सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित हनुमानाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये झालेले सूक्ष्मातील पालट आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे (रामराज्याच्या स्थापनेचे) महान कार्य करत आहेत. गुरुदेवांच्या देवघरात सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे ठेवलेली आहेत. देवघरातील देवतांना ते प्रतिदिन भक्तीपूर्ण प्रार्थना करतात. गुरुदेवांच्या भक्तीमुळे देवतांच्या चित्रांत सूक्ष्मातून पालट होत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान समष्टी कार्यात देवता गुरुदेवांना साहाय्य करतात. गुरुदेवांच्या समष्टी कार्यामुळे साधक रामराज्याची स्थापना होण्याच्या जवळ जात आहेत. त्या वेळी या कार्यात देवतांच्या मिळणार्‍या साहाय्यातही वाढ होत असते. देवतांच्या साहाय्यात होणारी वाढ गुरुदेवांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांमध्ये होणार्‍या पालटांमधून लक्षात येते. अशा प्रकारे देवतांच्या चित्रांमध्ये काळानुसारही पालट होत आहेत.

देवतांच्या चित्रांतील पालट देवतांची अनुभूतीजन्य स्पंदने, त्यांचे सगुण / निर्गुण तत्त्व आणि त्यांचे तारक / मारक तत्त्व यांच्यातील पालटांतून लक्षात येतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील हनुमानाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट झाले आहेत. हे पालट अभ्यासण्यासाठी गुरुदेवांच्या देवघरातील हनुमानाच्या मार्च २०२६ मधील चित्राचे आणि तुलनेसाठी म्हणून त्यापूर्वीच्या चित्राचे (नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाच्या चित्राचे) लोलकाने परीक्षण (टीप १) करण्यात आले. या चित्रांतील अनुभूतीजन्य स्पंदने, सगुण / निर्गुण तत्त्व आणि तारक / मारक तत्त्व यांचे प्रमाण, तसेच चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून अभ्यास करून शोधली आहे. या चित्रांच्या नोंदी आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीतील हनुमानाचे चित्र मार्च २०२६

टीप १ – लोलकाने केलेले परीक्षण : लोलकाने केलेल्या परीक्षणाद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. लोलकाने परीक्षण करण्यासाठी ज्याचे परीक्षण करायचे तो घटक किंवा त्याचे छायाचित्र, लोलक आणि काही तक्ते यांची आवश्यकता असते. लोलकाने परीक्षण करणारी व्यक्ती सर्वप्रथम इष्टदेवतेला ‘माझ्याभोवती आणि लोलकाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊ दे’ अशी प्रार्थना करते. त्यानंतर ती लोलकाला पुढील २ प्रश्न विचारते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. मी लोलकाने परीक्षण करू शकते का ?

२. लोलकाने परीक्षण करण्यासाठी निवडलेले स्थळ आणि वेळ योग्य आहे का ?

लोलकाने दोन्ही प्रश्नांना होकार दर्शविल्यावर व्यक्ती लोलकाने परीक्षण करण्यास आरंभ करते. लोलकाने परीक्षण करणारी व्यक्ती घटकासमोर किंवा घटकाच्या छायाचित्रासमोर लोलक धरून विविध प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विविध प्रकारचे तक्ते उपयोग आणले जातात, उदा. ‘हो’ आणि ‘नाही’ यांचा तक्ता; ‘मीटर’ आणि ‘किलोमीटर’ यांचा तक्ता; आकड्यांचे तक्ते, उदा. १ ते १० आकड्यांचा तक्ता; ५,१०,५०,१०० इत्यादी संख्यांच्या पटीतील आकड्यांचे तक्ते इत्यादी. या तक्त्यांचा उपयोग करून कोणत्याही घटकातील नकारात्मक किंवा/आणि सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता येते. लोलकाद्वारे परीक्षण पूर्ण झाल्यावर व्यक्ती इष्टदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

लोलक

लोलकाने परीक्षण करून अन्य गोष्टींविषयीही माहिती मिळू शकते, उदा. एखाद्या घटकातील त्रिगुणांचे (सत्त्व, रज आणि तम यांचे) प्रमाण, स्पंदनांचा प्रकार (सगुण, सगुण-निर्गुण, निर्गुण-सगुण आणि निर्गुण), पंचतत्त्वांचे (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचे) प्रमाण, अनुभूतीजन्य स्पंदनांचे (शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांचे) प्रमाण इत्यादी.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील हनुमानाच्या चित्रांच्या केलेल्या नोंदी आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

हनुमानाच्या चित्रांच्या स्पंदनांतील महत्त्वाचा पालट लगेच लक्षात यावा, यासाठी तो अधोरेखित केला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील हनुमानाच्या चित्रात नोव्हेंबर २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये झालेले पालट वरील सारणीत दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीतील नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाचे चित्र

१ अ. हनुमानाच्या चित्रातील भाव आणि चैतन्य यांच्या स्पंदनाचे प्रमाण वाढणे : हनुमानाच्या मार्च २०२६ मधील चित्रात भाव आणि चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढले आहे.

१ आ. हनुमानाच्या चित्रातील मारक तत्त्वाचे प्रमाण वाढणे : हनुमानाच्या मार्च २०२६ मधील चित्रात मारक तत्त्वाचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले आहे. देवतेचे तारकरूप आशीर्वादात्मक असते, तर तिचे मारकरूप साधकांच्या संरक्षणार्थ कार्यरत असते. सध्याच्या आपत्काळात साधकांचे रक्षण करण्यासाठी हनुमानाचे मारक तत्त्व वाढले आहे.

१ इ. हनुमानाच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : हनुमानाच्या नोव्हेंबर २०२५ मधील चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३३ सहस्र ५५० मीटर होती. हनुमानाच्या मार्च २०२६ मधील चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५७ सहस्र ३७० मीटर आहे, म्हणजे तिच्यात २३ सहस्र ८२० मीटरने वाढ झाली आहे.

सौ. मधुरा धनंजय कर्वे

२. हनुमानाच्या मार्च २०२६ मधील चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. हनुमानाच्या पूर्ण चित्राकडे पाहिल्यास नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाच्या चित्रापेक्षा मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्रामध्ये अधिक प्रमाणात शक्ती जाणवते. याचे कारण म्हणजे मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्रामध्ये मारक तत्त्व वाढलेले आहे. आपत्काळ जसा वाढला, तसा हनुमानातील मारक तत्त्व साधकांच्या रक्षणासाठी वाढले.

आ. नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाच्या चित्राकडे १४ – १५ सेकंद पहाता येते; पण मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्राकडे केवळ ७ – ८ सेकंदच पहाता येते. त्यानंतर हनुमानाची शक्ती पेलवत नाही. याचे कारण म्हणजे मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्रामध्ये मारक तत्त्व वाढलेले आहे.

इ. हनुमानाच्या डोळ्यांत पाहिल्यास नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाच्या चित्रापेक्षा मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्रामध्ये अधिक प्रमाणात तेजतत्त्व जाणवते. याचे कारण म्हणजे मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्रामध्ये चैतन्य वाढलेले आहे.

ई. हनुमानाच्या छातीकडे पाहिल्यास नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाच्या चित्रापेक्षा मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्रामध्ये अधिक प्रमाणात भाव जाणवतो; कारण त्या चित्रामधील आध्यात्मिक भावाची स्पंदने वाढलेली आहेत. सध्याच्या वाढलेल्या आपत्काळात अधिक प्रमाणात भाव असलेले हनुमानाचे चित्र साधकांना रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत होण्याची प्रेरणा देते.

उ. हनुमानाच्या पुढच्या चरणाकडे पाहिल्यास नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाच्या चित्रापेक्षा मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्राकडे पाहून अधिक प्रमाणात शरणागतभाव जागृत होतो. शरणागती महत्त्वाची आहे. त्याशिवाय साधकांच्या रामराज्यासाठीच्या प्रयत्नांना काही अर्थ नाही. हनुमान हा शरणागतीचा अत्युच्च आदर्श आहे.

३. निष्कर्ष 

हनुमानाच्या चित्रातील अनुभूतीजन्य स्पंदने, सगुण/निर्गुण तत्त्व आणि तारक/मारक तत्त्व यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास केल्यास लक्षात येते की, हनुमानाच्या चित्रातील भाव आणि चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण अन् मारक तत्त्व यांचे प्रमाण वाढल्यामुळे मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्राची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली आहे. तसेच त्या चित्राच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे प्रमाण अधिक आहे.

सध्याचा काळ हा रामराज्य स्थापन करण्यासाठी कार्यरत होण्याचा काळ आहे. त्यामुळे हनुमानाच्या चित्रातील स्पंदने वाढली आहेत. हनुमान हा श्रीरामाचा अनन्य भक्त आहे. हनुमानामध्ये शक्ती आणि भक्ती यांचा अपूर्व संगम आहे. रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात रामभक्त हनुमानाचे मोठे योगदान आहे. गुरुदेवांच्या देवघरातील हनुमानाच्या चित्रात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट हे रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात हनुमानाचे तत्त्व अधिकाधिक कार्यरत होत असल्याचे दर्शक आहे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ) आणि सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.३.२०२६)

वाचकांना विनंती

या लेखात ‘हनुमानाच्या मार्च २०२६ मधील चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये’ या उपमथळ्याखाली सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीतील नोव्हेंबर २०२५ मधील हनुमानाचे चित्र आणि मार्च २०२६ मधील हनुमानाचे चित्र यांतील भेद दर्शवणारी काही सूत्रे दिली आहेत; परंतु हे भेद सूक्ष्मातील आहेत. जिज्ञासू वाचकांना ही सूत्रे वाचतांना दोन्ही चित्रे पहायची असल्यास ते ती sanatanprabhat.org या संकेतस्थळावर पाहू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक