
कालिदास उवाच (महाकवी कालिदास यांच्या मते)
‘सर्वतीर्थात्मिके सर्वमंत्रात्मिके सर्वतंत्रात्मिके सर्वयंत्रात्मिके
सर्वपीठात्मिके सर्वतत्त्वात्मिके सर्वशक्त्यात्मिके सर्वविद्यात्मिके
सर्वयोगात्मिके सर्वनादात्मिके सर्वशब्दात्मिके सर्वविश्वात्मिके
सर्वदीक्षात्मिके सर्वसर्वात्मिके सर्वगे पाहि मां पाहि माम् ।।’
अर्थ आणि स्पष्टीकरण : मातंगी ही सर्व तीर्थे, सर्व मंत्र, तंत्र, यंत्र, पीठे, सर्व विद्या, शक्ती, नाद, योग आणि दीक्षा यांचा स्रोत अन् आधार आहे.
थोडक्यात सांगायचे, तर ती सर्व प्राणिमात्रांमध्ये आणि विश्वामध्ये सर्वव्यापी आहे.
वरील श्लोक हा पुरावा आहे की, मातंगी ही साक्षात् आदिपराशक्तीचा अवतार आहे. संपूर्ण विश्वामध्ये भगवान रुद्रखेरीज (शिवाखेरीज) ३ डोळे असलेली आणि सर्व जिवांमध्ये सर्वव्यापी असलेली ती एकमेव देवता आहे. तीच आदिपराशक्ती आहे.
‘श्यामला दंडक’ हे देवी कालीच्या ‘श्यामला’ रूपाला समर्पित असलेले एक छोटे; पण मंत्रमुग्ध करणारे स्तोत्र आहे. ‘दंडक’ हा संस्कृत छंदाचा एक प्रकार आहे, यात लांब, प्रवाही आणि लयबद्ध वाक्यरचना असते. तांत्रिक आणि पौराणिक संदर्भांनुसार श्यामला आणि राजमातंगी या एकाच मूळ तत्त्वाची दोन रूपे मानली जातात. ‘ललितासहस्रनाम’ आणि ‘श्रीविद्या’ यांमध्ये श्यामला ही देवी ‘ललिता त्रिपुरासुंदरी’ यांची पंतप्रधान मानली गेली आहे. जेव्हा हीच श्यामलादेवी दशमहाविद्यांमध्ये प्रकट होते, तेव्हा तिला ‘मातंगी’ किंवा ‘राजमातंगी’ असे म्हटले जाते.
परंपरेनुसार असे मानले जाते की, महाकवी कालिदास यांनी हे स्तोत्र रचले आणि गायले होते. जेव्हा त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून ते देवीची आराधना करण्यासाठी मंदिरात गेले होते, तेव्हा तिथे त्यांना देवीचे दर्शन घडले आणि या रचनेचा जन्म झाला. या काव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची अत्यंत मधुर, गोड आणि मनाला भिडणारी शैली ! संस्कृत साहित्यातील हे एक अत्यंत लोकप्रिय ‘दंडक’ स्तोत्र आहे. या स्तोत्रात देवीचे वर्णन करतांना महाकवी कालिदास म्हणतात, ‘मी त्या मातंगऋषींच्या कन्येचे (श्यामलादेवीचे) सतत चिंतन करतो, जिचे शरीर इंद्रनील मण्यासारखे चमकत आहे, जी मदाने किंचित् डुलत आहे, जी मधुर गायन करत आहे आणि जिचे हात माणिक जडित वीणेवर अत्यंत कोमलतेने फिरत आहेत.
हे अखिल विश्वाच्या जननी ! तुला माझे वंदन असो. तू ४ हातांनी युक्त आहेस. तुझ्या हातांत लाल उसाचे धनुष्य, पाश (दोरी), अंकुश आणि फुलांचे बाण आहेत. तुझ्या मस्तकावर चंद्राची कोर असून तुझे शरीर केशरयुक्त गंधाने आरक्त (लाल) झाले आहे. ती मंगलमयी माता, जी पाचूच्या मण्यासारखी गडद हिरवी आहे, जी दिव्य आनंदाने प्रफुल्लित आहे आणि जिचा निवास कदंब वृक्षांच्या वनात आहे, तिने तिच्या कटाक्षाने माझ्यावर कृपा करावी. तू भक्तांना समृद्धी देतेस, योग्यांच्या मनात वास करतेस आणि वेदांमधील मंत्रांना सामर्थ्य देतेस. श्रीकृष्ण तुझ्या संगीताची इच्छा धरतो, ब्रह्मा तुझी स्तुती करतो आणि गंधर्व-किन्नर त्यांच्या वाद्यांसह तुझे गुणगान करतात. हे विश्वजननी ! तू सर्वव्यापी आहेस. तूच सर्व तीर्थे, नद्या, वेद, मंत्र, यंत्र, तंत्र, शक्ती आणि सिद्धांत आहेस. तूच सर्व नाद, अक्षरे आणि शब्द आहेस. तूच हे संपूर्ण चराचर विश्व आहेस. माझे रक्षण कर, रक्षण कर, रक्षण कर ! हे देवी, तुला माझे वारंवार नमन असो !’
राजमातंगीदेवीच्या उपासनेचे वाणीच्या दृष्टीने महत्त्व
वाणी : मातंगी ही ‘वैखरी’ शब्दाची (वाणीची) अधिष्ठात्री देवता आहे, म्हणूनच तिला ‘वाग्विलासिनी’ (स्वतःच्या लेखनाने किंवा वाणीने इतरांचे लक्ष वेधून घेण्याची शक्ती) मानले जाते. देवीच्या रूपाकडे आपण पाहिले, तर देवीच्या हातात आपल्याला पोपट दिसेल. पोपट हा वाणीचे प्रतीक आहे.
वाणीचे ४ प्रकार आहेत. आपण बोलतो ती म्हणजे वैखरी वाणी. वैखरीवाणीच्या पुढचे टप्पे आहेत, मध्यमा वाणी, पश्यन्ति वाणी, परा वाणी !
वैखरी वाणी
वैखरी, म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष तोंडातून ध्वनी बाहेर काढतो ती वाणी. ही वाणीची सर्वांत स्थूल आणि व्यक्त अवस्था आहे. ही विशुद्धचक्राशी संबंधित आहे.
मध्यमा वाणी
वाणीचा पुढचा प्रकार, म्हणजे मध्यमा वाणी. ही अनाहतचक्राशी संबंधित आहे. प्रत्यक्ष वाक्य बोलण्यापूर्वी आपण मनात एक वाक्य सिद्ध करतो किंवा विचार करतो, ती म्हणजे मध्यमा वाणी.
पश्यन्ति वाणी
वाणीचा पुढचा स्तर आहे, पश्यन्ति वाणी ! ‘पश्यन्ति’ हा शब्द ‘पश्य’ या धातूपासून बनला आहे. ‘पश्य’ म्हणजे पहाणे. आपल्याला माहिती आहे की, ऋषिमुनी आणि संत द्रष्टे असतात. काळाच्या पलीकडे पहाण्याचे त्यांचे सामर्थ्य असते. त्यांची वाणी, म्हणजे पश्यन्ति वाणी. पश्यन्ति वाणी मणिपूरचक्राशी संबंधित आहे. इथे शब्दांचा उच्चार होत नाही; पण जे काही बोलायचे आहे किंवा व्यक्त करायचे आहे, त्याचे एक ‘दर्शन’ घडते.
परावाणी
वाणीचा सर्वोच्च प्रकार म्हणजे परावाणी ! परावाणीतील नामजप, म्हणजे नामाशी अद्वैत ! इथे देवतेचे नाम आणि नाम घेणारा अशा २ वेगळ्या संकल्पना नसतात, तर नाम अन् नाम घेणारा एकरूपच असतात.
राजमातंगीदेवीच्या उपासनेचे कलेच्या दृष्टीने महत्त्व

१४ विद्या आणि ६४ कला यांचे उगमस्थान म्हणजे भारत ! आकाशात तारे अनंत आहेत. आपण रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात पाहिले, तर अनेक चांदण्या आणि तारे आपल्याला दृष्टीला पडतात. हे तारे आणि चांदण्या संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशमय करतात. त्याप्रमाणे संपूर्ण सृष्टीला ज्ञान-विज्ञानाच्या माध्यमातून कुणी प्रकाशमय करत असेल, तर ती वैदिक ज्ञानपरंपरा. १४ विद्या आणि ६४ कला यांचा उगम भारतात झाला. भगवान श्रीकृष्ण १४ विद्या आणि ६४ कला यांमध्ये निपुण होते. त्यामुळे त्यांना ‘पूर्णपुरुषोत्तम’ असेही म्हणतात. या विद्या आणि कला प्रसिद्धीसाठी वा मनोरंजनासाठी नव्हत्या, तर त्यांचा अंतिम उद्देश ‘मोक्षप्राप्ती’ हा होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय कार्यरत आहे, त्याद्वारेही कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करायची, याचे ‘प्रॅक्टिकल’ (प्रत्यक्ष) शिक्षण दिले जाते. शुद्ध आणि सात्त्विक कलेच्या सादरीकरणातून आनंद प्रवाहित होतो; पण आजकाल अनेक कलांना बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांच्यामध्ये विकृती शिरली आहे. अशा वेळी विद्या-कलांचे मूळ सात्त्विक स्वरूप टिकून रहावे आणि ते आत्मसात करण्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी; म्हणून कलांची अधिष्ठात्री असलेल्या राजमातंगीदेवीचा कृपाशीर्वाद आवश्यक आहे.
यासाठी आपण राजमातंगीदेवीच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करूया, ‘हे सर्व विद्या आणि कला यांची जननी, विद्या अन् कला यांचे शुद्ध स्वरूप टिकून राहू दे. विद्या अध्ययन करणार्या आणि कलेची साधना करणार्या उपासकांवर तुझी कृपादृष्टी टिकून राहू दे. सनातन संस्कृतीवर आलेली छाया दूर जाऊ दे. सनातन संस्कृतीतील तेज प्रगट होऊ दे, अशी आम्ही तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (७.५.२०२६)

राजमातंगीदेवीच्या उपासनेचे व्यष्टी स्तरावरील महत्त्व आणि प्रार्थना

आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे, वैखरी वाणी ! म्हणजेच आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते ! एकमेकांशी जोडले जाण्यात किंवा एकमेकांपासून दूर जाण्यास हे शब्दच कारणीभूत असतात. आपणही दैनंदिन आयुष्यात हे अनुभवले असेल की, चुकीचे शब्द वापरल्यामुळे किंवा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे अनेक प्रसंग घडतात, जे असंतोषाचे किंवा दुःखाचे कारण ठरतात. राजमातंगीदेवीची उपासना ही वैखरी वाणीच्या शुद्धीसाठी महत्त्वाची आहे. मातंगीदेवीच्या उपासनेने वाणीत माधुर्य येते.
त्यामुळे राजमातंगीदेवीच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करूया, ‘हे आदिशक्ती राजमातंगीदेवी, आम्ही शरणागतभावे तुझ्या चरणी प्रार्थना करतो की, ‘हे माते, आम्हा साधकांच्या विशुद्धचक्राची शुद्धी होऊ दे. आमची वाणी सदैव गुरुसंकीर्तन करण्ो, धर्मप्रसार करण्ो, धर्मकार्य, दुष्ट विचारांचे खंडण करण्ो यांसाठी उपयोगात येऊ दे. हे माते, तूच आमच्या वाणीवर विराजमान हो. आमच्या वैखरी वाणीची शुद्धी होऊ दे.’
– श्री. चेतन राजहंस (७.५.२०२६)
राजमातंगीदेवीच्या उपासनेचे समष्टी स्तरावरील महत्त्व आणि प्रार्थना

सध्या समष्टी किंवा विश्व स्तरावर कशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ते आपण पहात आहोत. अमेरिका इराण युद्धाच्या वेळी आपण वृत्तपत्रातून हे वाचले किंवा वृत्तवाहिन्यांतून पाहिले की, महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प इराणला अनेक चेतावण्या देत होते. दुसरीकडे इराणही अमेरिकेला प्रत्युत्तर देत होता. हॉर्मुझची सामुद्रधुनी (दोन समुद्रांना जोडणारा भूभाग) बंद झाल्याने तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. या सगळ्या युद्धजन्य स्थितीमध्ये आगीत तेल ओतण्याचे काम कुणी केले असेल, तर ते शब्दांनी भारत हा युद्धामध्ये सहभागी नसला, तरी त्याची झळ भारतालाही सोसावी लागली; पण भारताने अन्य देशांशी उच्चस्तरीय बैठका आयोजित करून भारतहित जपण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या रणनीतीमध्येही पुन्हा महत्त्वाचे आहेत, ते शब्द.
या राजमातंगी महायज्ञाच्या निमित्ताने आपण राजमातंगीदेवीच्या चरणी प्रार्थना करूया, ‘हे जगत्जननी राजमातंगीदेवी, या पवित्रतम भारतभूमीच्या रक्षणासाठी वाक्युद्ध लढणारे जे देशप्रेमी भारतीय आहेत, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे. या तपोभूमी भारताभोवती तुझे संरक्षककवच असू दे. हे भगवती, धर्म आणि राष्ट्र यांच्या विरोधात बोलणार्यांचे वैचारिक अन् शाब्दिक खंडण करण्यासाठी तूच आम्हाला शक्ती दे. या सनातन धर्माचा आणि सनातन भारताचा गुणगौरव करण्याचे भाग्य आमच्या वाणीला लाभू दे’, अशी आम्ही तुझ्या चरणी शरणागतीने प्रार्थना करतो.’
– श्री. चेतन राजहंस (७.५.२०२६)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !