Karnataka Hijab Row : काँग्रेस सरकारकडून कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबंदीचा आदेश मागे

  • नवीन आदेशात मनगटावरील दोरा, रुद्राक्ष आणि जानवे यांना अनुमती, तर भगव्या शालीवर बंदी

  • वर्ष २०२२ मध्ये तत्कालीन भाजप सरकारने हिजाबवर घातली होती बंदी

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये हिजाबवर बंदी घालणारा वर्ष २०२२ चा निर्णय मागे घेतला आहे. नवीन आदेशानुसार विद्यार्थ्यांना हिजाब व्यतिरिक्त कलावा (मनगटावरील दोरा), रुद्राक्ष, फेटा आणि जानवे घालण्याचीही अनुमती देण्यात आली आहे; मात्र भगवी शाल परिधान करण्यास अनुमती नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. कर्नाटकाच्या तत्कालीन भाजप सरकारने फेब्रुवारी २०२२ मध्ये सरकारी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना निर्धारित गणवेशाचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले होते. याच आदेशानंतर अनेक सरकारी शिक्षण संस्थांमध्ये हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

सरकारने म्हटले की,

हा मुलांच्या हिताचा विचार करून घेतलेला निर्णय असून शिक्षणात कोणताही भेदभाव नसावा, असे सरकारने आपल्या आदेशात नमूद केले आहे. ‘भगवी शाल ही धार्मिक गोष्टींत येत नाही. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये भगव्या शालीला अनुमती नाही’, असे स्पष्टीकरण सरकारने दिले.

हिजाब घालता येत असेल, तर भगवी शाल घालण्याची अनुमती द्यायला हवी ! – अपक्ष आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

शाळांमध्ये हिजाब घालता येत असेल, तर हिंदूंनाही भगवी शाल घालण्याची अनुमती द्यायला हवी, अशी मागणी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली आहे.

शालेय मुली हिजाब घालू शकतात कि नाही ? याविषयीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतांना, शालेय मुली त्यांच्या गणवेशासमवेत हिजाबही घालू शकतात, अशी कर्नाटक सरकारची भूमिका म्हणजे अल्पसंख्यांकांची मतपेढी बँक सुरक्षित करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

आमदार यत्नाळ पुढे म्हणाले की,

हिंदू विद्यार्थ्यांना मी स्वतः भगवी शाल देण्याची व्यवस्था करेन. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये श्री गणपति आणि श्री सरस्वती यांची मूर्ती स्थापन करून प्रतिदिन पूजा करण्याची व्यवस्था आम्ही करू.

संपादकीय भूमिका

काँग्रेस सरकार सत्तेत येऊनही असा निर्णय घेण्यासाठी ४ वर्षे लागणे, हे आश्चर्यच म्हणावे लागेल ! पुढील निवडणुकीत हिंदूंना काँग्रेसला सत्ताच्युत केल्यानंतर येणार्‍या हिंदुत्वनिष्ठ सरकारने पुन्हा हिजाबबंदी केली, तर चुकीचे ते काय ?