अमेरिकेच्या प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांनी हिंदु धर्माचे केलेले संतापजनक अश्‍लीलीकरण !

या लेखमालिकेतील २६ एप्रिल या दिवशीच्या भागात आपण वाचले की, अमेरिकेतील विद्यापिठांतून हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांच्याविषयी द्वेषपूर्ण अहवाल प्रकाशित केले जातात, तसेच अमेरिकेत ‘हिंदुत्वनिष्ठांशी संपर्क ठेवू नका’ असे सूचनावजा आदेशही काढले जातात. अमेरिकेत वास्तव्यास असणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभ्यासक आणि ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. राजीव मल्होत्रा यांनी त्यांच्या संशोधनातून या भयानक बौद्धिक आक्रमणाचे जे पदर उलगडले आहेत, ते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातील काही भाग या मालिकेतील लेखांमध्ये सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

आता आपण अमेरिकेच्या शिकागो विद्यापिठातील ‘वेंडी डॉनिगर’ या अत्यंत विकृत कथित विचारवंत प्राध्यापिकेने हिंदु देवता, धर्मग्रंथ आणि प्रतिके यांचे ‘सिग्मंड फ्रॉईड’ या मानसशास्त्रज्ञाच्या मनोविश्‍लेषणाची पद्धत वापरून विकृत आणि अश्‍लील अर्थ लावले आहेत, त्याची उदाहरणे पाहू. यातून ‘हिंदु धर्म’ ही विकृती असल्याचे भयावह कथानक जगात प्रसृत करण्याचा कुटील डाव या गोर्‍या वर्चस्ववादी ख्रिस्त्यांकडून आखण्यात आला आहे, हे आपणास लक्षात येईल.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1033928.html

१. पाश्‍चात्त्य विद्यापिठांच्या प्रयोगशाळेत हिंदुत्वाच्या मोडतोडीचे कूटकारस्थान !

आज जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म यांचा डंका वाजत आहे. एकीकडे त्याचे आर्थिक आणि सामरिक महत्त्व वाढत आहे. दुसरीकडे अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापिठांच्या बंद दरवाजांच्या आड मात्र एक वेगळाच खेळ चालू आहे ! ‘हार्वर्ड’पासून ‘शिकागो’ विद्यापिठापर्यंत त्यांच्या ‘इंडॉलॉजी’ (भारतीय इतिहास, संस्कृती, भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान आदींचा अभ्यास) विभागांमध्ये हिंदु धर्मग्रंथ, देवता आणि परंपरा यांचे जे विश्‍लेषण केले जाते, ते वाचल्यावर कोणत्याही सामान्य हिंदूला धक्का बसल्याखेरीज रहाणार नाही. ज्याला आपण ‘श्रद्धा’ मानतो, त्याला तिथे ‘विकृती’ ठरवण्याचे अतिशय पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत.

२. हिंदु धर्माचा अभ्यास आध्यात्मिक नव्हे, तर विकृत पाश्‍चात्त्य दृष्टीकोनातून !

खरेतर हिंदु देवता, धर्मग्रंथ, प्रतिके यांचा अभ्यास हा आध्यात्मिक दृष्टीकोनातून होणे अपेक्षित होते; मात्र अमेरिकेतील विद्यापिठांतून तो पाश्‍चात्त्यांच्या समाजशास्त्राचे नियम आणि पाश्‍चात्त्य मनोविज्ञान यांच्या दृष्टीकोनातून करण्यात आला.

श्री. नागेश जोशी

पुढील प्रमुख (कथित) सिद्धांतांच्या आधारे हिंदु धर्माचे विकृत विश्‍लेषण करण्यात आले आहे, तसेच अजूनही केले जात आहे :

अ. सिग्मंड फ्राईडचे (लैंगिक) मनोविश्‍लेेषण

आ. सांस्कृतिक मार्क्सवाद

इ. नवहिंदुत्व (म्हणजे हिंदु धर्म हा प्राचीन नसून आधुनिक आहे)

ई. धर्माची इतिहासकेंद्रीतता (म्हणजे हिंदु धर्मातील कथा-पुराणे यांचे ऐतिहासिक पुरावे नसल्याचे सांगून हा इतिहास नसून कपोलकल्पित कथा (मायथॉलॉजी) आहेत, असे चित्र रंगवणे)

३. ‘फ्रॉईडियन मनोविश्‍लेषण’ पद्धत वापरून हिंदु देवता आणि प्रतिके यांचे अश्‍लीलीकरण करणार्‍या वेंडी डॉनिगर !

