गर्भपात हा स्त्रीच्या आयुष्यातील शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील अनुभव असतो. या अवस्थेनंतर शरिरात अचानक झालेल्या पालटांमुळे अशक्तपणा, ‘हार्मोनल’ (संप्रेरक) असंतुलन, तसेच मानसिक खिन्नता जाणवू शकते. अनेक वेळा स्त्रिया या अवस्थेकडे दुर्लक्ष करतात; परंतु आयुर्वेदानुसार गर्भपातानंतर योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पुढील काळात स्त्रीरोग समस्या निर्माण होऊ शकतात.
(लेखांक १५)
लेखांक १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1039167.html
१. गर्भपातानंतरची अवस्था म्हणजे काय ?
गर्भपातानंतर गर्भाशय रिकामे होते आणि शरिरात वातदोष प्रबळ होतो. या अवस्थेला आयुर्वेदात विशेष महत्त्व दिले आहे; कारण याच काळात योग्य उपचार न केल्यास पुढे पाळीतील अनियमितता, कमजोरी किंवा गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
२. प्रमुख लक्षणे
अशक्तपणा आणि थकवा, पाठदुखी, कंबरदुखी, पाळी अनियमित होणे, भूक न्यून होणे, चक्कर येणे, मानसिक ताण, दुःख, चिडचिड आणि झोपेचा त्रास, ही प्रमुख लक्षणे होत.
३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

गर्भपातानंतर शरिरात खालील पालट होतात –
अ. वातदोष वाढ : शरिरात कोरडेपणा आणि वेदना
आ. रक्त धातूची क्षीणता : अशक्तपणा
इ. आर्तव वह स्रोतस दुष्टी : पाळीवर परिणाम
ई. अग्नी मंद होणे : पचनशक्ती न्यून
उ. मानसिक असंतुलन : मनावर परिणाम
४. आयुर्वेदानुसार चिकित्सेत विचार करतांना
वैद्य उपचार करतांना गर्भपाताचा कालावधी (कितव्या मासात झाला), स्त्रीची प्रकृती, रक्तस्रावाची स्थिती, पचनशक्ती (अग्नी), मानसिक स्थिती आणि पूर्वीचा वैद्यकीय इतिहास यांचा विचार करतात.
५. मुख्य उद्देश
वातशमन + रक्तपोषण + गर्भाशय पुनर्स्थापना + मानसिक स्थैर्य
६. आयुर्वेदाचे औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)
अ. शतावरी : गर्भाशय पोषण आणि हार्मोन्स संतुलन
आ. अशोक : पाळी नियमित करण्यासाठी
इ. अश्वगंधा : शक्ती आणि मानसिक स्थैर्य
ई. लोध्र : गर्भाशय शुद्धी अन् स्त्राव नियंत्रण
उ. त्रिफळा : पचन सुधारणा आणि स्रोतस शुद्धी
आवश्यकतेनुसार बस्ती (वातशमनासाठी) अन् इतर उपचार उपयोगी ठरतात.
७. घरगुती आयुर्वेदाचे उपाय
पूर्ण विश्रांती घ्यावी. कोमट आणि ताजे अन्न सेवन करावे. तूपाचा मर्यादित वापर हवा. गरम पाणी पिण्याची सवय हवी. मानसिक आधार अन् सकारात्मक वातावरण हवे. थंड अन्न, जड काम, ताण आणि प्रवास टाळावा.
८. आहार मार्गदर्शन
अ. काय घ्यावे ? : दूध, तूप, सूप, खिचडी, मूगडाळ, हलका आणि पौष्टिक आहार
आ. काय टाळावे ? : थंड, तिखट आणि तेलकट पदार्थ, जंक फूड, उपाशी रहाणे.
९. मानसिक आरोग्याची काळजी
गर्भपातानंतर स्त्रीला मानसिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग, ध्यान, कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक वातावरण यांमुळे मानसिक स्थैर्य मिळण्यास साहाय्य होते.
१०. निष्कर्ष
गर्भपातानंतरचा काळ हा स्त्रीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आयुर्वेद या काळात शरीर आणि मन या दोन्हींची काळजी घेण्यावर भर देतो. योग्य उपचार, संतुलित आहार, विश्रांती आणि मानसिक आधार यांच्या साहाय्याने स्त्री पुन्हा पूर्णपणे निरोगी होऊ शकते अन् भविष्यातील गर्भधारणेसाठी शरीर सिद्ध होऊ शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
लेखांक १६ साठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1043806.html

कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?