१० मे २०२६ या दिवशीच्या अंकात या लेखाच्या पहिल्या भागातील सूत्रे आपण जाणून घेतली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
उत्तरार्ध
पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/1038368.html

४. समुद्रमंथनाच्या वेळी वर उचलल्या गेलेल्या मंदार पर्वताला खाली दाबण्यासाठी भगवंत सहस्र हात असलेल्या रूपात प्रगट होणे

उपर्यगेन्द्रं गिरिराडिवान्य आक्रम्य हस्तेन सहस्रबाहुः ।
तस्थौ दिवि ब्रह्मभवेन्द्रमुख्यैः अभिष्टुवद्भिः सुमनोऽभिवृष्टः ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ७, श्लोक १२
अर्थ : इकडे पर्वताच्या वर दुसर्या पर्वतासारखे होऊन सहस्रबाहू भगवंताने त्यांच्या हातांनी त्याला दाबून धरले. त्या वेळी आकाशात ब्रह्मदेव, शंकर, इंद्र आदी त्यांची स्तुती करत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले.
समुद्रमंथनाला आरंभ झाल्यावर मंदार पर्वत वर उचलला गेला. त्यामुळे देव आणि असुर यांना मंथन करणे कठीण होऊ लागले. त्या वेळी भगवंताने सहस्र हातांचे रूप धारण केले आणि त्याच्या केवळ एका हाताने पर्वताला खाली दाबले.

४ अ. गुरुदेवांनी अहं निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून साधकांचा अहंकार न्यून करणे : त्याचप्रमाणे जेव्हा साधकांच्या अहंकाराचे प्रकटीकरण होते, तेव्हा तो अहंकार न्यून करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना अहं निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून तेच साधकांचा अहंकार न्यून करतात. भगवंताचे सहस्र हात हे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव प्रत्येक साधकाची काळजी घेत आहेत’, याचे दर्शक आहे.

‘हे परात्पर गुरुदेवा, आपण आमच्यासाठी जे काही करत आहात, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यास असमर्थ आहोत. तुम्हाला अर्पण करण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. आम्ही केवळ स्वतःला आपल्या पावन चरणकमली समर्पित करू शकतो.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्
५. सर्व भौतिक शक्ती अपयशी ठरलेल्या वेळी भगवंताच्या चरणी सर्वस्वाचा त्याग केल्यावर केवळ दैवी शक्तीच कार्य करणे

मथ्यमानात्तथा सिन्धोः देवासुरवरूथपैः ।
यदा सुधा न जायेत निर्ममन्थाजितः स्वयम् ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ७, श्लोक १६
अर्थ : देव आणि असुर यांनी मंथन करूनही समुद्रातून अमृत प्रकट झाले नाही. तेव्हा भगवंताने स्वतः मंथन करण्यास आरंभ केला.
यावरून ‘केवळ शारीरिक शक्तीने, धनशक्तीने किंवा इतर कोणत्याही ऐहिक शक्तीने काहीही साध्य होत नाही’, हे लक्षात येते. जेव्हा या सर्व शक्ती अपयशी ठरतात, तेव्हा केवळ दैवी शक्तीच कार्य करते. त्यासाठी आपल्याला सर्वकाही भगवंताच्या चरणकमली समर्पित करणे आवश्यक आहे. सर्वपरित्याग म्हणजे त्याच्या चरणी सर्वस्वाचा त्याग करणे होय.

५ अ. गुरुदेवांच्या चरणी मन, बुद्धी आणि अहंकार यांचा खर्या अर्थाने त्याग केल्यावर त्यांच्या कृपेने अशक्य तेही शक्य होणे : त्याचप्रमाणे कठीण काळात, जेव्हा आपले वैभव, मन, बुद्धी किंवा अहं यांपैकी काहीही उपयोगी पडत नाही; आपल्याला अन्य कोणताही मार्ग सापडत नाही; आपण दीन होऊन साश्रू नयनांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना करतो; त्यांच्या चरणकमली सर्वकाही समर्पित करतो; स्वतःची असाहायता आणि त्यांची सर्वव्यापकता स्वीकारतो; आपले मन, बुद्धी, अहंकार यांचा खर्या अर्थाने त्याग करतो, तेव्हाच त्यांच्या कृपेच्या रूपाने अद्भुत अनुभूती (चमत्कार) येऊ शकतात.
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्
६. समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेले हलाहल विष श्रीमन्नारायणावरील प्रीतीपोटी शिवाने प्राशन करणे

गरलं तरलानलं पुरस्ताज्जलधे: उद्विजगाल कालकूटम् ।
अमरस्तुतिवादमोदनिघ्नो गिरिशस्तन्निपपौ भवत्प्रियार्थम् ।। – श्रीनारायणीयम्, दशक २८, श्लोक १
अर्थ : प्रथम तरल अग्नीप्रमाणे कालकूट विष समुद्रातून बाहेर आले. देवांनी केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने प्रीतीपोटी ते प्राशन केले.
समुद्रमंथनाच्या वेळी वासुकीच्या मुखातून महाभयंकर हलाहल विष बाहेर पडले. तेव्हा सर्व जण शिवाकडून संरक्षण मिळवण्यासाठी कैलासाला धावले. शिवाने ते हलाहल विष प्राशन करून कंठात धारण केले. त्यांनी हे श्रीमन्नारायणावरील प्रीतीपोटी केले. हलाहल विषाचा थोडासा परिणाम शिवावरही झाला. विषप्राशनानंतर शिव पार्वतीमातेच्या मांडीवर पहुडला. तमिळनाडूतील चेन्नईजवळ ‘सुरुत्तपल्ली’ येथे ही दुर्मिळ मुद्रा पहायला मिळते, जिथे शेषशायी नारायणाप्रमाणेच शिव अंबेच्या मांडीवर शयनमुद्रेत विराजमान आहेत.

६ अ. साधकांवरील अपार प्रीतीमुळे गुरुदेवांनी साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढतांना स्वतः शारीरिक त्रास सहन करणे : साधना करतांना वर्ष २००० मध्ये साधकांवर सूक्ष्मातून वाईट शक्तींची आक्रमणे चालू झाली. ती पेलायची साधकांची क्षमता नव्हती. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध केले आणि त्रासांच्या निवारणासाठी विविध उपायपद्धती शोधल्या. याच्या परिणामस्वरूप त्यांनाही शारीरिक स्तरावर त्रास चालू झाले. त्यामुळे त्यांना कित्येक दिवस झोपून रहावे लागले होते.
सामान्यतः शिष्य गुरु आणि गुरुकृपा यांसाठी प्राणांसहित काहीही अर्पण करण्यास सिद्ध असतो. साधकांचे परमभाग्य आहे की, गुरुदेव साधकांच्या रक्षणासाठी कोणत्याही स्तराला दुःख सोसण्यास सिद्ध आहेत. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच !
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्
७. श्रीविष्णु समुद्रमंथनाच्या सर्व घडामोडींचे कर्ता-करविता असूनही त्यांनी नामानिराळे रहाणे

व्याजादिति । हरिः सुरैः सार्धं अहिपुच्छममङ्गलम् ।।
इत्युच्चैः वदन् पूर्वं पूर्वकायां जगृहे ।
समुद्रमंथनाच्या प्रत्येक टप्प्यावर भगवान श्रीविष्णूनेच सर्व सूत्रे हालवली. त्यानेच सर्व कार्याची योजना केली, त्याचे नियोजन आणि संचलन केले, आवश्यक ते सामर्थ्य दिले आणि ते कार्य यशस्वीरित्या पूर्णही करून घेतले.
देव आणि दैत्य यांच्या हातातून मंदार पर्वत निसटून जेव्हा खाली पडू लागला, तेव्हा तो धरून क्षीरसागरात स्थिर ठेवणारे भगवान श्रीविष्णूच होते. पर्वत बुडू लागल्यावर त्यांनी कूर्मावतार धारण करून स्वत:च्या पाठीवर तो उचलून धरला. मंथन करतांना जेव्हा पर्वत वर उचलला जाऊ लागला, तेव्हा त्याला खाली दाबून स्थिर ठेवणारेही तेच होते. देव आणि दैत्य या दोन्ही समूहांना आवश्यक ती शक्ती देऊन संपूर्ण समुद्रमंथन घडवून आणणारेही तेच होते.
अमृतप्राप्तीच्या वेळी धन्वन्तरि रूपात अमृतकलश घेऊन तेच प्रगट झाले. त्यानंतर त्यांनी अद्भुत मोहिनी अवतार धारण करून अत्यंत चातुर्याने अमृत केवळ देवांनाच वाटले, तरीही त्यांनी स्वतःकडे कोणतेही श्रेय घेतले नाही. उलट संपूर्ण यशाचे श्रेय देव आणि दैत्य यांनाच दिले आणि स्वतः मात्र ‘नामानिराळे’ राहिले.

७ अ. ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग शिकवणारे, साधना करून घेणारे गुरुदेवच असणे; मात्र साधकांनी केलेल्या अगदी छोट्याशा प्रयत्नाचेही कौतुक करून त्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच देणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आम्हा साधकांना अमृतासमान मोक्षप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग शिकवला आहे. त्यांनी केवळ तो शिकवला नाही, तर ते प्रेमाने आमचा हात धरून प्रत्येक पावलावर मार्गदर्शनही करत आहेत. आम्ही कधी मार्गात पडतो किंवा अडखळतो, तेव्हा ते आम्हाला उचलून घेतात, समजावतात, धीर देतात आणि पुढे प्रगती करण्यासाठी प्रेरणा देतात. या घोर कलियुगामध्ये आम्हाला जी काही साधना करता येत आहे, ती केवळ त्यांचा दिव्य संकल्प आणि कृपा यांमुळेच शक्य होत आहे, तरीसुद्धा ते स्वतः मात्र ‘नामानिराळे’ रहातात. आम्ही केलेल्या अगदी छोट्याशा प्रयत्नाचेही ते कौतुक करतात आणि त्याचे संपूर्ण श्रेय आम्हा साधकांनाच देतात.
(समाप्त)
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या समष्टी संत), चेन्नई, तमिळनाडू. (१.२.२०२४)
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, देवाने दिलेल्या देहरूपी देणगीचा साधनेसाठी उपयोग करून नरदेहाचे सार्थक करा !