पाश्‍चात्त्य बौद्धिक आक्रमणाचा सर्वांत प्रभावशाली आणि सर्वाधिक चर्चित चेहरा, म्हणजे शिकागो विद्यापिठाच्या प्राध्यापिका वेंडी डॉनिगर. त्यांनी संस्कृत भाषेचा आणि हिंदु पुराणांचा अभ्यास करण्यात ५ दशके घालवली; परंतु हा अभ्यास ‘तटस्थ’ किंवा ‘आदरयुक्त’ कधीच नव्हता. त्यांच्या संपूर्ण संशोधनाचा आत्मा म्हणजे ‘सिग्मंड फ्रॉईड याच्या मनोविश्‍लेषणाचा वापर करून हिंदु श्रद्धांचे पद्धतशीर अश्‍लीलीकरण !’

सिग्मंड फ्रॉईड हा १९ व्या शतकातील ऑस्ट्रियातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता. त्याने ‘जीवनातील अनेक गोष्टींचे मूळ लैंगिक इच्छांमध्ये असते’, असा सिद्धांत मांडला आहे.

४. फ्राईडचा मनोविश्‍लेषणाचा (‘फ्रॉईडियन सायकोअ‍ॅनॅलिसिस’चा) सिद्धांत काय होता ?

डॉनिगर यांनी हिंदु धर्माचे केलेले विकृतीकरण समजून घेण्यासाठी फ्रॉईडचा सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे. फ्रॉईडच्या अनेक सिद्धांतांपैकी एक, म्हणजे ‘माणसाच्या अचेतन मनात बालपणापासून दडलेल्या लैंगिक इच्छा, आघात आणि भावना जेव्हा बाहेर पडत नाहीत, तेव्हा त्या मानसिक आजाराच्या रूपात प्रकट होतात. त्या उकलून दाखवणे म्हणजेच मनोविश्‍लेषण.’ मानसिक रोग्यासाठी असलेली ही मनोविश्‍लेषण पद्धत वेंडी डॉनिगर यांनी हिंदु देवता, ग्रंथ आणि प्रतिके यांच्यासाठी वापरली.

५. पुराणातील कथांचा अर्थ लावतांना त्या लैंगिक दडपशाहीचे प्रकटीकरण असल्याचा सिद्धांत लावणे

डॉनिगर यांनी फ्रॉईडीयन मनोविश्‍लेषणाची पद्धत वापरून पुराणांतील अनेक कथांना लैंगिक दडपशाहीचे (‘सेक्शुअल रिप्रेशन’चे) परिणाम मानले आहे. उदाहरणार्थ देवतांमधील नात्यांचे विश्‍लेषण करतांना त्यांनी ‘ओडिपस कॉम्प्लेक्स’ यांसारख्या पाश्‍चात्त्य सिद्धांतांचा वापर केला, ज्यांचा भारतीय संस्कृतीशी सुतराम संबंध नाही. ‘ओडिपस कॉम्प्लेक्स’ सिद्धांतानुसार मुलांमध्ये विरुद्ध लिंगाच्या पालकांविषयी (आई किंवा वडील) आकर्षण आणि समान लिंगाच्या पालकांविषयी स्पर्धा किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण होते.

अमेरिकेच्या प्राध्यापिका वेंडी डॉनिगर

६. डॉनिगर स्वतः मानसोपचारशास्त्रात प्रशिक्षित नसणे

यातील सर्वांत गंभीर, म्हणजे डॉनिगर या स्वतः मानसशास्त्र वा मानसोपचार यांत प्रशिक्षित नाहीत. त्यांनी हे स्वतःही मान्य केले आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण संशोधन, म्हणजे ‘एका आंधळ्याने मार्ग दाखवणे’, असा प्रकार आहे.

त्यांचा प्रसार करणारे जगभरातील त्यांचे शिष्यही मानसशास्त्र वा त्याची उपचारपद्धत शिकलेले नाहीत, असे त्यांना विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरातून स्पष्ट झाले.

७. शिवलिंगाचे वर्णन केवळ ‘शारीरिक अवयव’ या अर्थाने करणे

पुराणांमध्ये ‘शिवाचे लिंग’ हे ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे आणि निराकार ईश्‍वराचे प्रतीक मानले जाते; मात्र डॉनिगर यांनी त्याचा आध्यात्मिक संदर्भ पूर्णपणे काढून त्याचे वर्णन केवळ एक ‘शारीरिक अवयव’ (pha1lus) असे केले, जेणेकरून ते पाश्‍चात्त्य वाचकांसाठी केवळ एक लैंगिक कुतूहलाचा विषय ठरेल. (हिंदु धर्मातील आध्यात्मिक प्रतिकांचा अर्थ आणि त्याचे महत्त्व कळण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे ! – संकलक)

८. हिंदूंचा पर्यायी नव्हे, तर विकृत इतिहास मांडला

डॉनिगर यांची त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची कृती वर्ष २००९ मध्ये ‘द हिंदूज : अ‍ॅन अल्टर्नेटिव्ह हिस्ट्री’ (हिंदूंचा पर्यायी इतिहास) नावाचे पुस्तक लिहिले. हिंदूंच्या इतिहासातील दाखल्यांचे पर्यायी अर्थ देण्याचा बहाणा करून डॉनिगर यांनी हे पुस्तक लिहिले आहे; परंतु प्रत्यक्षात हा एक ‘पर्यायी’ नव्हे, तर ‘विकृत’ इतिहास झाला आहे. हे पुस्तक म्हणजे हिंदूंवरील बौद्धिक आक्रमणाचे ठळक उदाहरण आहे. या पुस्तकात त्यांनी हिंदु धर्माचा इतिहास सांगितल्याचा दावा केला आहे.

भारतात पुस्तकावर बंदी; परंतु विचारबीज पेरले गेलेच !

या पुस्तकाच्या विरोधात भारतात ‘शिक्षा बचाओ आंदोलन समिती’ने न्यायालयात खटला प्रविष्ट केल्यानंतर वर्ष २०१४ मध्ये ‘पेग्विंन इंडिया’ने हे पुस्तक भारतीय बाजारातून मागे घेतले; पण जगात इतरत्र ते उपलब्ध आहे. येथे महत्त्वाचे सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे ते, म्हणजे पुस्तक मागे घेतल्याने समस्या संपलेली नाही; कारण डॉनिगर यांनी जे विचारबीज पेरले आहे, ते आता त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या वतीने जगभरातील विद्यापिठांमध्ये रुजले आहे. – श्री. नागेश जोशी

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

९. हिंदूंच्या अत्युच्च आध्यात्मिक परंपरेला ‘सत्तासंघर्षा’चे आणि ‘लैंगिक प्रतीकवादा’चे माध्यम म्हणून सादर करणे

वास्तवात या पुस्तकात वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यांतील प्रसंग आणि देवतांच्या कथा यांचे विश्‍लेषण करतांना सातत्याने लैंगिक दृष्टीकोन वापरला आहे. भगवान शिव, श्रीकृष्ण, गणपति या देवतांच्या कथांना फ्रॉईडच्या ‘दडपलेल्या कामवासने’चा सिद्धांत लावून (फ्रॉईडियन मनोविश्‍लेषण करून) त्या कथा सांगितल्या. यात असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, त्या कथा, म्हणजे दडपलेल्या कामभावनेची प्रतिके आहेत. या पुस्तकात हिंदु स्त्रियांच्या प्रतिमेला पीडित, उपभोग्य वस्तू किंवा उपभोगाचे साधन म्हणून चित्रित केले आहे. सहस्रो वर्षांच्या हिंदूंच्या अत्युच्च आध्यात्मिक परंपरेला ‘सत्तासंघर्षा’चे आणि ‘लैंगिक प्रतीकवादा’चे माध्यम म्हणून त्यांनी सादर केले.

पुढील भागात डॉनिगर यांच्या विकृत विचारांचा प्रसार जगभर आणि भारतात कसा झाला आहे, ते पाहू.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती, पुणे.