श्री कूर्मावताराची आध्यात्मिक वैशिष्ट्ये ! 

‘आतापर्यंत विविध युगांमध्ये विविध देवतांचे अनेक अवतार झाले आहेत. त्यांनी आसुरी शक्तींचा नाश करून भक्तांचे आणि भूमातेचे नेहमी रक्षणच केले आहे. या सर्व अवतारांमध्ये श्रीविष्णूचे दशावतार सर्वत्र विख्यात आहेत. यांतील दुसरा अवतार म्हणजे ‘कूर्मावतार’. त्याच्याविषयी आपल्यापैकी बहुतेकांना अत्यल्प माहिती आहे. १.५.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात सूक्ष्म-ज्ञानातून उमजलेले ‘श्री कूर्मावताराविषयीचे गूढ रहस्य आणि विस्तृत ज्ञान’ यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1035507.html

श्री कूर्म

५. कूर्मावताराशी संबंधित अन्य सूत्रे

समुद्रमंथनाच्या वेळी कूर्मावतार स्थुलातून प्रगट झाला होता; परंतु त्याची आवश्यकता भासल्यावर विविध युगांमध्ये तो सूक्ष्मातून कार्यरत होतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

सुश्री मधुरा भोसले

५ अ. समुद्राच्या जलामध्ये श्री कूर्मावताराचे प्रत्यक्ष अस्तित्व असल्यामुळे अनेक जलचर प्राण्यांचे हलाहल विषाच्या दुष्परिणामांपासून रक्षण होणे : कूर्मावताराच्या भोवती सोनेरी रंगाचे दिव्य आभामंडल कार्यरत होते. त्यामुळे जेव्हा समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून हलाहल विष बाहेर पडले, तेव्हा कूर्मावतारावर त्याचा अत्यल्प परिणाम होऊन त्याची कांती गडद निळसर रंगाची झाली. त्याचप्रमाणे समुद्राच्या जलामध्ये श्री कूर्मावताराचे प्रत्यक्ष अस्तित्व असल्यामुळे अनेक जलचर प्राण्यांचे हलाहल विषाच्या दुष्परिणामांपासून रक्षण झाले.

५ आ. श्री कूर्मावताराचे मारक कार्य : समुद्रमंथनानंतरच्या काळात कूर्मावताराच्या नखांमध्ये त्याची मारक शक्ती असल्यामुळे तो आक्रमणे करणार्‍या असुरांवर या तीक्ष्ण नखांनी प्रहार करतो.

५ इ. श्री कूर्मावताराचे भक्तवत्सल स्वरूप : कूर्मावतार मुळात श्रीविष्णूचा सौम्य आणि तारक स्वरूपातील अवतार आहे. त्यामुळे त्याची दृष्टी शांत आणि करुणामय आहे. कूर्मावतार हा श्रीविष्णूप्रमाणे भक्तवत्सल असल्यामुळे त्याला श्रीविष्णूचे भक्त अत्यंत प्रिय असून तो वेळोवेळी त्यांचे रक्षण करतो.

५ ई. कूर्मगतीचे आध्यात्मिक महत्त्व : श्री कूर्मावताराची गती मंद आहे; म्हणून त्या गतीला ‘कूर्म गती’, असे संबोधले जाते. ‘कूर्म गतीचा’ भावार्थ आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सखोल आणि अंतर्मुख करणारा आहे. ‘कूर्म गती’ ही जरी स्थुलातून मंद गती दर्शवत असली, तरी सूक्ष्मातून ती धैर्य, स्थैर्य आणि लयबद्ध गती आहे. ही गती आध्यात्मिक क्षेत्रात मार्गक्रमण करतांना प्रत्येक पाऊल घाईगडबडीत न टाकता ते विचारपूर्वक आणि मन अन् बुद्धी यांना स्थिर ठेवून टाकण्याची शिकवण देते.

५ उ. कूर्मावताराकडून इंद्रियांवर नियंत्रण मिळवून जितेंद्रिय बनण्याची प्रेरणा मिळणे : जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, तेव्हा कूर्म त्याचे हात आणि पाय, तसेच मान अन् डोके आत, म्हणजे कवचात घेतो. हे त्याच्यातील इंद्रियसंयम करणार्‍या जितेंद्रिय स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला कूर्म-अवताराकडून इंद्रियांच्या आधीन होऊन विषयवासनेच्या भोगात न अडकता, सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवून जितेंद्रिय बनण्याची प्रेरणा मिळते.

