अनेक जण ईश्वरविषयक काही तत्त्वज्ञान सांगणार्या ग्रंथांचे वाचन करत असतात. पैकी बर्याच जणांना साधना म्हणजे काय, याचीच कल्पनासुद्धा नसते. ‘साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी जाणीवपूर्वक प्रतिदिन काया-वाचा-मन यांच्या माध्यमातून करायच्या कृती.’ ईश्वरविषयक तात्त्विक माहिती घेण्याच्या आधी साधना चालू करणे का महत्त्वाचे ? तसेच कुणी आवडते म्हणून ईश्वरविषयक तात्त्विक माहितीचे वाचन करत असतील, तर त्यांनीसुद्धा तत्परतेने साधना का चालू करावी, हे स्पष्ट करण्यासाठी हा लेख !
९ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘व्यवहारज्ञान अन् शिक्षणशास्त्र काय सांगते ?’, यांविषयी वाचून ‘आधुनिक विज्ञानाचे वैशिष्ट्य आणि ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’ यांतील काही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1059419.html

३. आधुनिक विज्ञानाचे वैशिष्ट्य आणि ईश्वरप्राप्तीचे शास्त्र
इ. प्रस्थानत्रयी काय सांगते ? : प्रस्थानत्रयी, म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता हे ३ ग्रंथ. हे सनातन धर्माच्या तत्त्वज्ञानाचे पायाभूत ग्रंथ आहेत. यातील ब्रह्म, माया, ईश्वर इत्यादीविषयींची सूत्रेच पुढे त्यानंतरच्या आजतागायतच्या विविध ग्रंथांतून या ना त्या प्रकारे आली आहेत.
इ १. उपनिषद : उपनिषदांमधील कथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिष्याकडून गुरु प्रथम काही ठोस कृती करून घेतांना दिसतात. उदा. या १०० गायी घेऊन जा, त्यांचा योग्य सांभाळ कर. त्या १००० झाल्या की, तुला कुणी येऊन ज्ञान देईल. त्या आणखी १०० पट झाल्या की, पुढचे ज्ञान कुणी तरी देईल इत्यादी. आता हे म्हणजे साधना करणे झाले.
इ २. ब्रह्मसूत्र : उपनिषदांच्या अध्ययनातून आत्मा, ब्रह्म इत्यादी संबंधाने मनात काही गोंधळ असेल, तर तो दूर करण्यासाठी हा ग्रंथ आहे. त्यातील सूत्रांमधील पहिलेच सूत्र ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ हे आहे. या सूत्राचा ध्वनीत आशय हा आहे की, जे योग्य साधनेच्या आधारे अंत:करण शुद्धी करून जे सिद्ध आहेत, ते यानंतर पुढे दिलेले ब्रह्मविषयक विवरण समजून घेण्याचे अधिकारी आहेत.

इ ३. गीता : अर्जुनाने सर्वश्रेष्ठ सत्य कोणते आणि ते साध्य होण्यासाठी समोर दिसणार्या आप्तजनांशी युद्ध करून त्यांना मारणे योग्य कि संन्यास घेऊन ज्ञानप्राप्ती योग्य ? या मनातील द्वंद्वासंबंधी विचारल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला प्रथम सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा गाभा सांगितला. अर्जुनाला काहीही समजले नाही. मग श्रीकृष्णाने ‘प्रथम कर्म म्हणजे युद्ध कर, त्याखेरीज ज्ञानप्राप्ती संभव नाही’, असे सांगितले. ‘गीतेमध्ये परत परत दोष घालवावेत, गुण बाणवावेत, तरच ईश्वरप्राप्ती शक्य आहे’, हे तर सांगितलेच आहे. यासह ईश्वरप्राप्तीच्या वाटेने जायचे, तर ईशकृपा महत्त्वाची आहे, हेही सांगितले आहे. त्यासाठी आधी नामजपादी योग्य साधना करावी लागते.
ई. तात्त्विक वाचनाच्या इच्छेमागील मूळ उर्मीचा अभ्यास : वरील विवरण वाचूनही एखाद्याला केवळ तात्त्विक माहिती वाचावी, असे वाटते, तर त्यात काय चुकीचे ? अन्य काही तरी वाचण्यापेक्षा तात्त्विक अध्यात्म वाचणे चांगले नाही का ? असे प्रश्न काहींना असू शकतात.
ई १. अध्यात्मावरील तात्त्विक ग्रंथांचे वाचन करण्याच्या प्रेरणेचा मूळ स्रोत : तात्त्विक ग्रंथ वाचण्यामागे तशी इच्छा वगळता अन्य काही कारण असते का ? याचा तसेच जे कारण असेल, त्याचे स्वरूप काय, याचा विचार वाचकाने करायला हवा. येथे इच्छा, उर्मी आणि स्फुरण या ३ संज्ञा येतात.
ई १ अ. इच्छा, उर्मी आणि स्फुरण : जेव्हा कुणाला काही करावेसे वाटते, याला ‘इच्छा’ म्हणतात. प्रत्येक इच्छेच्या मागे स्वतःच्या अंतर्यामी काहीतरी कारण असते. ते कारण, म्हणजे त्या इच्छेला जन्म देणारी ‘उर्मी (वृत्ती)’. येथे इच्छा ही जाणिवेच्या स्तरावर असते. ती म्हणजे नेमके काय, ते शब्दात सांगता येते. त्यामुळे तिच्या आधारे ती कृतीही होते. या तुलनेत उर्मी तितकीशी जाणिवेच्या स्तरावर नसते. त्यामुळे उर्मीचे स्वरूप समजून घेणे तितकेसे सोपे नाही. काही असले, तरी उर्मीच इच्छेला जन्म देत असते. उर्मी संबंधित इच्छेच्या तुलनेत सूक्ष्म असते. स्फुरण तर अतीअतीसूक्ष्म आहे. स्फुरणाविषयी या टप्प्याला केवळ अंतर्यामी असणारी ‘मी’ची जाणीव जिच्या आधारे अनेक उर्मी जन्म घेतात, हे एवढे समजणे पुरेसे आहे.
ई १ आ. तात्त्विक ग्रंथांचे वाचन करावे, या इच्छेमागील उर्मी कोणती ? : तात्त्विक माहिती वाचावी, ही इच्छा अन्य काहीतरी वाचण्यापेक्षा अधिक सात्त्विक आहे, हे नक्कीच; परंतु त्यामागील आंतरिक उर्मीचा वेध घेण्यासाठी थोडा नीट विचार आणि स्वनिरीक्षण केल्यास लक्षात येते की, वाचत असलेल्या तात्त्विक ग्रंथात ज्याविषयी (म्हणजे संक्षेपात ईश्वराविषयी) सांगितले गेले आहे, त्याविषयी आपल्याला अंतर्यामी आवड अन् प्रेम असते. ही उर्मी त्यासंबंधी काही ‘वाचन करूया’, याप्रकारे मनात इच्छारूपाने व्यक्त झालेली असते. त्यामुळे ते वाचावेसे वाटते आणि वाचले की, छान वाटते. असे असले, तरी ही मनाची स्थिती सर्वकाळ टिकून रहात नाही. येथे इच्छेची पूर्तता कदाचित् झाली असेल; परंतु उर्मीची पूर्तता झाली नाही, हे लक्षात घ्यावे. ती होण्यासाठी उर्मीचे खरे स्वरूप समजून घ्यावे.
ई १ इ. उर्मीचे खरे स्वरूप : ईश्वरविषयीची तात्त्विक माहिती वाचायची इच्छा होणारे एका अर्थी भाग्यवान असतात. त्यांची ही इच्छा, म्हणजे पूर्वसुकृतामुळे किंवा नंतरच्या संस्कारामुळे किंवा ईशकृपेमुळे असलेल्या वर उल्लेखित अबोध उर्मीचे स्वरूप थोडे ठळक होणे आहे; मात्र ती उर्मी व्यावहारिक समजूतींच्या चौकटीत इतकी बंदिवान असते की, तिला त्या वेळी फार तर ‘काही वाचूया’ एवढेच व्यक्त होणे संभव असते. म्हणून मग तात्त्विक वाचनाची इच्छा झाली, तर आणखी काय करावे ? काय करणे आवश्यक आहे ?, हे पहावे. साधना केल्याने ईशकृपा, म्हणजे गुरुकृपा होऊन उर्मीवरील राख दूर होऊन ती धुगधुगी चांगली प्रज्वलित होते. निदान काया, वाचा आणि मनातील आचार-विचार पालटांसाठी, म्हणजेच साधनेसाठी अधिक काही दिशा मिळावी, अशी कळकळीची प्रार्थना तरी करावी. तेही होत नसेल, तर असे वाचन एक सात्त्विक करमणूक ठरते. मग नुसते वाचनच करत राहिले, तर कधीतरी तीही धुगधुगी संपून जाते.
४. केवळ तात्त्विक माहिती वाचणार्यांचे पुढे काय होते ?
केवळ माहिती वाचत रहाणार्यांपैकी अनेकांचा उत्साह लवकरच मावळतो. ‘तेच तेच परत काय वाचायचे’, असे त्यांना वाटू लागते. काही ग्रंथ पालटत रहातात. फारतर मी एवढे ग्रंथ वाचले एवढेच समाधान मिळते. फार फार तर कुणी कुठेतरी त्या त्या माहितीविषयी थोडे बोलतात. मग मूळ ज्या उर्मीमुळे ते या प्रकारच्या वाचनाकडे आले, तिला ते समजून घेऊ शकत नाहीत.
थोडक्यात ईश्वरविषयक तात्त्विक वाचनाची इच्छा, म्हणजे पूर्णत्वासाठी धडपडणार्या उर्मीची साद असून साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी वाटचाल करणे, ही संबंधित दिशा आहे. तसे न झाल्यास तो स्वत:वरच केलेला अन्याय ठरतो !
(समाप्त)
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२६)
हिंदु मंदिरे भक्तांच्याच स्वाधीन हवीत !
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
स्वतःच्या, तसेच साधकांच्या साधनेविषयी तत्त्वनिष्ठ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४३ वर्षे) !
रुग्णाईत स्थिती स्थिर राहून स्वीकारणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले फोंडा, गोवा येथील श्री. श्रीहरि मामलेदार (वय ६७ वर्षे) !