साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून स्वभावदोषांवर स्वयंसूचनांद्वारे मात करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बालपणीच्या काही प्रसंगांचा परिणाम मनावर असल्यामुळे मनात सुप्त अशी असुरक्षिततेची भावना असणे आणि साधनेत आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आधार देऊन नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे 

‘प्रत्येकाच्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग हे येतच असतात. त्याप्रमाणे माझ्याही जीवनात काही वेळा संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. बालपणीच्या काही प्रसंगांचा परिणामही माझ्या मनावर होता. त्यामुळे माझ्या मनात सुप्त अशी असुरक्षिततेची भावना होती. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर मला प्रत्येकच प्रसंगात प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) कायम आधार दिला आणि त्यातून सावरून घेतले. त्यांनी मला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आणि आजही तेच माझा सांभाळ करत आहेत.

श्री. योगेश जलतारे

२. मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यावर मनाला स्वयंसूचनेद्वारे समजावल्याने मन स्थिर आणि निश्चिंत होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया (स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी नियमितपणे चुका लिहून त्यावर मनाला स्वयंसूचना घेणे) राबवण्यास सांगितली  आहे. जेव्हा माझ्या मनात असुरक्षिततेचे विचार येतात, तेव्हा मी मनाला ‘आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच मला प्रत्येक प्रसंगात सांभाळले आहे आणि भविष्यातही तेच मला सांभाळणार आहेत’, या श्रद्धेने मी स्थिर आणि शांत राहीन’, अशी स्वयंसूचना देतो. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आहेत. त्यामुळे काळजी करू नकोस’, असे मनाला स्वयंसूचनेद्वारे समजावल्याने मन स्थिर आणि निश्चिंत होते.

३. त्रासदायक स्वप्ने पडणे आणि स्वयंसूचना घेतल्याचा झालेला लाभ

३ अ. रात्री वाईट स्वप्न पडणे किंवा वाईट शक्तींचा स्पर्श जाणवणे आणि दुसर्‍या दिवशी विविध त्रास होणे : ‘मागील वर्षभरात मी ही स्वयंसूचना सतत घेतली नाही, तरीही मला या स्वयंसूचनेचा एक निराळाच लाभ अनुभवता आला. मला रात्री झोपेत मधे मधे वाईट स्वप्न पडत किंवा ‘वाईट शक्तींचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवत असे. रात्री माझी प्राणशक्ती अल्प व्हायची. त्यामुळे दुसर्‍या दिवशी मला पुष्कळ थकवा येऊन दिवसभर अस्वस्थ जाणवत असे. मला धाप लागायची किंवा माझे डोके दुखत असे.

३ आ. मागील मासात वाईट स्वप्न पडणे; मात्र स्वभावदोषावर घेतलेल्या स्वयंसूचनेमुळे अंतर्मनाला असुरक्षिततेची जाणीव होताच ते सतर्क होणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा धावा करू लागल्यावर त्रासापासून रक्षण होणे : मागील मासातही मला २ वेळा अशी वाईट स्वप्ने पडली; मात्र या स्वप्नांचा शेवट सुखदायक होता. मी स्वप्नात प.पू. डॉक्टरांचा धावा करत असल्याचे मला जाणवायचे किंवा मला प.पू. डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन व्हायचे. ‘स्वप्नातच माझ्या अंतर्मनाला असुरक्षिततेची जाणीव होते आणि ते सतर्क होऊन प.पू. डॉक्टरांचा धावा करू लागते अन् माझे त्रासापासून रक्षण होते’, असे माझ्या लक्षात आले.

‘या अनुभूतीतून मला स्वयंसूचना घेण्याचे महत्त्व लक्षात आले आणि ते शास्त्र शिकवणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची थोरवी माझ्या लक्षात आली.’

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (८.४.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक