श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रात १०.४.२०२६ या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकल गाडगीळ यांचे शुभागमन झाले. या वेळी त्यांनी सेवाकेंद्रातील साधकांशी अनौपचारिक संवाद साधतांना साधनेतील महत्त्वाच्या सूत्रांवर मार्गदर्शन, तसेच साधकांना साधनेच्या पुढील प्रयत्नांसाठी दिशादर्शन केले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन पुढे दिले आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. सेवा आणि अध्यात्मप्रसार करतांना फळाची अपेक्षा नको !  

सेवा म्हणून ग्रंथप्रदर्शन लावतांना किंवा सत्संग घेतांना त्यातून मिळणार्‍या फळाची अपेक्षा करू नका. सध्या कलियुग असल्याने वातावरणात तमोगुण आणि अनिष्ट शक्ती यांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे प्रसार करतांना लगेच प्रतिसाद मिळेलच असे नाही. अशा वेळी ‘किती ग्रंथवितरण झाले किंवा सत्संगाला किती जण आले?’ , यापेक्षा ‘मी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला साधना सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला का ?’, याकडे लक्ष द्यावे. ‘देवाने आपल्याला साधनेसाठी दिलेली ती एक संधी आहे’, असा भाव ठेवावा.

‘एखादी व्यक्ती या जन्मात, तिच्या पुढच्या जन्मात किंवा कदाचित् तिच्या तिसर्‍या जन्मानंतर साधनेला आरंभ करील; पण आपण प्रयत्न सोडायचे नाहीत’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण आहे. गुरुदेव तीन जन्मांपर्यंत थांबायला तयार आहेत, तर ‘आपण किती तळमळीने प्रयत्न करायला हवेत’, याचा विचार करा.

२. सेवेतून भावजागृती होणे आणि आनंद अनुभवणे, हे महत्त्वाचे आहे !  

श्री. नंदकुमार कैमल

सेवा करतांना स्वतःला ‘या सेवेतून माझी साधना झाली का ? माझी भावजागृती झाली का ? मला आनंद मिळाला का ?’, असे प्रश्न विचारावेत. मंदिराच्या बाहेर प्रदर्शन लावतांना ‘मी ईश्वराच्या दारी उभा राहून त्याचीच सेवा करत आहे’, असा भाव हवा. आपला प्रवास हा बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे व्हायला हवा.

३. भक्त प्रल्हादासारखी अनन्य भक्ती हवी ! 

आपली देवावरची भक्ती भक्त प्रल्हादासारखी हवी. एका प्रल्हादासाठी भगवान श्रीविष्णूने अवतार घेतला. आपल्यात तशी भक्ती असेल, तर देव आपल्यासाठी निश्चितच येईल. त्यासाठी आपली ‘चिंता’ न्यून होऊन आपल्यातील ‘चिंतन’ वाढायला हवे.

४. आगामी आपत्काळात केवळ साधनाच आपल्याला तारू शकते !

प्रत्येकाच्या समष्टी साधनेचा पाया व्यष्टी साधना आहे. त्यामुळे व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावपूर्ण करणे अनिवार्य आहे. ईश्वराशी सतत अनुसंधान ठेवणे, मधे मधे देवाशी बोलणे (देवाला आत्मनिवेदन करणे), देवाची मानसपूजा करणे, असे प्रयत्न वाढवावेत. प्रत्येक क्षणाचा उपयोग साधनेसाठीच करायला हवा; कारण आगामी आपत्काळात केवळ साधनाच आपल्याला तारू शकते.

५. हे शरीर नश्वर आहे. केवळ साधनाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. वाढत्या वयानुसार किंवा शारीरिक कारणांमुळे पूर्वीसारखे शरीर साथ देत नसेल, तर साधनेत मनाचा सहभाग वाढवा. मन, बुद्धी आणि आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न वाढवणे महत्त्वाचे आहे.

६. साधक घडवणे, हीच खरी समष्टी साधना !  

एकट्याने सेवा करण्यापेक्षा इतरांना त्यात सहभागी करून घ्या. इतरांना सेवेची संधी द्या आणि ‘त्यांना सेवा भावपूर्ण आणि कशी करायची’, हे शिकवा. साधकांना घडवण्यासाठी कष्ट घेणे, हीच खरी समष्टी साधना आहे.

७. काळानुसार सेवेचे प्राधान्य ओळखा !

अ. सेवा करतांना ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ?’, याचा विचार करून प्राधान्यक्रम ठरवा. ‘वर्तमानकाळात काय करणे आवश्यक आहे ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारून घ्या. गुरुकार्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी घराबाहेर पडा.

आ. प्रत्येकाने आश्रमाचा लाभ घेऊन नियमितपणे सेवेत सहभागी व्हायला हवे.

८. ‘आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण साधनेसाठी वापरणे’, यातच आपल्या जन्माचे सार्थक आहे.’ 

– संग्राहक : श्री. नंदकुमार कैमल, कोची सेवाकेंद्र, केरळ (१०.४.२०२६)