फोंडा, गोवा येथील श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे), श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७७ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गोमंतभूमी (गोवा) असे परमपवित्र ।
येथे घडतसे श्री गुरूंचे अवतारी चरित्र ।।

येथीलच ३ जीव गुरुचरणी विसावले ।
साधकजन सारे आनंदसागरात न्हाले ।।

फोंडा (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची भूमी असलेल्या गोमंतभूमीमध्ये त्यांनी जे बीजारोपण केले, त्याचा आज सुंदर वृक्ष बहरला आहे. श्री गुरूंच्या या अवतारी कार्याने पावन झालेल्या पवित्र गोवा भूमीमध्ये जन्मलेल्या आणि रहात असलेल्या साधकांसाठी साधनेची ही सुवर्णसंधीच आहे. त्यातच साधकांच्या आनंदात वृद्धी करण्यासाठी २९ मार्च २०२६ या दिवशी आणखी एक सुवर्णयोग जुळून आला. श्री गुरूंच्या कार्यासाठी सर्वकाही समर्पण करण्याची सिद्धता असणारे फोंडा येथील श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे), म्हार्दाेळ येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७७ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिली. त्यामुळे हा दिवस गोव्यातील साधकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.

या प्रसंगी श्री. आत्माराम जोशी यांच्या पत्नी सौ. शकुंतला जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मुलगी सौ. आदिती महाजन, भाचे श्री. विवेक पेंडसे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), तसेच श्री. परशुराम प्रभुदेसाई आणि सौ. पूनम प्रभुदेसाई यांचा मुलगा श्री. गिरीजय, मुलगी सौ. स्नेहा नाडकर्णी आणि जावई श्री. शिवदत्त नाडकर्णी, मुलगी सौ. आरती कामत, त्यांची मुलगी कु. वैष्णवी कामत, तसेच फोंडा येथे सेवा करणारे काही साधक उपस्थित होते.

श्री. आत्माराम जोशी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्री. परशुराम प्रभुदेसाई यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
सौ. पूनम प्रभुदेसाई (उजवीकडे) यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

आनंदवार्तेची घोषणा

फोंडा येथे सेवा करणार्‍या काही साधकांची दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या संदर्भात २९ मार्च या दिवशी बैठक आयोजित केली होती. ‘या बैठकीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचीही उपस्थिती लाभणार’, असे समजल्यावर साधकांना अनपेक्षित आनंद झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या कार्याचे बीजारोपण ज्या पवित्र भूमीत केले, त्या दिव्य कार्याचे साक्षीदार असलेले आणि आरंभीच्या काळात पुष्कळ साहाय्य केलेले काही साधकही या वेळी उपस्थित होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्या साधकांशी संवाद साधून आरंभीच्या काळातील त्या दिव्य गुरुस्मृतींना उजाळा दिला. या वेळी श्री. जोशी आणि श्री. प्रभुदेसाई यांनीही गुरुसहवासातील त्यांचे दिव्य अनुभव कृतज्ञताभावाने सांगितले. त्या गुरुस्मृतींच्या अनुभवाने प्रत्येकच साधक भावस्थिती अनुभवत होता. अशा भक्तीमय वातावरणातच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका सुंदर काव्याद्वारे श्री. जोशी, तसेच श्री आणि सौ. प्रभुदेसाई यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता सर्वांना दिली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा करतांना म्हटलेले काव्य

गोमंतक भूमी असे ही परशुरामभूमी ।
श्रीरामस्पर्शे पावन झालेली पुण्यभूमी ।।

प.पू. बाबांच्या (टीप) आशीर्वादे गोवा होई विश्वदीप ।
गुरुकृपे साधकजीवनी लागले चैतन्यदीप ।।

जगद्गुरूंच्या वास्तव्याने गोवा नगरी होई पावन ।
गोवावासी साधकांचे उजळले जीवन ।।

अशा पुण्यक्षेत्रातील साधकपुष्पे तीन ।
जन्ममृत्यू फेर्‍यातून मुक्त होऊनी, गुरुचरणी झाली लीन ।।

