संपादकीय : स्टॅलिन यांचा पुन्हा सनातनद्वेष !

उदयनिधी स्टॅलिन यांची सनातन धर्माविषयी पुन्हा एकदा गरळओक !

तामिळनाडू विधानसभेचे वादग्रस्त विरोधी पक्षनेते तथा द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) पक्षाचे आमदार उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी पुन्हा एकदा गरळओक केली. ‘ज्या सनातनने लोकांना विभागण्याचे काम केले, तो नष्ट केला पाहिजे’, असे चिथावणीखोर विधान त्यांनी केले. त्यांनी यापूर्वीही ‘आपण मलेरिया, डेंग्यू असे डासांपासून उत्पन्न होणारे रोग संपवतो, त्याप्रमाणे हिंदु धर्माचे समूळ उच्चाटन करा’, असे चिथावणीखोर आवाहन उघडपणे केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध देशभरात शेकडो तक्रारी प्रविष्ट (दाखल) झाल्या. एकट्या महाराष्ट्रात सव्वाशेहून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या. तथापि या तक्रारींचा त्यांच्यावर काडीमात्रही परिणाम झाला नाही, हे त्यांनी पुन्हा केलेल्या सनातनद्वेषी वक्तव्यांवरून दिसून येते. एक धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्ती १०० कोटी सनातनी हिंदूंविरुद्ध उघडपणे आणि पुनःपुन्हा बोलते आणि तिला कुठलाही कायदा, कुठल्याही यंत्रणा, कुठलीही व्यवस्था, कुठलेही सरकार रोखू शकत नाही, याचे आश्चर्य वाटते. राजकीय पक्षांच्या आंदोलनातील गर्दीपैकी बर्‍याच जणांना ‘आपण नेमके कशासाठी आंदोलन करत आहोत ?’, हेच ठाऊक नसते. तशी अवस्था सनातन धर्माला लक्ष्य करण्याचा एकप्रकारे आदेश असलेल्या द्रमुकच्या नेत्यांची झालेली दिसते. अशांचा व्यवस्थित बुद्धीभेद करून त्यांना लक्ष्य ठरवून दिले जाते आणि त्याप्रमाणे मग ते जीभेला हाड नसल्याप्रमाणे बडबड करत रहातात. अशांमध्ये सनातनद्वेषाचे विष इतके खोलवर रुजवले गेले असते की, त्यांना ‘सनातन म्हणजे काय ?’ हे समजून घेण्याचीही आवश्यकता वाटत नाही.

वास्तविक ‘नित्य नूतन: इति सनातन: ।’, म्हणजे जे नवीन आहे, जुने होत नाही, ते सनातन. जे यापूर्वी होते, आज आहे आणि यापुढेही अबाधित राहील, ते खरे सनातन. साक्षात् भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांच्यासह सहस्रो साधू-संत यांना या धर्मात जन्म घ्यावासा वाटतो, असा हा सनातन धर्म ! ज्याच्या पुनरुत्थासाठी स्वतः शंकराचार्यांनी महत् कार्य केले, तो हा सनातन धर्म ! ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ ही उदात्त शिकवण देणारा सनातन धर्म ! कोट्यवधी सनातनी हिंदूंनी सनातन धर्माप्रमाणे आचरण करून स्वतःचे जीवन कृतकृतार्थ करून घेतले आणि आजही करून घेत आहेत. इतकेच काय सनातन धर्म जाणून घेण्यासाठी आजही सहस्रो विदेशी नागरिक भारतात येतात आणि सनातन धर्म, संस्कृती, परंपरा आदींचा सखोल अभ्यास करून स्वतः त्याचे आचरण करू लागतात. सनातन धर्माची महती सांगू तेवढी अल्प आहे. पेरियार यांच्या नास्तिक आणि हिंदुद्वेषी विचारांनी प्रभावित असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासारख्यांना ही महती काय कळणार ? ‘जिथे पिकते तेथे विकत नाही’, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

सनातनला संपवण्याचे अनेकांकडून प्रयत्न !

आतापर्यंत अनेकांनी सनातनला संपवण्याचे प्रत्यन केले. सनातनला संपवण्यासाठी मोगलांनी १ सहस्र वर्षे आणि ख्रिस्त्यांनी जवळपास २०० वर्षे अथक प्रयत्न केले. त्यांचे वंशज असलेले द्रमुकसारखे पक्ष आजही हे प्रयत्न करत आहेत. एवढे प्रयत्न करूनही सनातन धर्म कधी संपला नाही. यावरून त्याची महानता अधोरेखित होते. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा सनातन धर्मावर आघात झाले, तेव्हा तेव्हा या भूमीतूनच त्याच्या रक्षणासाठी महान विभूती उभ्या राहिल्या. आदि शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून हिंदु समाजाला एकत्र केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सनातन धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्त्य जगासमोर सनातन धर्माची महानता ठामपणे मांडून वैचारिक लढा दिला. अशी असंख्य उदाहरणे आहेत. या सर्वांमुळेच सहस्रो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सनातन धर्म आजही तितक्याच सामर्थ्याने आणि प्रखर तेजाने उभा आहे.

हिंदुद्वेषी प्रवृत्तींना रोखा ! 

उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वी केलेल्या विधानावर न्याययंत्रणेने त्यांना कानपिचक्या दिल्या. तथापि त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी यंदा विधानसभेत सनातनविरोधी विधान केले; कारण कायद्यानुसार विधानसभेत केलेल्या वक्तव्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. यावरून व्यवस्थेचा सनातनच्या विरोधात कसा वापर केला जातो ?, हे लक्षात येते. उदयनिधी स्टॅलिन सनातनला संपवण्याचे वक्तव्य करत असतांना एकाही सनातनी आमदाराने त्यावर आक्षेप घेतला नाही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय हेही शांतपणे ऐकत होते. यावरून तमिळनाडूत सत्ता पालटली; पण सनातनद्वेष मात्र कायम आहे, हेच दिसून आले. तेथील राज्यकारभाराची दिशा काय असेल ?, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले. आज हिंदुद्वेषी प्रवृत्तींनी सनातन संपवण्याचा विडा उचलला आहे. हे सनातन धर्मावरील संकटच आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी सनातन धर्मियांनी आपल्या महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. हिंदूंनी जशी चीड देवतांची नग्न चित्रे काढणार्‍या म.फि. हुसेन यांच्या विरोधात दाखवली, तशी उदयनिधी यांच्यासारख्या हिंदुद्वेषी प्रवृत्तींच्या विरोधात प्रत्येक स्तरावर दाखवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी देशभर त्यांच्या विरोधात पुन्हा पोलीस तक्रारी करणे, आंदोलने करणे, मोर्चे काढणे आदी केले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी न्यायालयात धाव घेऊन स्टॅलिन यांचा मुखवटा समोर आणला पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी स्टॅलिन यांच्या निलंबनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच ‘विधानसभेत जरी कुणी सनातनविरोधी वक्तव्य केले, तरी कारवाई होईल’, असा कायदा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासह सनातन धर्मरक्षक असलेल्या संतांनाही उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी राजकारण्यांवर दबाव आणला पाहिजे.

उदयनिधी यांच्यासारख्या हिंदुद्वेषी प्रवृत्ती आज सनातनविरोधी वक्तव्ये करत असल्या, तरी इतिहास हेच सांगतो की, सनातन धर्माला संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या विचारसरणी काळाच्या ओघात नष्ट झाल्या; पण सनातन धर्म आजही अढळपणे उभा आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे सनातनी हिंदूंनी जात, पंथ, भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन ‘सनातनी हिंदु’ म्हणून संघटित झाले पाहिजे. सनातनविरोधी शक्तींना वैचारिक आणि कायदेशीर पातळीवर पराभूत करणे, हीच काळाची आवश्यकता आहे. शेवटी ‘धर्मो रक्षति रक्षितः’ म्हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म रक्षण करतो, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे.

विधानसभेत किंवा लोकसभेत सनातनविरोधी वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई करण्याचा कायदा करणे आवश्यक !