(म्हणे) ‘आमच्यावर १०० टक्के विश्‍वास ठेवा, भारताला हवे ते सगळे मिळेल !’ – Donald Trump

पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत डॉनल्ड ट्रम्प यांचे विधान !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व राजदूत सर्जिओ गोर

नवी देहली – माझे भारतावर प्रेम आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात. मी पंतप्रधान मोदी यांचा खूप मोठा चाहता आहे. मोदी महान आहेत आणि माझे मित्र आहेत. येथे सकाळ आहे, तुमच्याकडे सायंकाळ आहे. त्यामुळे तुम्हाला ‘शुभ सायंकाळ’ म्हणायला आलो आहे. मला केवळ एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही सर्व जण चांगले आहात.

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध यापूर्वी कधीही इतके घनिष्ठ नव्हते. माझ्यावर आणि माझ्या देशावर तुम्ही १०० टक्के विश्‍वास ठेवू शकता, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले. ‘आमची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार विक्रमी पातळीवर आहेत अन् भारताला जे काही हवे असेल, ते त्यांना मिळेल’, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त येथील अमेरिकी दूतावासाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दूरभाष केला आणि स्पीकरद्वारे ट्रम्प यांनी भारतियांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील विधाने केली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यासह अनुमाने दीड सहस्र पाहुणे उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

ट्रम्प यांच्यावर जगातील कोणतेही शेंबडे पोर विश्‍वास ठेवू शकत नाही, अशी त्यांची आणि अमेरिकेची प्रतिमा जगात निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारची आश्‍वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करावा !