६. श्री कूर्मावताराचे विविध युगांतील महनीय कार्य

७. गुरुरूपी कूर्मावताराचा शिष्यपरिवार

श्रीविष्णूचा दुसरा अवतार ‘श्री कूर्मावतार’ हा ज्ञानमय असल्याने तो गुरुस्वरूप आहे. या गुरुरूपी कूर्मावताराचा वरुणदेव, समुद्रदेव, विविध नदीदेवता आणि पवित्र सरोवरे हे शिष्य आहेत. त्यांना गुरुरूपातील कूर्मावताराकडून प्राप्त झालेल्या दिव्य ज्ञानामुळे ते त्यांचे जनकल्याणाचे कार्य अविरतपणे करत आहेत आणि जलातील सात्त्विकता अन् चैतन्य टिकून रहाण्यासाठी प्रयत्नरत असतात. अशा प्रकारे कूर्मावताराची धर्मसत्ता विश्वातील समस्त जलांचे स्रोत आणि विविध स्वरूपे यांच्यावर असल्यामुळे श्रीविष्णूच्या पालन-पोषणाच्या कार्याला गती लाभलेली आहे.

८. मत्स्यावतार आणि कूर्मावतार हे वरुणदेवाप्रमाणे एक प्रमुख जलदेवता अन् विश्वातील समस्त जलांची संरक्षकदेवता असणे

मत्स्यावताराप्रमाणे कूर्मावताराचे जलावर नियंत्रण आहे, म्हणजे आपतत्त्वावर अधिपत्य आहे. त्यामुळे समस्त जलस्रोत हे वरुणदेवासह मत्स्यावतार आणि कूर्मावतार यांच्या आधीन आहेत. त्यामुळे मत्स्यावतार आणि कूर्मावतार हे वरुणदेवाप्रमाणे एक प्रमुख जलदेवता आहेत. जलोपासना करणारे साधक वरुणदेवासह कूर्मदेवाचेही पूजन करून त्याचे कृपाशीर्वाद प्राप्त करतात. मत्स्यावतार आणि कूर्मावतार या विश्वातील समस्त जलस्रोतांच्या संरक्षकदेवता आहेत.

९. कूर्म नारायण

कूर्मावतारामध्ये श्रीविष्णूचे अनेक गुण सामावलेले आहेत. त्यामुळे कूर्मावताराला विष्णुभक्त आदराने ‘कूर्म नारायण’, असे संबोधतात. हा कूर्म नारायण सर्व दैवी गुणांनी संपन्न असल्यामुळे तो नारायणाप्रमाणे परिपूर्ण आहे.

१०. श्रीविष्णूच्या मंदिरांत गाभार्‍यापुढे ‘कूर्माची’, म्हणजे ‘कासवाची’ पितळ्याची किंवा दगडाची प्रतिमा भूमीवर स्थापन केलेली असण्यामागील कार्यकारणभाव

भक्तवत्सल कूर्म नारायणाचे त्याच्या भक्तांना नित्य स्मरण होण्यासाठी श्रीविष्णूच्या मंदिरांत गाभार्‍याच्या पुढे ‘कूर्माची’, म्हणजे कासवाची पितळ्याची किंवा दगडाची प्रतिमा भूमीवर स्थापन केलेली असते. या प्रतिमेकडे पाहून आपल्यामध्येही कूर्मावताराप्रमाणे विनम्रभाव आणि समर्पणभाव जागृत होतात. त्यामुळे भक्तातील ‘भक्तीचा’ सूक्ष्म अहंकार गळून पडतो आणि भक्त मंदिराच्या गाभार्‍यातील श्रीविष्णूचे भावपूर्ण दर्शन घेऊन कृतार्थ होतो.

११. सर्व भक्तांवर असे कूर्मावतार कृपावंत ।

श्रीविष्णूच्या कार्याचे गूढ असे मर्म ।
ते जाणतो एकमात्र अवतार कूर्म ।। १ ।।

दशावतार धारण करून भक्तांना तारले लक्ष्मीनारायणाने ।
समुद्रमंथन यशस्वी केले साक्षात् कूर्म नारायणाने ।। २ ।।

पाठीवर मंदार पर्वत धारण करून दिला आधार ।
अमृतकुंभ प्रगट झाल्यावर दूर झाला विषरूपी अंधार ।। ३ ।।

कूर्म-अवतार असे सहनशीलता आणि स्थिरता यांचे प्रतीक ।
त्याचे दैवी स्वरूप असे अत्यंत मनमोहक आणि सात्त्विक ।। ४ ।।

संपूर्ण विश्वात असती श्रीविष्णूचे अनंत भक्त ।
त्या सर्व भक्तांवर असे कूर्मावतार कृपावंत ।। ५ ।।

‘आम्हा साधकांवर श्री कूर्मावताराची कृपा अशीच राहो आणि श्री कूर्मावताराने आम्हा साधकांना या घोर आपत्काळात तारून न्यावे’, हीच श्री कूर्मावताराच्या चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १७.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.