Christian Songs In Temple :  केरळम्‌मधील मंदिरात ख्रिस्ती भक्तीगीताचे गायन : हिंदु संघटना संतप्त !

मंदिराच्या उत्सवात ख्रिस्ती भक्तीगीत गायल्याने वाद

कोट्टायम (केरळम्‌) – येथील श्री महाविष्णु मंदिराच्या उत्सवात एका भजनी मंडळाने ख्रिस्ती भक्तीगीत गायल्याने आता मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदु संघटना आणि प्रमुख नेते यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

१. मंदिराच्या कार्यक्रमात ‘नंदगोविंदम्’ नावाचे भजन हे मंडळ सादरीकरण करत होते. या वेळी मंडळाचे मुख्य गायक नवीन मोहन म्हणाले की, स्थानिक चर्चने या उत्सवासाठी वाहनतळासह अनेक सुविधा देऊन सहकार्य केले आहे. धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून आम्ही हे गाणे समर्पित करत आहोत. यानंतर मंडळाने ख्रिस्ती भक्तीगीत गायले.

२. या कृतीचे समर्थन करतांना नवीन मोहन म्हणाले की, जेव्हा मंदिरात दीप प्रज्वलित केला जातो, तेव्हा चर्चमध्येही दीप प्रज्वलित केला जातो. या सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही ते गाणे गायले. भक्ती धर्मांच्या पलीकडची आहे.

३. भजनी मंडळाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसारित करून स्पष्टीकरण देतांना सांगितले की, आम्ही कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाही; कारण आम्हाला तिथे कोणतीही मर्यादा दिसलीच नाही. कुणाचेही मन दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.

४. मंदिर समितीही भजन मंडळाच्या पाठीशी उभी राहिली आहे. ‘विविध धर्मांचे लोक मंदिराच्या उपक्रमांमध्ये नियमितपणे सहकार्य करतात. या गाण्यामुळे कोणतीही चूक झालेली नाही’, असे समितीने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

चर्चमध्ये किंवा एखाद्या मशिदीमध्ये कधी हिंदूंच्या देवतांचे गुणगाण करणारे भजन म्हणण्यात आल्याचे ऐकले आहे का ? सर्वधर्मसमभावाचा कंड केवळ हिंदूंना उठतो आणि ते स्वतःचा आत्मघात करून घेतात !