‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

सनातनच्या ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदी पाटील यांच्या देहत्यागानंतरचा १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने...

सनातनच्या ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांनी २५.५.२०२६ या दिवशी सायंकाळी ५.०९ वाजता त्यांची नात सौ. दीपा म्हात्रे यांच्या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील निवासस्थानी देहत्याग केला.

२५.५.२०२६ या दिवशी दुपारी ३.३० वाजता सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या पू. पाटीलआजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. संतांचा देहत्याग हा मायेतील मृत्यूसारखा दुःखद नसून तो एक चैतन्यमय सोहळा असतो. पू. पाटीलआजींची आध्यात्मिक स्थिती अत्युच्च होती. त्यांच्या प्राणोत्क्रमणाच्या वेळी तेथील वातावरण दैवी झाले होते. पू. आजींच्या देहत्यागाच्या वेळच्या दैवी घडामोडी आणि उच्च आध्यात्मिक स्थिती सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांनी अनुभवली. त्या दैवी घडामोडी आणि अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी

१. पू. आनंदी पाटीलआजी यांच्या देहत्यागापूर्वी जाणवलेली सूत्रे

१ अ. आहार न्यून होत जाणे आणि शेवटच्या २ दिवसांत काहीही ग्रहण न करणे : ‘एप्रिल २०२६ पासून पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी यांची प्रकृती ठीक नव्हती. त्या त्यांची नात सौ. दीपा म्हात्रे यांच्या घरी निवासाला होत्या. शेवटच्या २ मासांत त्या भाताची पेज आणि पाणी, एवढाच आहार घेत असत. त्या कुणाशी फारशा बोलत नसत. पू. आजी हातानेच खुणा करून कुटुंबियांना आहाराविषयी सांगत असत. एप्रिल आणि मे मासाचा पहिला पंधरवडा, या कालावधीत त्या दिवसातून साधारण ५ – ६ वेळा पेज आणि पाणी घेत असत. नंतरच्या दिवसांत मात्र त्या एखादाच चमचा थोडेफार पेय घेत असत. देहत्यागाच्या आधी २ दिवस त्यांनी नातीला हातानेच खूण करून ‘मला काहीच आहार नको’, असे सांगितले. पू. आजींनी ‘नको’ सांगितले, तरी कुटुंबियांना प्रेमापोटी वाटत असे की, त्यांनी थोडेफार तरी पेय घ्यायला पाहिजे. त्यामुळे कुटुंबीय पू. आजींना थोडे पेय किंवा पाणी पाजण्याचा प्रयत्न करत असत. तेव्हा ते सर्व त्यांच्या तोंडावाटे बाहेर येत असे.

१ आ. ‘पू. आजी ध्यानावस्थेत आहेत’, असे कुटुंबियांना जाणवणे आणि ‘त्यामुळेच शेवटचे २ दिवस त्या आहार घेत नव्हत्या’, असे लक्षात येणे : पू. आजींनी सर्व कुटुंबाला अत्यंत प्रेमाने जोडून ठेवले होते. त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांना वाटत होते, ‘त्या काहीच आहार घेत नाहीत, तर त्यांना असेच कसे घरी ठेवायचे ? रुग्णालयात भरती करून ‘सलाईन’ लावले पाहिजे.’ त्यांच्या साधना करणार्‍या कुटुंबियांना मात्र ‘पू. आजींची स्थिती वैशिष्ट्यपूर्ण आणि आध्यात्मिक आहे’, हे जाणवले होते. त्याविषयी त्यांनी आम्हाला कळवले, ‘‘पू. आजी ध्यानावस्थेत किंवा गाढ निद्रेत आहेत’, असे जाणवत आहे.’’ तेव्हा ‘त्यामुळेच शेवटचे २ दिवस त्या कोणताच आहार ग्रहण करत नव्हत्या’, असे आमच्या लक्षात आले.

