अनेकदा आयुर्वेदाची औषधे महाग असतात वगैरे चर्चा रंगतात. या विषयावर मी यापूर्वी लिहिले आहेच; पण आज याचाच दुसरा पैलू पाहूया तो, म्हणजे आयुर्वेद तुमचे पैसे कशा प्रकारे वाचवतो…
किडनी स्टोन झाला की, डोळ्यांसमोर येतात त्या पोटात उठणार्या असह्य कळा आणि रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा मोठा व्यय. नुकतेच फेसबुकवर याविषयीचा एका दुःखद अनुभव वाचनात आला होता. योगायोगाने मागच्याच आठवड्यात एका ७० वर्षीय महिला रुग्णाच्या अनुभवाने आम्हाला याविषयी लिहायला ताजा पुरावाच मिळाला ! त्यांचा ८.५ मिलीमीटरचा (मि.मी.चा) खडा कोणत्याही रुग्णालयात प्रवेशाविना घरच्या घरी केवळ ६ दिवसांत आयुर्वेदाच्या औषधांनी बाहेर पडला !
वैद्यकशास्त्रानुसार मूत्रवाहिनी, म्हणजेच लघवीच्या नळीचा (Ureter) नैसर्गिक व्यास साधारण ३ ते ४ मि.मी. असतो. त्यामुळे खड्याचा आकार जसा वाढतो, तशी तो नैसर्गिकरित्या पडण्याची शक्यता अल्प होत जाते.

१. संशोधनानुसार आकडेवारी काय सांगते ?
अ. ४ मि.मी.पर्यंतचे खडे ८० टक्के वेळा आपोआप पडू शकतात.
आ. ५ ते ७ मि.मी.चे खडे पडण्याची शक्यता ५० टक्के असते.
इ. ७ मि.मी.पेक्षा मोठे खडे नैसर्गिकरित्या पडण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षाही न्यून, म्हणजेच नगण्य मानली जाते.

अशा स्थितीत ८.५ मि.मी.चा खडा फार अल्प वेदना होत किंवा अनेकांना तर वेदनारहित पडणे, ही खरोखरच आयुर्वेदाची किमया आहे. जेव्हा ८ मि.मी.पेक्षा मोठा खडा असतो, तेव्हा पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र ‘वेट अँड वॉच’ (थांबा आणि वाट पहा) न करता थेट शस्त्रक्रियेचे मार्ग सुचवते. यामध्ये प्रामुख्याने ‘यू.आर्.एस्.’ (युरेट्रोस्कोपी) किंवा ‘लेझर ट्रिटमेंट’चा वापर होतो. याचा व्यय रुग्णालयानुसार अनुमाने १ लाख २० सहस्र रुपयांपर्यंत जातो. यात भूल देणे, शरिरात दुर्बिण टाकणे आणि शस्त्रक्रियेनंतर काही दिवस नळी (स्टेंट) टाकणे या गोष्टी येतात. नंतर पुन्हा ‘स्टेंट’ काढायला रुग्णालयात भरती होणे आणि त्याचा व्यय हेही आलेच.
लघवीच्या नळीमध्ये उतरलेला खडा आणि किडनीमधील खडा या दोन्हींविषयी आयुर्वेद उपचारांत फरक असतो. किडनीतील खड्याला विरघळवून ठिसूळ केले जाते, तर मूत्रवाहिनीतील खडा सुरळीतपणे जसाच्या तसा बाहेर पडावा, अशी औषधे असतात. यामुळे खडा न टोचता किंवा मूत्रमार्गाला इजा न करता तो बाहेर पडतो. यात कोणताही ‘इनव्हेसिव्ह’ (स्टेंटिंग – नळी घालणे) प्रकार नसतो.
२. वेळ, पैसा आणि आरोग्याची बचत !
आयुर्वेदाचे उपचार निवडून या रुग्णाने केवळ शस्त्रक्रियाच टाळली नाही, तर खालील लाभही मिळवले –
अ. लाख रुपयांच्या घरात जाणारा शस्त्रक्रियेचा व्यय टळला. आरोग्यविमा असला, तरी खिशातून पैसे घालावे लागले असतेच आणि नसता, तर सगळाच व्यय खिशातून.
आ. रुग्णालयामध्ये भरती होणे, शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणार्या चाचण्या आणि शस्त्रक्रियेनंतरची विश्रांती असा ४-५ दिवसांचा वेळ वाचला.
इ. मोठ्या खड्याच्या कळा असह्य असतात; पण आयुर्वेदाने हा मार्ग सुसह्य केला. कित्येक रुग्णांत वेदना अधिक झाल्यासही त्यांचे शमन करण्याचा प्रभावी मार्ग आयुर्वेदात आहेच.

अनेकदा मुख्य आक्षेप असा असतो की, मोठा खडा अडकून राहून किडनीवर सूज (Hydronephrosis) निर्माण करू शकतो; ज्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका असतो; मात्र आयुर्वेदाच्या औषधांत लघवीचे प्रमाण वाढवणारे उपचार असल्याने हा धोका न होता खडा बाहेर काढता येतो.
८.५ मि.मी.चा खडा घरच्या घरी बहुतांशी वेदनारहित पडणे, ही केवळ एक घटना नसून ती आयुर्वेदाच्या योग्य औषधयोजनेची शक्ती आहे. आपण अशा सक्षम पर्यायाची निवड केल्यास तुमचे शरीर आणि खिसा दोन्ही सुरक्षित राहू शकतात. अर्थातच हे सरसकट विधान नसून किंवा पाश्चात्त्य वैद्यकाला बोल लावण्याचा कोणताही हेतू नसून केवळ सक्षम पर्यायाची एक वेगळी बाजू जनजागृतीसाठी पुराव्यासह मांडणे इतकाच हेतू यामागे आहे. (१९.५.२०२६)
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !