Insulting Raigad Fort : रायगडावर मद्याच्या ५० हून अधिक रिकाम्या बाटल्यांचा खच !

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लज्जास्पद घटना...

  • पर्यटक गडावर मद्यधुंद मेजवान्या करत असल्याचे आले समोर

महाड (जिल्हा रायगड) – किल्ले रायगडावर पर्यटक मद्यधुंद मेजवान्या करत असल्याचे उघडकीस आले आहे. गडाच्या परिसरात मद्याच्या ५० हून अधिक रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसला. यावर गडप्रेमी, स्थानिक नागरिक आणि शिवभक्त यांनी संताप व्यक्त केला. मद्याच्या बाटल्यांसह प्लास्टिकचा कचरा आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही दिसून आली.

गडाच्या मुख्य प्रवेशद्वारांवर पर्यटक आणि त्यांचे साहित्य यांची काटेकोर पडताळणी केली जात नसल्यानेच असे प्रकार होत असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. ‘गडावर जाणार्‍या प्रत्येक पर्यटकाची प्रवेशद्वारावर कसून पडताळणी व्हावी. गडावरील सुरक्षारक्षकांची संख्या तातडीने वाढवण्यात यावी. गड परिसरात आणि मुख्य ऐतिहासिक वास्तूंच्या मागे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. गडावर दारूबंदीचे फलक लावून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई व्हावी’, अशा मागण्या शिवभक्त आणि स्थानिक यांनी केल्या आहेत.

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अपप्रकार चालू असल्याची गेल्या २ वर्षांतील काही उदाहरणे !

डिसेंबर २०२५ : सिंहगडावर जात असलेल्या एका चारचाकी गाडीतून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.

ऑक्टोबर २०२५ : भोर (जिल्हा पुणे) येथील रायरेश्वर गडाजवळ काही लोक मद्य प्राशन करत असल्याचे समोर आले होते.

जुलै २०२४ : विशाळगडावर प्रचंड प्रमाणात कचरा आढळल्याने व्यापक आंदोलन करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांच्या दुरवस्थेच्या घटना वारंवार समोर येत असतात. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या या गड-दुर्गांकडे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचेच हे उदाहरण म्हणता येईल. सरकारने आता या घटनेचे उत्तरदायित्व निश्चित करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे !
  • गड-दुर्गांना अपवित्र करणार्‍या पर्यटकांनाच गडावर स्वच्छता करण्याची शिक्षा द्यायला हवी !