गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाने कृतकृत्य झाले साधक !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

जयपूर (राजस्थान) – गुरुपौर्णिमा (२९ जुलै २०२६) जवळ येऊ लागल्यावर प्रत्येक साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तळमळीने प्रयत्नरत असतो. अशा वेळी गुरुपौर्णिमेच्या पूर्वी प्रत्यक्ष श्री गुरूंचे मार्गदर्शन लाभणे, याहून अनमोल असे साधकासाठी काय असू शकते ? अशीच अपूर्व संधी जयपूर आणि अजमेर येथील साधकांना मिळाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ५ जुलै या दिवशी साधकांना साधनेसाठी मार्गदर्शन केले. यामुळे साधक कृतकृत्य झाले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अमृतवाणीतून स्रवलेल्या ज्ञानामृताने साधकांची मने प्रफुल्लित झाली. गुरु आणि ईश्वर साधकांची कशी काळजी घेतात ? त्यांना कसे घडवतात ? यांविषयी त्यांच्यासह दैवी दौरा करणार्‍या साधकांचे अनुभव ऐकून साधकांना जोमाने सेवा अन् साधना करण्याची प्रेरणा मिळाली.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन ऐकतांना भावस्थिती अनुभवणारे साधक

१. संकल्प-विकल्पामध्ये मनाची पुष्कळ ऊर्जा वाया जाते. मनाच्या ऊर्जेचा साधनेसाठी उपयोग केल्याने मन-बुद्धीचा त्याग होईल.

२. आई-वडिलांना वाटते की, आपल्याला जे मिळाले नाही, त्या सर्व म्हणजे भौतिक गोष्टी मुलांना मिळाव्यात; पण ‘मुलांना या जन्मात देव मिळाला पाहिजे’, असे आई-वडिलांना वाटले पाहिजे.

३. देव साधना करणार्‍याच्या कुटुंबियांचाही भार वहातो. धर्मकार्यासाठी आणि गुरूंच्या कार्यासाठी जे युवा बाहेर पडतात, त्यांना सेवेसाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन द्यायला हवे. धर्मकार्यासाठी माया सोडून देवाच्या कृपेची अनुभूती घ्या.

४. आपण गुरूंच्या छायेपासून, म्हणजे साधनेपासून जेव्हा दूर जातो, तेव्हा दुःखाचे संकट कोसळते.

५. कलियुगात चेहर्‍यावर हास्य टिकवून ठेवणे, म्हणजे आनंदी रहाणे सोपे नाही. लोक सहस्रो रुपयांचे तिकिट काढून हास्याच्या कार्यक्रमाला जातात. केवळ साधनेमुळेच आपण आनंदी राहू शकतो.

६. साधकांनी न्यूनगंड बाळगायला नको; कारण साधकांच्या मनात गुरुदेव आहेत.

७. समाज म्हणजे श्रीविष्णूचे विश्वस्वरूपच आहे. समष्टी साधना केल्याने, म्हणजे अध्यात्मप्रसार केल्याने या विश्वरूपाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

८. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) साधकांचे आध्यात्मिक त्रास स्वतःवर घेऊन साधकांचे प्रत्येक क्षणी रक्षण करत आहेत. साधकांनीही मायेचे बंध सोडून झोकून देऊन साधना करायला हवी.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.