सनातनचे १२७ वे (समष्टी) संत पू. डॉ. श्रीपाद हर्षे (वय ९१ वर्षे) यांनी १५.१.२०२६ या दिवशी देहत्याग केला. मथुरा (उत्तरप्रदेश) येथील साधक श्री. देवेन पाटील यांना वर्ष २०२३ आणि वर्ष २०२५ मध्ये पू. आजोबांचा सत्संग मिळाला. त्या वेळी त्यांना पू. आजोबांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. वर्ष २०२३ मध्ये पू. हर्षेआजोबांना भेटल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘वर्ष २०२३ मध्ये काही कालावधीसाठी पू. हर्षेआजोबा कर्णावती (गुजरात) येथे त्यांच्या घरी वास्तव्यास आले होते. तेव्हा त्यांना संत घोषित करून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्या वेळी सनातन संस्थेकडून त्या सन्मान सोहळ्यातील छायाचित्रांचा सुंदर ‘अल्बम’ करून दिला होता. माझी आई सौ. शिल्पा पाटील हिला आणि मला हा ‘अल्बम’ त्यांच्या घरी नेऊन देण्याची सेवा मिळाली होती.
१ अ. अनेक वर्षांनंतर भेटूनही साधकाला ओळखणे आणि त्याचे श्रेयही प.पू. गुरुदेवांना देणे : पू. आजोबांना ‘अल्बम’ देण्याच्या निमित्ताने मला अनेक वर्षांनंतर त्यांचे दर्शन होणार होते. त्यामुळे माझ्या मनात विचार होता, ‘ते मला ओळखतील का ?’ त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना भेटल्यावर त्यांनी आनंदाने विचारले, ‘‘तुम्ही कसे आहात ? किती वर्षांनी भेटलो !’’ यावर मला आश्चर्यच वाटले, ‘त्यांनी मला सहज कसे ओळखले ?’, तरी मी त्यांना विचारले, ‘‘पू. आजोबा, तुम्ही कसे काय ओळखले ?’’ यावर ते म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांच्या साधकांना मी कसा विसरू शकतो ?’’
त्यांचे हे वाक्य ऐकून मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्यांनी सर्व संतांना कसे घडवले आहे ! कदाचित् आपण रक्ताची नाती विसरू शकतो; पण आध्यात्मिक संबंध निर्माण करणारे गुरूंचे नाते हे आंतरिक असल्यामुळे किती अनमोल आहे !
१ आ. स्वतःची छायाचित्रे पहात असतांना त्रयस्थ भूमिकेत आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : माझ्या आईने पू. आजोबांना त्यांच्या संत-सन्मान सोहळ्याच्या छायाचित्रांचा अल्बम दिला. त्या वेळी पू. आजोबांनी तो घेतला आणि पुष्कळ प्रेमाने ते प्रत्येक छायाचित्र पहात होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून माझे मन निर्विचार होत होते. ‘संत कसे विचार करत असतील ?’, हे शिकण्यासाठी त्यांना मी विचारले, ‘‘पू. आजोबा, तुम्हाला अल्बम कसा वाटला ? परम पूज्यांनी किती आनंद दिला आहे ना !’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांचेच सर्व प्रेम आहे. किती प्रेम करावे त्यांनी ! यात माझे काही नाही. ही त्यांचीच कृपा आहे.’’
‘संत स्वतःची छायाचित्रे पहात असतांना त्रयस्थ भूमिकेत असून गुरुदेवांच्या विचारांतच मग्न असतात’, हे शिकायला मिळाल्याने माझा भाव पुष्कळ जागृत झाला. तेव्हा संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आचरणात आणण्याचा माझा निश्चय झाला.
१ इ. पू. आजोबा छायाचित्रे पहात असतांना आलेल्या अनुभूती
१. ‘पू. आजोबा छायाचित्रे पहात असतांना त्या खोलीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाप्रमाणे वातावरण निर्माण झाले आहे’, असे मला जाणवत होते.
२. पू. आजोबा बसले होते, त्या ठिकाणी पुष्कळ प्रकाश जाणवत होता.
