तंतोतंत पालन व्हावे, हे कटाक्षाने पहाणारे असावेत. सनातनी श्रद्धाळू ‘हिंदू’च देवाची सेवा मनोभावे करू शकतो.
मंदिराची सुरक्षाव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी विश्वस्तांनी करायचे प्रयत्न

१. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही छायाचित्रक (कॅमेरे) बसवणे
२. आपत्कालीन साहाय्यासाठी स्थानिकांची संपर्क यंत्रणा सिद्ध करणे, स्थानिक ग्रामस्थांशी सलोख्याचे संबंध ठेवणे
३. आवश्यक संख्येने सुरक्षारक्षक नेमणे
४. आपत्कालीन साहाय्यासाठी संपर्क क्रमांक सर्वांना दिसेल, अशा पद्धतीने लावणे
मंदिर विश्वस्त हा देवतेचा प्रतिनिधी असल्याने त्यांचे आचरण शुद्ध हवे !
मंदिराचा विश्वस्त हा एकप्रकारे देवतेचा प्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी त्यांचे आचरण शुद्ध आणि पवित्र ठेवणे आवश्यक आहे. त्यांचे आचार, विचार आणि उच्चार शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्मचारी, विश्वस्त किंवा कोणताही पदाधिकारी अहिंदु नसावा.
मंदिराचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणे

अ. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे मंदिराची व्यवस्था उत्तम चालू रहावी, यासाठी मंदिरांना दानपत्र द्यायचे, निधी द्यायचे, भूमी दान करायचे; जेणेकरून उत्पन्नाचा स्रोत प्राप्त होऊन मंदिराची दिवाबत्तीची सोय व्हायची. उत्सवांचे नियोजन करता यायचे. आता ती स्थिती राहिली नाही. मंदिरांना दान देण्याऐवजी आता सरकारेच मंदिरे कह्यात घेऊ लागली आहेत.
आ. मंदिरांची व्यवस्था वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या योग्य प्रकारे चालू रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करणे, उदा. देवाला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून उदबत्ती सिद्ध करणे, नारळांपासून तेल काढणे, मंदिरांच्या भूमीमध्ये आयुर्वेदाची झाडे लावणे इत्यादी.
मंदिरांचे पावित्र्य, चैतन्य टिकवण्यासाठी विश्वस्तांनी करावयाचे प्रयत्न !

अ. मंदिराचा आतील भाग आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे
१. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्याची व्यवस्था, तसेच चप्पल व्यवस्था करणे
२. मंदिरांमधील भंग पावलेल्या मूर्तीच्या ठिकाणी नवीन मूर्ती बसवणे (प्राणप्रतिष्ठा करणे)
३. सात्त्विक वेशभूषा करून मंदिरात येण्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी ‘वस्त्रसंहिते’चे (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावलीचे) फलक लावणे
४. मंदिराची रंगरंगोटी करणे, खराब झालेल्या वास्तूची दुरुस्ती करणे
५. मंदिराचा (शक्य असल्यास किमान १ कि.मी.चा) परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ होण्यासाठी प्रयत्न करणे
६. मंदिराच्या परिसरात असात्त्विक कार्यक्रम किंवा पावित्र्य भंग होईल, असे कार्यक्रम आयोजित होणार नाहीत, याची दक्षता घेणे
७. मंदिरात मूर्तीपूजा न मानणारे आणि देवतांची टिंगल करणारे यांना प्रवेश वर्ज्य करणे
८. आवश्यक असल्यास मंदिराचा जीर्णोद्धार करणे
आ. नियमितचे धार्मिक उपचार करणे : मंदिरामध्ये नियमित धार्मिक विधी, उपचार करणे उदा. नियमित पूजा, अभिषेक होणे, यज्ञ-याग करणे, मंदिरामध्ये नियमित आरती करणे, मंदिरामध्ये देवतेचा नामजप अथवा मंत्रजप अखंड लावून ठेवणे.
इ. मंदिरामध्ये उत्सव साजरे करणे, तसेच उत्सवांमध्ये धार्मिक विधी, यज्ञयाग, अनुष्ठान आदींसह राष्ट्र आणि धर्म यांना पूरक असणारे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम ठेवणे.
मंदिराच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे

१. मंदिरात धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलक लावणे, उदा. देवळात दर्शन कसे घ्यावे ?, आरती कशी करावी ?, देवीची ओटी कशी भरावी ? इत्यादी.
२. मंदिरात येणारे भाविक आणि भक्त यांना धार्मिक अन् आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून देणे, त्यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवणे
३. उत्सवांच्या वेळी कीर्तन, प्रवचन, स्तोत्रपठण स्पर्धा, ऐतिहासिक, पौराणिक नाटके इत्यादी कार्यक्रम ठेवणे
४. उन्नत संत, साधू यांचे प्रवचन आणि मार्गदर्शन आयोजित करणे
५. वैदिक शिक्षण देणारे वर्ग चालू करणे
६. धर्मशिक्षणवर्ग चालू करणे
मंदिराचे व्यवस्थापन उत्तम ठेवण्यासाठी विश्वस्तांनी करावयाचे प्रयत्न

१. मंदिरामध्ये येणारे भाविक, तसेच भक्त यांना योग्य प्रकारे दर्शन घेता यावे, यासाठी चांगली प्रकाशव्यवस्था ठेवणे
२. उत्सवांच्या वेळी, तसेच देवतेच्या दर्शनासाठी विशिष्ट वारी येणारे भाविक, भक्त यांना योग्य तर्हेने दर्शन मिळावे, यासाठी रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था करणे
३. मूर्तीचे दर्शन घेतांना दर्शन घेतल्याचे समाधान होण्यासाठी भाविक आणि भक्त यांना होईल, एवढा पुरेसा वेळ देणे
४. मंदिरात दर्शन कसे घ्यावे ?, प्रदक्षिणा कशा घालाव्यात ?, मंदिराचे पावित्र्य कसे जपावे ? इत्यादींची माहिती देणारे, तसेच मंदिराचा इतिहास आणि महत्त्व सांगणारे फलक मंदिरात अथवा मंदिराच्या परिसरात लावणे
५. निर्व्यसनी, आस्तिक, भक्त, प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाचे सुरक्षारक्षक, हिशोबनीस, सेवकवर्ग, कर्मचारी आदींची नेमणूक पारखून करणे
६. मंदिरांचे अन्य विश्वस्त, सदस्य, पुजारी, मानकरी, सेवकवर्ग, कर्मचारी यांच्यामध्ये चांगला समन्वय राहील, यासाठी प्रयत्न करणे
७. मंदिरांचे अन्य विश्वस्त, सदस्य, पुजारी, हिशोबनीस, मानकरी, सेवकवर्ग, कर्मचारी, विधी सल्लागार यांची नियमित बैठक घेऊन त्यात मंदिराचे व्यवस्थापन अधिक चांगले कसे होईल ?, उत्सवांचे नियोजन, आलेल्या अडचणी इत्यादींविषयी चर्चा आाणि उपाययोजना करणे
८. मंदिराचा लेखाजोखा चोख ठेवावा, उदा. देणगी पावती, अभिषेक पावती व्यवस्था इत्यादी.
९. मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. मंदिराचे उत्पन्न आणि खर्च यांचा अचूक हिशोब ठेवणे आणि भक्तांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे.
१०. मंदिरात येणारे भाविक आणि भक्त यांना मंदिरात परत यावेसे वाटेल, अशा तर्हेने सर्वांचे वर्तन असावे. नम्रता आणि सेवाभाव असावा. भक्तांचा आदर करणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी कर्तव्य समजून करावे.
११. आवश्यकतेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. मंदिराच्या नियमित लेखाजोखाची माहिती ‘डिस्प्ले बोर्ड’वरून (‘दर्शनी भागातील फलका’वरून) देणे, संगणकीय ‘ई.आर्.पी. प्रणाली’चा वापर करणे, तसेच मंदिराचे स्वतंत्र संकेतस्थळ सिद्ध करून त्यावर मंदिराचा इतिहास, स्थापना, महत्त्व, मंदिराचा नकाशा, येण्या-जाण्याचा मार्ग, नियमित होणारे धार्मिक विधी, उत्सव इत्यादी माहिती उपलब्ध करून देणे, भाविकांना देणगी देणे सोयीचे व्हावे, वेळेची बचत व्हावी, यांसाठी ‘क्यू.आर्. कोड’ (ऑनलाईन पैसे हस्तांतर करण्यासाठीची सांकेतिक आकृती) उपलब्ध करणे
१२. प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी अथवा बाहेरगावचे जे भाविक मंदिरात धार्मिक विधी, पूजा, अभिषेक करण्यासाठी पैसे देतात किंवा पाठवतात, त्या प्रत्येकाला प्रसाद, विभूती पाठवली जात आहे ना ? याचा आढावा घेणे
१३. मंदिरात येणारे भाविक आणि भक्त जे अर्पण करतात, त्याचा विनियोग योग्य प्रकारे होत आहे ना ?, याचा आढावा घेणे
१४. मंदिराला मिळालेले दान, दागिने, भूमी यांचे योग्य प्रकारे जतन होत आहे ना ?, हे पहाणे
१५. मंदिराचे अन्य विश्वस्त, मंदिरे यांना भेटून पंचक्रोशीतील, परिसरातील मंदिरांच्या विश्वस्तांची एकत्रित बैठक आयोजित करणे; एकमेकांच्या मंदिरातील चांगल्या पद्धती, उपक्रम यांचे आदानप्रदान करणे, त्या स्वतःच्या मंदिरात राबवणे
१६. मंदिरासाठी शासनाने लागू केलेल्या योजनांचा अभ्यास करणे आणि स्वतःच्या मंदिराला त्याचा लाभ करून देणे
१७. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे
१८. कर्मचारी, सुरक्षारक्षक, सेवेकरी आदींशी प्रेमाने वागणे, बोलणे, त्यांना प्रोत्साहन देणे
मंदिर विश्वस्त म्हणून कर्तव्य पार पाडतांना सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचे जतन अन् संवर्धन होईल, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी मंदिरातील अधिष्ठित देवतेला प्रार्थनाही करायला हवी.
– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?