Bhojshala Case : (म्हणे) ‘तथ्य योग्य प्रकारे सादर केले गेले नाहीत !’ – मुसलमान पक्ष

भोजशाळेच्या प्रकरणात मुसलमान पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान

धार (मध्यप्रदेश) – भोजशाळेच्या प्रकरणात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मुसलमान पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मुसलमान पक्षाने विशेष अनुमती याचिका प्रविष्ट केली. उच्च न्यायालयाने ६ दिवसांपूर्वी भोजशाळा परिसर श्री वाग्देवी मंदिराशी संबंधित प्राचीन धार्मिक स्थळ मानले होते.

मुसलमान समाजाचे ‘सदर’ (धार्मिक कामकाज, मदरसे, वक्फ मालमत्ता यांची देखरेख करणारा अधिकारी) अब्दुल समद यांनी सांगितले की, या निर्णयामुळे समाजात निराशा आहे आणि तो एकतर्फी असल्याचे सांगत त्याला आव्हान देण्यात आले आहे. ज्येष्ठ अधिवक्ता सलमान खुर्शीद या प्रकरणात लवकर सुनावणी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करतील. न्यायालयासमोर काही महत्त्वाची तथ्ये योग्य प्रकारे सादर केली गेली नाहीत. कमाल मौला मशिदीत अनुमाने ७०० वर्षांपासून शुक्रवारचे नमाजपठण केले जात आहे. या परंपरेवर परिणाम झाल्याने समाजात दुःख आहे; परंतु ही लढाई पूर्णपणे घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीतच लढली जाईल.

शहर काझी (इस्लामी कायदेतज्ञ आणि न्यायाधीश) वकार सादिक म्हणाले की, मुसलमान समाज न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे.

संपादकीय भूमिका

पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर उच्च न्यायालयाने भोजशाळा हिंदूंचे मंदिर असल्याचे स्पष्ट केलेले असल्याने मुसलमानांनी कितीही विरोध केला, तरी सत्य पालटणार नाही !