३. त्या क्षणी ‘जणू साक्षात् गुरुदेव तेथे आले आहेत’, अशी अनुभूती मला आली.
४. ‘कुठला तरी आनंद सोहळाच चालू आहे’, अशी अनुभूती मला आणि आईलाही आली.
पू. हर्षेआजोबांशी झालेल्या शेवटच्या संभाषणाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्या देहत्यागाविषयी मिळालेली पूर्वसूचना !

१४.१.२०२६ या दिवशी देहली येथून काही सेवेनिमित्त मी सौ. दीपाली ओंकार (पू. आजोबांची मुलगी) यांना संपर्क केला होता. त्या वेळी पू. आजोबा ताईंकडेच निवासाला होते. पू. आजोबांची प्रकृती ठीक नाही; म्हणून दीपालीताईंनी मला त्यांच्याशी बोलायला सांगितले.
अ. पू. आजोबांना बोलता येत नव्हते, तरी ते प्रतिसाद देत होते. त्यांना अल्प ऐकू येत असल्याने दीपालीताई माझे वाक्य पुन्हा जोरात त्यांना सांगत होत्या. त्या वेळी पू. आजोबांचे शब्द ऐकून माझी भावजागृती झाली.
आ. मला माझ्या आजूबाजूला प्रकाश आणि चैतन्य जाणवू लागले.
इ. मी डोळे बंद करून त्यांना प्रार्थना केल्यावर मला पोकळीसारखे दृश्य दिसले. तेव्हा मला जाणवले, ‘पू. आजोबा आता चैतन्यात विलीन होत आहेत. त्यांचा देह पुष्कळ प्रकाशमान झाला आहे.’
ई. ही अनुभूती येत असतांना मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
पू. आजोबांशी बोलल्यानंतर मला वाटले, ‘ते काही कालावधीनंतर देह ठेवतील.’ त्यांचे भावपूर्ण दर्शन घेण्यासाठी मी कर्णावती येथे रहात असलेल्या माझ्या आईला कळवले; पण दुसर्या दिवशी मला कळले, ‘पू. आजोबांनी देहत्याग केला आहे.’
– श्री. देवेन पाटील
२. वर्ष २०२५ मध्ये जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
वर्ष २०२५ मध्ये माझ्या आई-बाबांची प्रकृती ठीक नसल्याने मी काही कालावधीसाठी कर्णावती (गुजरात) येथे घरी राहून त्यांची सेवा करत होतो. त्या वेळी काही उपक्रम आणि सेवा असल्यास मला पू. श्रीपाद हर्षेआजोबांची अन् त्यांच्या घरी जाऊन सेवा करण्याची संधी मिळत होती.
२ अ. मैत्रीचा उपयोग करून मित्रांना धर्मकार्यात सहभागी करून घेणारे पू. हर्षेआजोबा ! : पू. आजोबा उच्चशिक्षित असल्याने त्यांचे मित्रसुद्धा प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित आहेत. पू. आजोबा मला सांगायचे, ‘‘सर्व मित्रांचे शिक्षण चांगले झाले आहे. सर्वांचा व्यवसाय चांगला चालू आहे; पण त्याला धर्मकार्याची जोड दिली पाहिजे. त्यांना गुरुदेवांशी जोडले पाहिजे, तरच माझ्या मैत्रीचा उपयोग होईल.’’
पू. आजोबांमधील प्रेमभावामुळेच सर्व मित्र अजूनही आमच्या संपर्कात आहेत आणि कधी आम्ही सेवेनिमित्त त्यांच्याकडे गेल्यावर जमेल तसे सर्व सहकार्य करत असतात.
२ आ. अहं अल्प असणे : पू. आजोबांची प्रकृती ठीक नसायची, तरी त्यांना सेवा करायची पुष्कळ तळमळ होती. ते मला नेहमी नम्रपणे विचारायचे, ‘‘मी सेवा करत नाही, केवळ घरीच असतो. गुरुदेवांना कसे वाटत असणार ?’’ तेव्हा मी त्यांना साधक आणि संस्थेचे विविध उपक्रम यांसाठी प्रार्थना अन् नामजप करण्यास सांगितल्यावर ते आनंदाने करत असत. तेव्हा मला वाटायचे, ‘पू. आजोबा माझ्यापेक्षा किती मोठे आहेत ! तरी ते मला मित्रासारखे प्रेमाने विचारत असतात.’ ‘साधनेत लहान होणे किती महत्त्वाचेआहे !’, हे मला शिकायला मिळाले.
२ इ. संतांचे आज्ञापालन करणे : एकदा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका त्यांना भेटायला आले होते. तेव्हा पू. आजोबांनी त्यांना सेवेविषयी विचारले. सद्गुरु काकांनी त्यांना सांगितले, ‘‘गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून नामजप करणे आणि साधकांना चैतन्य मिळण्यासाठी प्रार्थना करणे’, हीच तुमची सेवा आहे.’’ तेव्हापासून पू. आजोबा ‘साधकांच्या सेवेतील अडचणी दूर होऊ दे’, अशी प्रार्थना नियमित करत असत.
२ ई. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी पू. आजोबांच्या घराचे साधकांकडून करून घेतलेले परीक्षण ! : कर्णावती येथे सद्गुरु अनुताई (सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत, वय ५६ वर्षे) आल्या होत्या. तेव्हा पू. आजोबांच्या घरी त्यांची निवासव्यवस्था होती. सर्व साधक तिथे सत्संगासाठी आल्यावर पू. जाधवकाकूंनी सर्वांना त्या जागेचे परीक्षण करून अनुभूती घेण्यास सांगितले.
१. पू. हर्षेआजोबांच्या घराबाहेर वाहतुकीचा मुख्य मार्ग असल्याने पुष्कळ गर्दी आणि आवाज असतो; परंतु घरात प्रवेश करताच त्याची तीव्रता जाणवणे न्यून होते अन् शांतीची अनुभूती येते.
२. त्यांच्या घरातील बाहेरच्या खोलीत प्रकाश जाणवतो. तेथे आलेल्या साधकांना चैतन्य मिळते.
३. पू. आजोबा वापरत असलेला पलंग हलका जाणवतो. त्यावर बसले की, त्याचा स्पर्श जाणवत नाही आणि नामजप आपोआप चालू होतो.
४. पू. आजोबा विश्रांती घेत असलेल्या खोलीत चैतन्यामुळे गारवा जाणवत आहे. तेथील लादीसुद्धा मऊ झाली आहे. या खोलीत साधकांना ‘ध्यान लागणे, विचार न्यून होणे, काही नाद ऐकू येणे’, अशा अनुभूती आल्या.
२ उ. पू. आजोबा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण आचरणात आणत असल्याविषयीचे एक उदाहरण ! : पू. आजोबांच्या घरातील दूरचित्रवाणी संचावर एक ‘टेबल क्लॉथ’ घातला होता. त्याच ‘टेबल क्लॉथ’चा दुसरा तुकडा एका लहान पटलावरही घातला होता. भोजनाच्या मोठ्या पटलावरील जुना झालेला ‘टेबल क्लॉथ’ चांगल्या ठिकाणी कापून त्याचे लहान तुकडे केले होते. हे पू. जाधवकाकूंनी आम्हाला दाखवले आणि सांगितले, ‘‘पू. आजोबांची साधना किती उच्च असेल की, गुरुदेवांनी सांगितलेली काटकसर त्यांनी त्यांच्या जीवनात किती सुंदररित्या उतरवली आहे !’’ पू. काकूंनी हे सांगितल्याने गुरुदेवांची शिकवण अंतर्मनापर्यंत उतरवण्यासाठी प्रेरणा मिळाली. ‘पू. आजोबांमुळे साधनेतील असे बारकावे शिकायला मिळत आहेत’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
अंतर्यामी कृपाळू श्री गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक समर्पित !’
– श्री. देवेन पाटील, मथुरा, उत्तरप्रदेश. (५.२.२०२६)
(‘हे लिखाण पू. आजोबा विद्यमान (हयात) असतांनाचे असल्याने ते वर्तमानकाळात आहे.’ – संकलक)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !