केवळ भारतानेच हॉर्मुझमध्ये स्वतःचे खलाशी गमावले : हे संकट चर्चेतूनच सोडवले जाऊ शकते ! – Foreign Secretary Vikram Misri

६० देशांच्या ऑनलाईन बैठकीत भारताचे आवाहन

विक्रम मिस्री

नवी देहली – हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटात आतापर्यंत केवळ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे संपूर्ण संकट केवळ संवाद आणि शांतता यांच्या माध्यमांतूनच सोडवले जाऊ शकते, असे आवाहन भारताने केले. भारताने सर्व देशांना तणाव न्यून करून परस्पर संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनच्या पुढाकाराने हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी ६० हून अधिक देशांच्या उपस्थितीत एक मोठी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी त्यांनी वरील आवाहन केले. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आतापर्यंत ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. तिघेही परदेशी नौकांवर कार्यरत होते.

१. ६० देशांच्या या बैठकीमुळे आता अमेरिकेला वगळून हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यासाठी प्रयत्न चालू झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वीच हॉर्मुझ उघडणे हे त्यांचे दायित्व नसून ज्या देशांचा तेथून व्यापार होत आहे, त्यांनीच ते प्रयत्न करावे, असे सांगत यातून अंग बाहेर काढले होते.

२. या पार्श्‍वभूमीवर हॉर्मुझ प्रश्‍नाची सूत्रे आता ब्रिटनने हाती घेतली आहेत. ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी लंडनमध्ये ३५ देशांची बैठक बोलावली आहे. यात भारतालाही निमंत्रण देण्यात आले असून याच आठवड्यात होणार्‍या या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सहभागी होतील.

३. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही इराणच्या संपर्कात आहोत.

४. हॉर्मुझवरील ब्रिटनच्या या पुढाकाराला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पाठिंबा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या बैठकीला पाठिंबा दिला आहे.

इराण-अमेरिका युद्धात पुतिन मध्यस्थीसाठी सिद्ध

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात मध्यस्थी करण्याची सिद्धता दर्शवली आहे. देशातील संघर्ष लवकर समाप्त करण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर मॉस्कोतून मध्यस्थीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘युद्धग्रस्त प्रदेशात शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी मॉस्को प्रयत्न करण्यास सिद्ध आहे. यासाठी स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहू’, असे पुतिन यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, आखातामधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन प्रादेशिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. सैनिकी कारवाई थांबावी, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. नेत्यांशी संपर्क केला जात आहे.

इराणच्या चार अटी

रशियातील इराणचे राजदूत काझेम जलाली यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल यांच्यासमोर ४ प्रमुख अटी ठेवल्या आहेत. त्या खालील प्रमाणे आहेत :

अ. आतंकवादी आक्रमणे पूर्णपणे थांबवली जावीत
आ. युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही यासंदर्भात विश्‍वासार्ह हमी
इ. भौतिक आणि नैतिक हानीची पूर्ण भरपाई
उ. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राचा आदर

खूप उशीर होण्यापूर्वी करार करा ! – ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी

अमेरिका आणि इस्रायल यांनी आक्रमण करून पश्‍चिम आशियातील सर्वांत उंच पुलांपैकी एक असलेल्या इराणमधील कराज येथील एक पूल उद्ध्वस्त केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर एक पोस्ट शेअर करत इराणला धमकी देतांना ‘खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करार करावा. इराण अजूनही एक महान राष्ट्र बनू शकते; पण काहीही शिल्लक न रहाण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे’, असे म्हटले.

अमेरिकेने त्यांच्या सैन्यदलप्रमुखांना तडकाफडकी हटवले

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकेचे सैन्यदलप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. जॉर्ज यांच्यासह आणखी २ वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ केल्याची माहिती समोर येत आहे. सैन्यदलप्रमुखांना तात्काळ सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश का देण्यात आले, याविषयी अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.