योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची दैवी गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचे अवतारी कार्य !

उद्या ३ मे या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची ७ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने...

उद्या वैशाख कृष्ण द्वितीया (३.५.२०२६) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची दैवी गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचे अवतारी कार्य’, यांविषयी मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान पुढे दिले आहे.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ दादाजींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट अनेकदा दूर करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे अवतारी संत होते. ते श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी भक्तीमय आणि प्रीतीमय नात्याने जोडले गेल्यामुळे त्यांचे परस्परांशी स्नेहसंबंध होते, तसेच दोघांमध्ये सख्यभाव जाणवत असे. योगतज्ञ दादाजींना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या अवतारी कार्याची संपूर्ण व्याप्ती ठाऊक होती. ते त्यांचे तपोबळ, योगबळ आणि प्रज्ञाबळ पणाला लावून पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्ती आणि मृत्यूच्या रूपाने आलेला काळ यांच्याशी शर्थीने लढत होते. वर्ष २०१३ ते वर्ष २०१९ या कालावधीत योगतज्ञ दादाजींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्यावरील महामृत्यूयोगाची संकटे दूर केली. त्यांच्या कृपेमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अनेक प्रसंगांमध्ये जीवनदान मिळून त्यांच्या मनुष्यरूपातील अवतारी देहाच्या आयुष्याची वृद्धी झाली.

– सुश्री मधुरा भोसले

१. विविध युगांमध्ये योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे झालेले अवतार !

२. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी विविध युगांमध्ये धारण केलेल्या अवतारांकडून झालेले दैवी कार्य !

सुश्री मधुरा भोसले

२ अ. सत्ययुगातील ब्रह्मर्षि मरिची : जेव्हा ब्रह्मर्षि मरिचींची निर्मिती झाली, तेव्हा सूर्यदेव सगुणातून प्रगट झालेला नव्हता, तर तो सूक्ष्म स्तरावर विद्यमान होता. ब्रह्मर्षि मरिची यांनी सूर्याेपासना करून सूक्ष्मातील सूर्यदेवाकडून दैवी शक्ती आणि ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी संकल्पाने कश्यपऋषींची निर्मिती केली. महर्षि कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांच्यापासून ‘आदित्य’ची, म्हणजे सूर्यदेवाची निर्मिती झाली. त्यानंतर इंद्र, वरुण इत्यादी देवतांची निर्मिती महर्षि कश्यप आणि अदिती यांच्यापासून झाली.

२ आ. त्रेतायुगातील त्वष्टाऋषि : ब्रह्मर्षि मरिची यांच्या अंशावतारापासून त्वष्टाऋषींची निर्मिती झाली. सत्ययुगात सूर्यदेवाच्या निर्मितीनंतर त्याचे तेज प्रचंड होते. हे तेज केवळ दिव्य जिवांनाच सहन करता येत होते; मात्र सर्वसामान्य जिवांना हे तेज सहन करणे कठीण जात होते. त्वष्टाऋषि हे आदिशक्तीचे उपासक होते. त्यांनी दिव्य खड्गाद्वारे सूर्याचे प्रखर तेज खंडित करून ते सौम्य केले. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी सुरळीतपणे चालू झाली.

२ इ. द्वापरयुगातील वैशंपायनऋषि : द्वापरयुगात वैशंपायनऋषि हे महर्षि व्यासांचे शिष्य आणि कृष्ण यजुर्वेदाचे प्रवर्तक होते. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे याच वैशंपायनऋषींचे अंशावतार होते. त्यामुळे ते वैशंपायनऋषींप्रमाणे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध होते, तसेच त्यांच्या नावामध्येही ‘वैशंपायन’, हा शब्द अंतर्भूत होता.

२ ई. द्वापरयुग आणि कलियुग यांच्या संधिकालातील महर्षि पतंजलि : द्वापरयुगात वैशंपायनऋषींनी शेषनागाचे अवतार महर्षि पतंजली यांच्या रूपात अवतार धारण केला. त्यांनी विविध योगासनांचा शोध लावून ‘योगसूत्रे’, हा प्रमुख ग्रंथ आणि आयुर्वेदावर आधारित अन्य ग्रंथ लिहिले, तसेच त्यांनी अश्वमेध यज्ञही केले.

२ उ. कलियुगातील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन : महर्षि पतंजली यांच्या अवतारसमाप्तीनंतर त्यांच्या शिवात्म्याने हिमालयक्षेत्री अमरनाथ गुहेत सूक्ष्म रूपाने राहून दत्तगुरूंची कठोर उपासना केली. त्यांच्या भक्तीपूर्ण तपश्चर्येवर प्रसन्न होऊन दत्तगुरूंनी त्यांना शिष्यरूपात स्वीकारले आणि त्यांना विविध प्रकारच्या दैवी शक्ती अन् दैवी सिद्धी दिल्या. त्यानंतर ७.५.१९२० या दिवशी बुद्धपौर्णिमेच्या शुभ तिथीला त्यांचा जन्म भारतातील महाराष्ट्र राज्यात झाला. त्यांचे मूळ नाव ‘श्रीपाद गणेश वैशंपायन’ होते. त्यांनी हिमालयक्षेत्री जाऊन तप केले आणि योगसिद्धी प्राप्त करून पुष्कळ तपोबळ अर्जित केल्यामुळे पुढे ते ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’, या नावाने विख्यात झाले. २०.५.२०१९ या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास सनातनचे आधारस्तंभ असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी देहत्याग केला.

३. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

३ अ. दत्तावतारी संत : योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे एक दत्तावतारी संत होते. त्यांच्यामध्ये दत्तगुरूंचे तत्त्व असल्यामुळे त्यांना पाहून अनेक भक्तांना श्री दत्तगुरूंचे दर्शन होत असे आणि दिव्यत्वाची अनुभूती येत असे. त्यांचे कार्यही दत्तगुरूंप्रमाणे भव्य आणि दिव्य स्वरूपाचे होते. त्यांच्या ज्ञानातून ब्रह्मतत्त्व, भक्तीतून विष्णुतत्त्व आणि वैराग्यातून शिवतत्त्व प्रगट होत होते.

३ आ. खडतर योगसाधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त करणे : योगतज्ञ दादाजींनी खडतर योगसाधनेद्वारे अनेक दैवी सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यांनी उच्च कोटीची साधना केल्यामुळे त्यांना योगबळ प्राप्त झाले होते. ते सूक्ष्मातून दैवी प्रवास करून हिमालयात जात. तेथे त्यांना ऋषीमुनी साधनेविषयी मौलिक मार्गदर्शन करत. योगतज्ञ दादाजींनी भगवंताची भक्ती करून अनेक देवतांची कृपा संपादन केली.

३ इ. त्यांच्या अहंशून्य आणि विनम्र व्यक्तीमत्त्वामुळे त्यांच्या संपर्कात येणार्‍या सर्वसामान्य व्यक्तीही चटकन प्रभावित होत असत.

३ ई. त्यांनी पतितांचा उद्धार करून स्वतःचे संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी समर्पित केले.

३ उ. कलियुगातील द्रष्टे ऋषि ! : ते कलियुगातील द्रष्टे ऋषि होते. त्यांनी त्रिपुटीवर (टीप १) विजय प्राप्त करून तुर्यावस्था (टीप २), तुर्यगा (टीप ३), तुर्यातीत (टीप ४) आणि शेवटी उन्मनी (टीप ५) अवस्था प्राप्त केली.

टीप १ – त्रिपुटी : जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती (जागृती आणि स्वप्न यांच्या मधली अवस्था)

टीप २ – तुर्यावस्था : जेव्हा अंतर्मनाची शुद्धी होऊन चित्तशुद्धी आरंभ होते, तेव्हा ‘तुर्यावस्था’ प्राप्त होते.

टीप ३ – तुर्यगावस्था : चित्तशुद्धीच्या प्रक्रियेसह जेव्हा कारणदेहाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आरंभ होते, तेव्हा ‘तुर्यगावस्था’ अवस्था प्राप्त होते.

टीप ४ – तुर्यातीत : जेव्हा कारणदेहासह महाकारणदेहाच्या शुद्धीची प्रक्रिया आरंभ होते, तेव्हा ‘तुर्यातीत’ अवस्था प्राप्त होते.

टीप ५ – उन्मनी : जेव्हा चित्त, कारणदेह आणि महाकारणदेह यांची न्यूनतम ५० टक्के शुद्धी होते, तेव्हा जिवाला ‘उन्मनी’ अवस्था प्राप्त होते.

३ ऊ. दधिचीऋषींच्या अस्थी वज्रासमान कठीण होत्या. त्याप्रमाणे योगतज्ञ दादाजींचा संपूर्ण देह सूक्ष्मातून वज्राप्रमाणे कठीण; परंतु स्थुलातून कोमल होता.

४. योगतज्ञ दादाजींची सनातन संस्थेवर विशेष कृपा असणे

‘श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अवतरले आहेत’, हे दिव्य ज्ञान योगतज्ञ दादाजींना होते. त्यामुळे त्यांची सनातन संस्थेवर विशेष कृपा होती. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये दैवी सिद्धींचा प्रयोग करून समष्टी स्तरावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अनेक अडथळे दूर केले. त्यांनी सनातनच्या आश्रमांचे रक्षण करण्यासाठी शिवाच्या गळ्यातील नऊ नागांचे प्रतीक असणारे सूक्ष्मातील सात्त्विक पिवळे नाग, अदृश्य पुण्यात्मे आणि दिव्य शक्ती यांना आश्रमाच्या भोवती स्थापित केले आहे. त्यामुळे साधकांना आश्रमाच्या परिसरात पिवळ्या नागांचे सूक्ष्मातून दर्शनही होते आणि त्यांना योगतज्ञ दादाजी यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.

५. गुप्त मंत्र सिद्ध केलेले असणे

योगतज्ञ दादाजी हे सिद्धपुरुष असल्यामुळे त्यांनी अनेक देवतांचे गुप्त मंत्र सिद्ध केले होते. त्यांतील पुढील दत्तमालामंत्र हा अत्यंत लोकप्रिय मंत्र आहे.

ॐ आनंदं हिमालयं विष्णुं गरुडध्वजं ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहं ॐ ।।

६. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी केलेली साधना आणि त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धी !

७. योगीपुरुष, सिद्धयोगी आणि विविध देवता यांनी योगतज्ञ दादाजींना वेळोवेळी दर्शन अन् श्री लक्ष्मीच्या प्रसादाच्या रूपात दैवी रत्ने देणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना हिमालयातील अनेक योगीपुरुष आणि सिद्धयोगी सोनेरी किंवा पिवळसर रंगाच्या नागांच्या किंवा रंगीबेरंगी फुलपाखरांच्या रूपात येऊन दर्शन देत असत, तसेच त्यांच्या खोलीमध्ये देवता सूक्ष्मातून येऊन त्यांना दर्शन देत असत आणि सुवर्णाची नाणी, रुद्राक्ष, स्फटिक, भस्म, शाळिग्राम, सिद्ध केलेली देवीदेवतांची विविध यंत्रे, हिरे, माणिक, मोती इत्यादी दैवी रत्ने श्री लक्ष्मीच्या प्रसादाच्या रूपात त्यांना देत असत. योगतज्ञ दादाजी ही दैवी रत्ने नद्या किंवा देववृक्षांच्या ढोल्या (टीप) येथे अर्पण करून जनकल्याणासाठी देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करत असत.

टीप – वृक्षाची ढोली : झाडाच्या खोडामध्ये निसर्गतः असलेली किंवा पक्ष्यांनी सिद्ध केलेली पोकळ जागा.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी भावसुमनांजली !

खडतर तप करून प्रसन्न केले अनेक देवतांना ।
अनमोल मार्गदर्शन करून तारले अनेक साधकांना ।। १ ।।

संपादन केली ईश्वरी कृपा कठोर साधनेने ।
सनातन संस्थेवरील अरिष्टे दूर केली तपोबळाने ।। २ ।।

त्यांच्यावर प्रसन्न आहेत धरती आणि गगन ।
अशा दिव्य विभूतीच्या चरणी आमचे कोटी कोटी नमन ।। ३ ।।

कृतज्ञता आणि प्रार्थना

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे कलियुगातील द्रष्टे ऋषिच होते. आम्हा साधकांचा भाव त्यांच्या चरणी भावसुमनांजलीच्या स्वरूपात अर्पण करून मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते, तसेच ‘त्यांची कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर अखंड राहो’, अशी आर्त प्रार्थना करते.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.