सद्गुरु अनुराधा वाडेकर

२. पू. आजींच्या शेवटच्या भेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

अ. आम्ही २५.५.२०२६ या दिवशी दुपारी ३.३० वाजता पू. आजी जेथे निवासाला होत्या तेथे, म्हणजे सौ. दीपा म्हात्रे यांच्या घरी पोचलो. त्या वेळी ‘आम्ही एखाद्या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करत आहोत’, असे आम्हाला वाटले. आम्ही त्यांचा हात हातात घेतला. आम्ही काही बोललो नाही, केवळ त्यांची स्थिती अनुभवत होतो.

आ. पू. आजींच्या चेहर्‍याकडे पाहिले असता ‘त्यांची स्थिती अत्यंत आनंदाची आहे’, असे आम्हाला जाणवले.

इ. पू. आजींच्या सहवासात आम्हाला पुष्कळ तेज आणि प्रकाश जाणवत होता.

ई. पू. आजींचे छायाचित्र काढून ते आम्ही सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांना पाठवले. त्यावर सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले, ‘‘पू. आजींची आध्यात्मिक स्थिती अनुभवण्यासाठी त्यांचे प्रत्येक घंट्याला छायाचित्र काढूया. आता त्यांच्या इच्छेने त्या देह ठेवतील.’’

उ. पू. आजींच्या सहवासात आम्हाला इतक्या उच्च आध्यात्मिक अनुभूती येत होत्या की, त्या शब्दांत सांगणे कठीण आहे. त्यांच्या सहवासात एक-दीड घंटाही काही क्षणांसारखाच वाटत होता.

पू. (सौ.) संगीता जाधव

३. पू. आजींचा वैशिष्ट्यपूर्ण देहत्याग ! 

श्री राजमातंगी महायज्ञाच्या निमित्ताने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मुंबईत आल्या होत्या. त्यांनी सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्यांशांवर केलेल्या अभिषेकाचे तीर्थ मला (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना) दिले होते. पू. आजींकडे जातांना मला (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना) प्रकर्षाने वाटले की, ते तीर्थ समवेत घेतले पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही ते तीर्थ घेऊनच पू. आजींकडे गेलो. मी (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी) वाटीतून चमच्याने ते तीर्थ पू. आजींना पाजले. त्यांनी ते सगळे ग्रहण केले. त्या वेळी कुटुंबियांनाही आश्चर्य वाटले; कारण त्या आधी २ दिवस पू. आजींनी काहीच ग्रहण केले नव्हते. तीर्थ ग्रहण केल्यानंतर एक-दीड घंट्याने पू. आजी ध्यानातून बाहेर आल्या. त्यांनी थोडी हालचाल केली आणि पुटपुटत थोडा नामजप केला. त्यानंतर १५ मिनिटांनी त्यांनी दोन जांभया दिल्या. त्या वेळी मी (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी) पू. आजींचा हात हातात घेतला होता. त्यांची नात त्यांच्या छातीवरून हळूवारपणे हात फिरवत होती. त्या वेळी पू. आजींच्या नाडीचे ठोके शांत शांत होत गेले. अशा प्रकारे पू. आजींनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने देह ठेवला.

४. पू. आजींच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

४ अ. ज्या वेळी पू. आजींचे प्राणोत्क्रमण झाले, त्या वेळी वातावरणात शांतता होती.

४ आ. पू. आजींच्या सभोवती प्रचंड तेज होते. सर्वत्र लख्ख प्रकाश पडला होता.

४ इ. ‘तिथे कितीतरी देवता उपस्थित आहेत’, असे आम्हाला वाटत होते.

४ ई. ‘त्यांच्या घरात सूक्ष्मातून दिव्यात्म्यांची दाटी झाली आहे. पूर्ण खोली देवता आणि दिव्यात्मे यांनी भरली आहे’, असे आम्हाला जाणवत होते.

४ उ. वातावरण मंगलमय होऊन आनंदामध्ये पुष्कळ वाढ होणे : पू. आजींच्या देहत्यागाचे क्षण अत्यंत मंगलमय होते. ‘पुष्कळ मोठा सोहळा चालू आहे’, असे वाटत होते. जेव्हा पू. आजींनी देह ठेवला, तेव्हा प्रकाशात पुष्कळ वाढ झाली. पू. आजींचे कुटुंबीय साधक आहेत. त्यांच्याही आनंदात वाढ झाली होती. आनंदामध्ये इतक्या पटींनी वाढ झाली होती की, त्या स्थितीचे वर्णन शब्दांत करू शकत नाही. अशी स्थिती सूक्ष्मातून तर अनुभवू शकतो; पण असे वातावरण स्थुलातून कुठेही पहायला मिळणार नाही. इतके सुंदर वातावरण आम्हाला स्थूल डोळ्यांनी पहायला मिळाले. कोणालाही हेवा वाटेल, असा मृत्यू पू. आजींना आला.

४ ऊ. पू. आजींच्या अंत्यदर्शनाच्या वेळी साधकांना उच्च आध्यात्मिक स्थिती अनुभवता येणे : पू. आजींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या साधकांनाही उच्च आध्यात्मिक अनुभूती आल्या. ‘ब्रह्मांडाचे दर्शन होणे’, ‘पोकळी अनुभवणे’, ‘निर्विचार अवस्था अनुभवणे’, अशा उच्च आध्यात्मिक अनुभूती साधकांना पू. आजींच्या काही क्षणांच्या दर्शनाने अनुभवता आल्या. साधक नोकरीच्या ठिकाणाहून बरेच थकून आणि नकारात्मक वातावरणातून तेथे येत होते, तरीही पू. आजींच्या दर्शनाला आल्यावर काही क्षणांतच ते निर्विचार स्थिती अनुभवत होते.

४ ए. पू. आजींच्या नातींनी त्यांच्या अंत्यविधीची सिद्धता भावपूर्ण करणे : पू. आजींच्या नातींनी त्यांच्या पुढील विधींची सिद्धता छान केली होती. पू. आजींच्या मुखात ठेवण्यासाठी तुळशीपत्र आणले होते. आम्हाला वाटत होते, ‘पू. आजी कुठेतरी जाणार आहेत आणि त्यांना सजवण्याची सिद्धता चालू आहे.’

४ ऐ. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांची नखे काळी-निळी झालेली दिसणे आणि नखे संशोधनासाठी पाठवण्याविषयी त्यांच्या नातीने सांगितल्यावर नखे पांढरी होणे : पू. आजी संत असल्यामुळे आध्यात्मिक संशोधनासाठी आणि संग्रहासाठी त्यांच्या बोटांची नखे काढायची होती. त्याचीही पूर्वसिद्धता पू. आजींच्या नातींनी केली होती. पू. आजींनी देह ठेवल्यानंतर त्यांची नात सौ. कपिला घाणेकर यांनी पू. आजींचा हात हातात घेतला. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, पू. आजींची नखे काळी-निळी झाली आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘ही नखे संशोधनासाठी रामनाथी आश्रमात पाठवायची आहेत. आता कशी पाठवणार ?’’ त्यानंतर ५ मिनिटांनी पू. आजींची नखे पुन्हा पांढरी झाली आणि नंतर त्या नखांवर पिवळसर छटा आली.

४ ओ. पू. आजींच्या कुटुंबियांच्या इच्छेप्रमाणे देवद आश्रमाजवळील संतांचे अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी पू. आजींचे अंत्यसंस्कार करण्यात येणे : पू. पाटीलआजींच्या नातवांचा त्यांच्या अंत्यसंस्कारांविषयीचा विचार फार चांगला होता. ‘जिथे सर्वसामान्यांचे अंत्यविधी होतात, त्या स्मशानभूमीत पू. आजींचे अंत्यसंस्कार करायला नकोत. जिथे संतांचे अंत्यसंस्कार केले जातात, तिथे पू. आजींचे अंत्यसंस्कार व्हावेत’, असे त्यांना वाटत होते. त्यानुसार देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाजवळील भूमीवर जिथे यापूर्वी देहत्याग केलेल्या संतांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तिथेच पू. आजींचेही अंत्यसंस्कार केले. सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी (वय ६८ वर्षे) यांनी पू. आजींच्या पार्थिवाला पुष्पहार घातला, तसेच साधकांनी पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.’

– (सद्गुरु) अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) आणि (पू.) सौ. संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५७ वर्षे), धर्मप्रचारक (महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि रायगड हे जिल्हे अन् गुजरात राज्य), सनातन संस्था. (३०.५.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.