‘अन्य दिवसांच्या तुलनेत अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना पुष्कळ अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतो, हे सर्वश्रुत आहे. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना अधिक प्रमाणात त्रास होण्याचे कारण म्हणजे, त्या तिथींना वातावरणातील वाईट शक्तींचा जोर वाढलेला असतो; म्हणून त्या तिथींना शुभकार्ये सहसा करत नाहीत, तसेच प्रवास करण्याचे टाळले जाते. वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून या तिथींना नामजपादी साधना अधिक प्रमाणात करण्यास सांगितले जाते.
‘या दोन्ही तिथींच्या दिवशी साधना करणार्या व्यक्तींना देवता साहाय्य करतात का ?’, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. गणपति, दत्त, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मी, मारुती आणि शिव या देवता सर्वसामान्य लोक पूजतात. यांपैकी काही देवता सगुण स्तरावर कार्यरत असतात, तर काही निर्गुण स्तरावर कार्यरत असतात. काही देवतांमध्ये तारक तत्त्व अधिक असते, तर काहींमध्ये मारक तत्त्व अधिक असते.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना वर उल्लेखलेल्या देवतांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी त्या देवतांची सनातन-निर्मित सात्त्विक चित्रे घेण्यात आली. १९.१२.२०२५ या दिवशी अमावास्या होती, तर ३.१.२०२६ या दिवशी पौर्णिमा होती. त्या दोन्ही तिथींना देवतांच्या चित्रांचे परीक्षण करण्यात आले. अन्य दिवस म्हणून ११.१.२०२६ या दिवशी देवतांच्या चित्रांचे परीक्षण करण्यात आले. देवतांमधील सगुण तत्त्व, निर्गुण तत्त्व, तारक तत्त्व, मारक तत्त्व, तसेच त्या चित्रांतील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती हे घटक अभ्यासण्यात आले. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना प्रत्येक देवतेमध्ये असलेल्या या घटकांची तुलना सर्वसामान्य दिवशी असलेल्या देवतेतील त्या घटकांशी करण्यात आली. यावरून अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना एखादी देवता सगुण स्तरावर कार्य करत आहे कि निर्गुण स्तरावर, तसेच तारक स्तरावर कार्य करत आहे कि मारक स्तरावर, याचे अनुमान काढता आले. तसेच अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या चित्रांचे परीक्षण लोलकाने करून त्यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळींची नोंद करण्यात आली. त्यावरून ‘अन्य दिवसाच्या तुलनेत अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी देवतांतील कार्यरत तत्त्व वाढले कि अल्प झाले ?’, हेही लक्षात आले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातर्फे करण्यात आलेले हे संशोधन येथे दिले आहे.
(भाग १)

१. अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण

१ अ. गणपति, दत्त आणि श्रीराम या देवता

१ अ १. गणपति
१ अ १ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी गणपतीतील निर्गुण तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. त्यालाच अनुसरून गणपतीतील आनंद आणि शांती यांची स्पंदने वाढली. तसेच गणपतीतील मारक तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी वाईट शक्तींशी लढण्यासाठी गणपतीतील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, हे लक्षात आले.
१ अ १ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी गणपतीतील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ पौर्णिमेच्या तुलनेत गणपतीतील निर्गुण तत्त्व ५ टक्क्यांनी अधिक वाढले. याला अनुसरून गणपतीतील आनंद आणि शांती यांची स्पंदने वाढली. तसेच गणपतीतील मारक तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी पौर्णिमेच्या तुलनेत अधिक प्रमाणात असलेल्या वाईट शक्तींच्या प्रभावाशी लढण्यासाठी गणपतीतील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व अधिक प्रमाणात वाढते’, हे लक्षात आले.
(क्रमश:)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.३.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025533.html
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !