पंचमुखी हनुमानाचे कार्य आणि त्याची काही आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आपण २ एप्रिल या दिवशी पाहिली. आज हनुमानाच्या पंचमुखांची तुलनात्मक आध्यात्मिक वैशिष्ट्ये हा भाग येथे दिला आहे.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025097.html
३. शिवाची पंचमुखे आणि शिवावतार पंचमुखी हनुमान
३ आ. हनुमानाने ‘पंचमुख’ आणि ‘त्रिनेत्र’ धारण करण्यामागील आध्यात्मिक भावार्थ : हनुमानाचे ‘पंचमुख’ अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारे आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारे आहे. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.
३ इ. हनुमानाच्या पंचमुखांची तुलनात्मक आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

टीप – पंचमुखी हनुमानाचे ‘कपिमुख’ हे नाव श्रीरामाशी संबंधित असून, त्याचे ‘गरुडमुख’ हे श्री विष्णुवाहन गरुडदेवाशी संबंधित आहे. तसेच पंचमुखी हनुमानाची ‘नृसिंह, वराह आणि हयग्रीव’, ही रूपे श्रीविष्णूच्या अनुक्रमे ‘नृसिंह, वराह आणि हयग्रीव’ या अवतारांशी संबंधित आहेत. अशा प्रकारे पंचमुखी हनुमानाचे ‘कपिमुख’ हे श्रीरामतत्त्वाशी एकरूप झालेले असून त्याची उर्वरित चार मुखे ही श्री विष्णुतत्त्वाशी एकरूप झालेली आहेत. भक्त आणि भगवंत यांच्यातील एकरूपतेचे हे अनुपम आणि अलौकिक उदाहरण आहे. यावरून आपल्याला हनुमानाच्या पराकोटीच्या भक्तीची प्रचीती येते.
४. हनुमानाने विविध युगांमध्ये रामभक्तांचे रक्षण करण्याचे महत्कार्य करणे
४ अ. त्रेतायुगात प्रभु श्रीराम आणि रावण यांच्या महायुद्धात हनुमानाने प्रभु श्रीराम अन् लक्ष्मण यांचे अनेकदा रक्षण करणे : त्रेतायुगामध्ये प्रभु श्रीराम आणि रावण यांच्या महायुद्धामध्ये जेव्हा रावणपुत्र इंद्रजिताने लक्ष्मणावर अमोघ अस्त्र चालवले, तेव्हा लक्ष्मण घायाळ होऊन बेशुद्ध पडला. तेव्हा वैद्यराज सुशेन यांच्या सांगण्यावरून हनुमानाने हिमालयातून द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्यानंतर वैद्यराज सुशेन याने त्या पर्वतावरील संजीवनी वनस्पतीने लक्ष्मणावर उपचार केल्यावर तो शुद्धीवर आला. त्याचप्रमाणे जेव्हा इंद्रजितने राम आणि लक्ष्मण यांच्यावर नागास्त्र किंवा नागपाश टाकला होता, तेव्हा हनुमानाने तात्काळ पृथ्वीवरून वैकुंठाकडे गमन केले आणि विष्णुवाहन गरुडाला पृथ्वीवर घेऊन आला. त्यानंतर गरुडाने नागांचे भक्षण करून राम आणि लक्ष्मण यांना नागपाशातून मुक्त केले. त्याचप्रमाणे जेव्हा रावणाचे पाताळातील भाऊ अहिरावण आणि महिरावण हे मायावी असुर श्रीराम आणि लक्ष्मण यांना निद्रा-अवस्थेत पाताळात नेऊन त्यांचा देवीला बळी देणार होते. तेव्हा हनुमानाने पाताळात जाऊन अहिरावण आणि महिरावण यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश केला. तसेच त्याने प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाताळातून पृथ्वीवर सुखरूप आणले. अशा प्रकारे हनुमानाचे पराक्रम तिन्ही लोकांत गाजले. तेव्हा प्रभु श्रीराम हनुमानाला म्हणाला, ‘‘तू माझा भरतासारखा प्रिय बंधु आहेस.’’
हे भक्तशिरोमणी हनुमान, या मनमंदिरात प्रभु श्रीराम विराजमान होऊ दे !

‘हे भक्तशिरोमणी हनुमान, या पाषाण हृदयात, रामभक्तीचा अंकुर फुटू दे ।
या मनात भावभक्तीचा निर्मळ झरा वाहू दे ।। १ ।।
या शेतात रामभक्तीचे पीक उगवू दे ।
या मळ्यात रामभक्तीला बहर येऊ दे ।। २ ।।

या मुखाला रामभक्तीचे अमृत चाखता येऊ दे ।
या अंतरात रामभक्तीचा मधुर रस वाहू दे ।। ३ ।।
या अंतर्मनात रामभक्तीचा सेतू बनू दे ।
या चित्तात रामभक्तीची ज्योत उजळू दे ।। ४ ।।
या अंतःकरणात रामभक्तीची गंगा वाहू दे ।
या मनमंदिरात प्रभु श्रीराम विराजमान होऊ दे ।। ५ ।।
या विश्वात श्रीरामरूपी सूर्याचा उदय होऊ दे ।
अन् संपूर्ण जगात प्रभु श्रीरामाचे राज्य स्थापन होऊ दे ।। ६ ।।
हे हनुमंता, तुझ्यासारखी परम रामभक्ती आम्हाला करता येऊ दे ।
अन् आम्हाला प्रभु श्रीरामाच्या चरणांत विलीन होता येऊ दे ।। ७ ।।
– सुश्री मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ आ. द्वापरयुगात हनुमानाने अर्जुनाच्या रथावरील ध्वजामध्ये सूक्ष्म रूपाने उपस्थित राहून अर्जुनाचे प्राणघातक अस्त्रांपासून रक्षण करणे : द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हनुमान अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर आरूढ झाला होता. त्यामुळे त्या ध्वजाला ‘कपिध्वज’, असे संबोधले गेले. जेव्हा महाभारताचे भीषण युद्ध चालू झाले, तेव्हा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण इत्यादी अतिरथी अन् महारथी योध्यांनी अर्जुनावर अनेक घातक अस्त्रे आणि दिव्यास्त्रे सोडली होती. तेव्हा अर्जुनाच्या रथावरील हनुमानाने ही सर्व अस्त्रे रोखून धरली होती. त्यामुळे अर्जुनाचे रक्षण झाले.
४ इ. कलियुगात हनुमानाने विविध भक्तांचे वेळोवेळी रक्षण केले असून तो पुढेही करणार असणे : कलियुगात हनुमान हिमालयातील ‘गंधमाधम’ पर्वतावर गुप्त रूपात वास करून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप अखंड करत आहे. तो कलियुगातील विविध भक्तांचे वेळोवेळी संकटांपासून रक्षण करत आहे. ‘त्याने संत तुलसीदास आणि संत रामदासस्वामी यांचे अनेक वेळा रक्षण केले होते’, असे संबंधित संतांच्या चरित्र ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतात. आता चालू असलेला आपत्काळ आणि तिसर्या महायुद्धाची भीषण स्थिती यामध्ये हनुमानच विश्वातील सर्व साधकांचे रक्षण करणार आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना काळानुसार हनुमान आणि प्रभु श्रीराम यांची भक्ती अन् उपासना करण्यास सांगितले आहे. त्यानुसार साधकांनी त्यांच्या घरातील देवघरात हनुमानसहित प्रभु श्रीरामाच्या सात्त्विक चित्राची स्थापना केली आहे. तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सांगण्यावरून साधक प्रतिदिन ‘हनुमान चालिसा’ किंवा ‘मारुतीस्तोत्र’ आणि रामरक्षास्तोत्र भावपूर्ण म्हणत आहेत. तसेच ते हनुमानाप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा प्रभु श्रीरामाचा नामजपही भावपूर्णरित्या करत आहेत. साधकांनी प्रभु श्रीराम आणि हनुमान यांचे चित्र असलेले सनातन संस्थेने निर्माण केलेले पदक लाल दोर्यात गुंफून गळ्यात घातले, तर त्यांच्या भोवती हनुमानाची भक्ती आणि श्रीरामाची शक्ती यांचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होऊन त्यांचे सर्व विपदांपासून (संकटांपासून) रक्षण होण्यास साहाय्य होईल. यावरून हनुमानाच्या रक्षक रूपाचे दर्शन घडते.
५. सारांश
प्रभु श्रीरामापर्यंत पोचायचे असेल, तर हनुमानरूपी गुरुकिल्लीचा वापर करून भक्तीचे द्वार उघडावे लागते, तरच अंतरात आत्मारामाचे दर्शन घडते.
६. प्रार्थना
‘प्रभु श्रीरामाने आम्हा सर्व साधकांवर कृपा करून आमच्या अंतरंगातही हनुमानाप्रमाणे दास्यभक्ती निर्माण करून आमच्याकडून गुरुसेवा करवून घ्यावी आणि संपूर्ण विश्वात रामराज्याची स्थापना करावी’, हीच प्रभु श्रीराम अन् हनुमान यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १२.३.२०२६, वेळ : दुपारी २ ते ३.३० आणि कालावधी : दीड घंटा)
(समाप्त)
|

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !