India Slams Pakistan : पाकिस्तानला आतंकवादाला साहाय्य केल्याचे परिणाम भोगावे लागतील !

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला दिली चेतावणी !

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने सीमापार आतंकवादाला पाठिंबा देणे चालूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दिली. याच वेळी भारताने सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. ‘जग वर्ष २०२६ मध्ये पोचले असतांना सुरक्षा परिषद अजूनही वर्ष १९४५ च्या विचारसरणीत आणि चौकटीत अडकलेली आहे’, असे भारताने म्हटले.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटले की, भारताला सीमापार आतंकवादापासून स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ‘आतंकवादाला खतपाणी घालण्याची किंमत मोजावी लागते, हे पाकिस्तानने समजून घ्यावे’, असे हरीश यांनी बजावले. हे विधान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांच्या भाषणाला उत्तर म्हणून आले, ज्यामध्ये त्यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित करून भारतावर टीका केली होती. ‘जम्मू-काश्मीरचा प्रश्न सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांनंतरही अद्याप सुटलेला नाही’, असा दावा पाकिस्तानने केला होता.

पाकने संयुक्त राष्ट्रांच्या अटींचे कधीच पालन केले नाही !

भारताने पाकिस्तानला आठवण करून दिली की, वर्ष १९४८ मध्ये संमत झालेल्या सुरक्षा परिषदेच्या ४७ व्या प्रस्तावानुसार पाकिस्तानला त्याचे सैनिक आणि कबायली लढाऊ (जमातीसाठी लढणारे) यांना काश्मीरमधून हटवायचे होते; पण त्यांनी या अटीचे कधीच पालन केले नाही. पाकिस्तान सातत्याने आतंकवाद, कट्टरतावाद आणि भारतविरोधी कारवाया यांना प्रोत्साहन देत आहे अन् संयुक्त राष्ट्र सनदेचा आदर करण्याचा त्यांचा दावा पोकळ आहे. पाकिस्तानने अनेकदा भारतावर युद्ध लादले, विनाकारण आक्रमणे केली आणि दशकांपासून सीमापार आतंकवादाला पाठिंबा दिला, असे भारताने म्हटले.

संपादकीय भूमिका

पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने भारताने त्याला कायमस्वरूपी ती समजावी अशी कृती केली पाहिजे. याने पाक परत परत कुरापती काढणार नाही !