संपादकीय : समाजवादी धर्मनिरपेक्षता !

श्रीराममंदिरातील दानचोरीच्या सूत्राचा योगी सरकारविरुद्ध  पुरेपूर राजकीय लाभ करून घेण्याचा प्रयत्न सध्या समाजवादी पक्ष करतांना दिसत आहे. समाजवादी पक्षाने बहुधा ‘मिशन राममंदिर’ असा फतवा काढला असावा. त्यामुळे त्यांचे नेते, प्रवक्ते, कार्यकर्ते आदींना उठता-बसता केवळ ‘रामनाम’ आठवत आहे. आज श्रीराममंदिरातील दानचोरीविषयी आवाज उठवणार्‍या सपावाल्यांनी एकेकाळी प्राणपणाने श्रीराममंदिराला विरोध केला होता. मुलायमसिंह सरकारच्या काळात कारसेवकांवर अमानुष गोळीबार करण्यात आला होता. श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे श्रीराममंदिराच्या दानचोरीविषयी उठवला जाणारा आवाज हा केवळ आणि केवळ राजकीय हेतूने आहे, हे जनता ओळखून आहे. उद्या ते सत्तेत आले, तर अयोध्येतील श्रीराममंदिराला पुन्हा क्षती पोचवू शकतात. ही तथाकथित समाजवादी धर्मनिरपेक्षता, म्हणजे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हिंदुद्वेषावर घातलेली झूल आहे. श्रीराममंदिराच्या दानचोरीविषयी बोलणारे समाजवादी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीविषयी चकार शब्द काढत नाहीत. नुकतेच बरेली येथील ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी एका पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळातील ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्याचा थेट आरोप केला आहे. या आरोपांविषयीही समाजवादी पक्षाने काही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे मुसलमानही बाजूने नाहीत आणि हिंदू तर नाहीच नाही, अशी काहीशी अवस्था समाजवाद्यांची झाल्याचे चित्र आहे.

रामनामच सत्य आहे !

दुसरीकडे योगी आदित्यनाथ मात्र एकांड्या शिलेदाराप्रमाणे सपाला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. त्यांनी सपाचा सेक्युरलवादाचा चेहरा उघड करून त्याला त्याची जागा दाखवून दिली आहे. ‘सर्वधर्मसमभावासाठी सपाने हनुमानगढीच्या पायर्‍यांवर नमाजपठण केले; पण मशिदीत हनुमानचालिसा पठण करण्याचे त्यांचे धाडस नाही’, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी सपाची दुटप्पी भूमिका उघडी पाडली. त्यामुळे श्रीराममंदिराच्या सूत्राचा राजकीय लाभ करून घेण्याचा विचार सपा करत असेल, तर तो त्यांचा भ्रमच कसा होता ?, हे येणारा काळ सांगेल. श्रीरामाचा कितीही द्वेष केला, श्रीराम काल्पनिक असल्याचे शपथपत्र दिले, तरी राजकारणासाठी का होईना, विरोधकांच्या तोंडी श्रीरामाचे नाव आले आहे, ही श्रीरामनामाची शक्ती आहे. श्रीरामाला कितीही विरोध केला, तरी या भारतभूमीच्या कणाकणांत श्रीराम अाहेत, भाविकांच्या मनामनात श्रीराम आहेत आणि सपावाल्यांनी कितीही ढोंग केले, तरी रामभक्त त्याला बधणार नाहीत. जीवनाचे हेच वास्तव आहे की, एखाद्याने जन्मभर रामनामाला कितीही विरोध केला, तरी हिंदु धर्मानुसार ‘राम नाम सत्य है’, या गजरातच शेवटची यात्रा निघते.