(टिप : प.पू. भक्तराज महाराज यांच्या)

नावाप्रमाणेच अंत:करणात अखंड ईश्वराची अनुभूती घेणारे ‘आत्मराम’जोशी, ज्यांच्या नावाने ही भूमी प्रसिद्ध आहे, त्या भगवान परशुरामांचे नाव असलेले ‘परशुराम’ प्रभुदेसाई आणि श्री गुरूंच्या सहवासाने पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ज्यांचे आयुष्य उजळून निघाले अशा ‘पूनम’ प्रभुदेसाई यांनी आज ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी जोशी आणि प्रभुदेसाई परिवारांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. जोशी परिवार

१ अ. ‘अतिथी देवो भव’ या भावाने साधकांचे आदरातिथ्य करणे : अगदी आरंभीच्या काळात साधकसंख्या अल्प असतांना जोशी परिवारातील सदस्यांनी त्यांचे वैयक्तिक जीवन, परिवार यांचा काहीही विचार न करता त्यांचे घर साधकांना सेवांसाठी उपलब्ध करून दिले. बैठका, सेवा यांच्या निमित्ताने साधकांचे त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे. कुणी आपल्या घरी आल्यास आदरतिथ्य करणे, त्यांच्याशी बोलणे अशा कृतींमुळे आपल्या वैयक्तिक जीवनावर काही प्रमाणात परिणाम होत असतो. काही तडजोडी कराव्या लागतात; मात्र गुरुदेवांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आणि ‘अतिथी देवो भव’ या भावाने जोशी परिवाराने साधकांचे आदरातिथ्य अगदी सहजतेने केले. साधकांच्या माध्यमातून ईश्वर आपल्या घरी येतो, त्याची सेवा म्हणजे ईश्वरी सेवा ! त्यांच्या अंतरात गुरूंनी निर्माण केलेल्या भावामुळे त्यांनी त्या आरंभीच्या काळातही अनुभूती घेतली.

१ आ. गुरूंनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्यामुळे प्रगती झाली : आम्ही साधनेत आल्यावर अनेक साधक आमच्याकडे त्यांचे कौतुक करत, ‘जोशीकाकांच्या घरी पुष्कळ प्रेम अनुभवता येते. आलेल्यांचे आदरातिथ्य करतांना त्यांचा चेहरा नेहमी आनंदी असतो. चेहर्‍यावर ‘ते दमले आहेत किंवा काही प्रतिक्रिया उमटली’, असे कधीच झाले नाही, असे साधक सांगत असत. या सर्व कृती साधना म्हणून करण्याचे गुरुदेवांनी त्यांच्या मनावर बिंबवले आणि त्याप्रमाणे प्रयत्न करून त्यांनी प्रगती केली.

१ इ. जोशीकाका गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अभ्यासवर्गांमध्ये सूत्रसंचालन करत असत. तसेच संस्थेचा मुख्य व्यवस्थापकीय भाग सर्वश्री आत्माराम जोशी, सदानंद जोशी, प्रकाश जोशी, विवेक पेंडसे, तसेच आणखी काही साधक यांनीच पाहिला आहे.
सौ. जोशीकाकू यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे. दोघेही पती-पत्नी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त आहेत.

२. प्रभुदेसाई परिवार

२ अ. शुद्ध मनाने केलेल्या समर्पणाची नोंद भगवंताने घेतली ! : दोनापावला येथून सुखसागर येथे स्थलांतरित होण्यापूर्वी मध्ये ६ महिने आपले सेवाकेंद्र म्हार्दाेळ येथे प्रभुदेसाई यांच्या घरी होते. गोव्यातील पहिले सेवाकेंद्र दोनापावला, दुसरे सेवाकेंद्र म्हणजे प्रभुदेसाई यांचे घर ! १ एप्रिल २००१ हा तो दिवस होता. आता त्यालाही २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आरंभीच्या काळात आवश्यकता असतांना प्रभुदेसाईकाकूंनी लगेचच त्यांचे घर संस्थेला वापरायला दिले. गुरुदेवांच्या अवतारत्वाची कल्पना नसतांनाही त्यांच्यासाठी सर्वकाही समर्पित करण्याची त्यांनी सिद्धता दाखवली. याच शुद्ध मनाने केलेल्या समर्पणाची नोंद भगवंताने घेतली आणि आज त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले.

२ आ. श्री. प्रभुदेसाई यांचे घर म्हणजे श्रीविष्णूने त्याच्या दैवी कार्यासाठी, आश्रमासाठी निवडलेले स्थान ! : सप्तर्षींनी नाडीवाचनात, ‘अमृतकलशातील थेंब जेथे जेथे पडले, तेथे तेथे गुरुदेवांचे आश्रम निर्माण झाले आहेत’, असे सांगितले आहे. या सर्व दैवी घटना आहेत. श्री. प्रभुदेसाई यांचे घर म्हणजे श्रीविष्णूने त्याच्या दैवी कार्यासाठी, आश्रमासाठी निवडलेले स्थान आहे.

२ इ. ईश्वराचा व्यवस्थितपणा हा गुण प्रभुदेसाईकाकांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येतो ! : प्रभुदेसाईकाकांचे हस्ताक्षरही पुष्कळ सुंदर आहे. त्यांचे लिखाण आणि नोंदीही पुष्कळ नीट अन् व्यवस्थित असतात. ईश्वराचा व्यवस्थितपणा हा गुण त्यांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येतो. केवळ व्यवस्थित असे नाही, तर सुंदरही असते, त्यामुळे त्याकडे पहात रहावेसे वाटते.

संस्थास्तरावर अनेक जणांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आहे, त्यामध्ये पती-पत्नींनी एकाच दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे, ही एक अलौकिक घटना आहे. एका जोडप्याने म्हणजे पतीपत्नींनी एकत्रितरित्या पातळी गाठली, हा एक अलौकिक क्षण आहे.

आध्यात्मिक पातळी घोषित केलेल्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. आत्माराम जोशी

श्री. आत्माराम जोशी

गुरुदेवांची मोठी कृपा आहे. मी काही केले नाही. त्यांनीच साधना करवून घेतली. गुरूंनी मोठी दैवी देणगी दिली. श्री गुरूंच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता.

२. श्री. परशुराम प्रभुदेसाई

श्री. परशुराम प्रभुदेसाई

पात्रता नसतांना गुरूंनी आम्हाला जवळ केले. मोठ्या प्रमाणात सेवा करायला  जमत नाही, शक्य तेवढे करतो; पण ‘गुरुदेवांचे सगळीकडे लक्ष आहे’, या विचाराने कृतज्ञता व्यक्त होते. यापुढे मी आणखी प्रयत्न वाढवेन.

३. सौ. पूनम प्रभुदेसाई

सौ. पूनम प्रभुदेसाई

गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. माझ्याकडून प्रतिदिन ‘गुरुदेवा, मला तुमच्या चरणांकडे घेऊन चला,’ अशी प्रार्थना होते. ती हाक आज गुरुदेवांपर्यंत पोचली.

जोशी आणि प्रभुदेसाई कुटुंबियांप्रती कृतज्ञता !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

आज सनातनच्या कार्याचा वटवृक्ष झाला आहे, त्यात जोशी कुटुंबियांचा सहभाग मोठा आहे. श्री. प्रकाश जोशी (श्री. आत्माराम जोशी यांचे मधले बंधू) यांनी सनातन संस्थेच्या कार्याला गोव्यात प्रारंभ केला. त्याचबरोबर ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत  प्रसार करायचे. त्यांचे बंधू श्री. भास्कर, श्री. सदानंद हेही गोव्यातील प्रसाराचे दायित्व सांभाळायचे. श्री. आत्माराम जोशी यांनी तर स्वत:चे घर संस्थेचे कार्यालय बनवले होते. प्रभुदेसाई कुटुंबियांनी अडचणीच्या प्रसंगी संस्थेला त्यांचे घर वापरायला दिले आणि तेथे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचेही वास्तव्य होते. नंतर त्या ठिकाणी साधकही निवासाला जात असत. या परिवारांचा त्याग पुष्कळ मोठा आहे. आपण सर्वांनी त्यांच्याप्रती कृतज्ञ रहायला हवे.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

प्रगती केलेल्या साधकांची त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

१. सौ. शकुंतला जोशी (श्री. आत्माराम जोशी यांच्या पत्नी)

‘श्री गुरूंची अपार कृपा आहे’, हे आम्ही अनुभवत आहोत. पूर्वी श्री. जोशी यांना पुष्कळ राग यायचा; परंतु त्यांनी आता स्वत:मध्ये तळमळीने पालट केले आहेत. आता त्यांना काही करायला जमत नाही, तर सतत येता-जाता त्यांचा अखंड नामजप चालू असतो. त्यांच्यातील पालटामुळे घरात पुष्कळ शांतता आणि आनंद अनुभवता येतो.

२. सौ. आरती कामत (श्री. आणि सौ. प्रभुदेसाई यांची मुलगी)

आईमुळे आम्ही साधनेत आलो. आई-बाबांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळे आम्ही साधनेत टिकून आहोत. पूर्वी काही कौटुंबिक कारणामुळे आई-बाबांची चिडचिड होत असे; मात्र आता दोघांनीही ‘गुरुदेवांना अपेक्षित ते होईल’, या विचाराने परिस्थिती स्वीकारली.

३. सौ. स्नेहा नाडकर्णी (श्री. आणि सौ. प्रभुदेसाई यांची मुलगी)

मागच्या वर्षी आई-बाबांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस होता. तेव्हा ‘दोघांची एकत्रित प्रगती व्हावी’, असे वाटत होते. ती इच्छा गुरुदेवांनी आज पूर्ण केली, याविषयी कृतज्ञता.

सोहळ्याच्या संदर्भातील दैवी नियोजन !

हा सोहळा झाला त्या दिवशी कामदा एकादशी होती. श्री. आत्माराम जोशी यांची जन्मतिथी एकादशी आहे आणि या दिवशी प्रभुदेसाई परिवाराने एकादशीचे व्रतही ठेवले होते. एकप्रकारे श्रीविष्णूनेच त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेचा योग ठरवला आणि जुळवून आणला होता.

४. श्री. शिवदत्त नाडकर्णी (जावई)

बाबांची (श्री. प्रभुदेसाई यांची) अंतर्मुखता वाढली आहे, असे लक्षात आले. आईंमध्ये (सौ. प्रभुदेसाई यांच्यामध्ये) पुष्कळ प्रेमभाव आणि इतरांचा विचार पुष्कळ करतात.

५. श्री. गिरीजय प्रभुदेसाई (श्री. आणि सौ. प्रभुदेसाई यांचा मुलगा)

आई-बाबांनी गुरुसेवेसाठी पुष्कळ त्याग केला. कोणत्याही प्रसंगात त्यांच्या मनाची स्थिरता टिकून असते. दोघांचीही दिनचर्या ठरलेली आहे. आजारपण किंवा कोणत्याही कारणाने त्यांनी दिनचर्येत पालट केला, सवलत घेतली, असे आतापर्यंत कधीच मी पाहिले नाही. ईश्वरासाठी अखंड धडपड कशी असावी ? हे मी त्यांच्या उदाहरणातून प्रत्यक्ष अनुभवले. ‘दोघांचीही प्रगती होत आहे’, असे जाणवत होते.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक