समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !

प्राचीन काळापासून आपल्याकडे साथीचे रोग पसरल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकले असेल किंवा सध्याचे उदाहरण, म्हणजे जगभरात आलेली ‘कोरोना’ची महामारी. या महामारीमुळे लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला. साथीच्या आजारांकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास त्याचे कारण विषाणू
किंवा जीवाणू असते; मात्र जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार करतो, तेव्हा त्याचे मूळ कारण लक्षात येते. आयुर्वेदानुसार एखादा आजार संपूर्ण शहराचा किंवा देशाचा नाश करतो, तेव्हा त्याला ‘जनपदोद्ध्वंस’ (साथीचे आजार) म्हणतात. यामागेही अधर्माचरण हेच कारण असते. येथे अधर्म, म्हणजे केवळ पूजा न करणे नव्हे, तर नैतिक मूल्यांचे अधःपतन, पराकोटीचा स्वार्थ, निसर्ग नियमांचे उल्लंघन, समष्टी पाप अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव असतो. जेव्हा समाजातील प्रभावशाली लोक किंवा बहुसंख्य जनता चुकीच्या मार्गाने वागू लागते, तेव्हा निसर्गातील चैतन्य शक्तीचा उद्रेक होतो. त्याच्या परिणामांमुळे साथीचे आजार उद्भवतात. जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्‍या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.

– श्री. योगेश जलतारे, संपादक, सनातन प्रभात समूह

संपादकीय भूमिका

समष्टी स्वरूपाच्या संकटांवर मात करण्यासाठी धर्माचरण आणि साधना करणे अपरिहार्य !