US Iran War : अमेरिकेकडून इराणवर पुन्हा बाँबफेक !

इराणने करार न केल्यास आणखी आक्रमण करण्याची ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या सैन्याने युद्धविराम मोडून इराणवर पुन्हा बाँबफेक केली, अशी माहिती इराणी सरकारी माध्यम ‘प्रेस टीव्ही’ने दिली.

‘प्रेस टीव्ही’च्या नुसार, खातम अल्-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेच्या सैन्याने जास्कजवळच्या इराणी सागरी सीमेतून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणार्‍या एका तेल टँकरला लक्ष्य केले. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणला चेतावणी दिली की, ‘जर इराणने करार केला नाही, तर आम्ही आणखी आक्रमणे करू.’ दुसरीकडे  ट्रम्प यांनी मात्र ‘इराणने अमेरिकेच्या युद्धनौकांवर आक्रमण केले’, असा आरोप केला आहे. ते म्हणाले की, यानंतर दोन्ही देशांमध्ये गोळीबार झाला आणि यात आम्ही त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले, तसेच त्यांच्या अनेक लहान नौका बुडवल्या. आम्ही इराणला अणूबाँब बाळगण्याचा अधिकार देणार नाही आणि इराणनेही याविषयी सहमती दर्शवली आहे, असा दावाही त्यांनी केला.

हॉर्मुझमध्ये १ सहस्र ५०० नौका अडकल्या !

संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संस्थेचे महासचिव आर्सेनियो डोमिंगेज यांनी सांगितले आहे की, हॉर्मुझ संकटामुळे आखाती प्रदेशांत अनुमाने १ सहस्र ५०० नौका अडकल्या आहेत. या नौकांसमवेत चालक दलाचे २० सहस्र सदस्य, म्हणजेच खलाशीदेखील अडकले आहेत.