डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांचा लाभलेला प्रेमळ सहवास, त्यातून साधिकेला उमगलेल्या ‘साहित्य, कला, ज्योतिष, संगीत’ आदी विविध विषयांची जाण असलेल्या डॉ. (सौ.) कुंदाताई आणि त्यांची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

३०.३.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात डॉ. (सौ.) कुंदाताईंची झालेली प्रथम भेट !’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

भाग २ 

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/1024006.html

डॉ. (सौ.) कुंदा आठवले

२. पनवेल येथील घरी साधिकेला डॉ. (सौ.) कुंदाताईंचा लाभलेला सत्संग आणि व्यवहार अन् अध्यात्म यांविषयी शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. डॉ. (सौ.) कुंदाताईंना पनवेल येथे घरी येण्याची विनंती केल्यावर त्यांनी ती मान्य करणे, पनवेल येथील दंतवैद्या डॉ. (सौ.) समिधा गांधी यांच्याकडे त्या उपचारांसाठी येऊ लागल्याने त्यांचा सहवास लाभू लागणे : जुलै २०११ च्या गुरुपौर्णिमेनंतर मी मुंबई येथे जाऊ लागल्यामुळे डॉ. (सौ.) कुंदाताईंशी माझी चांगली ओळख झाली. काही मासांनी मी त्यांना पनवेल येथे आमच्या घरी येण्याची विनंती केली. त्यांनी ती लगेचच मान्यही केली. त्या वेळी भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. त्यानंतर सौ. कुंदाताई दातांच्या उपचारासाठी पनवेल येथील दंतवैद्या डॉ. (सौ.) समिधा गांधी यांच्याकडे येऊ लागल्या. काही वेळा एक दिवसाआड उपचार असल्याने आम्ही त्यांना रहाण्याचा आग्रह करायचो आणि त्या लगेच तयार व्हायच्या. अशा प्रकारे आम्हाला त्यांचा अधिकाधिक सत्संग मिळू लागला. त्या वेळी पनवेल येथील काही साधकही उपस्थित असायचे आणि आजही ते असतात. ‘डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या मुक्कामाचे दिवस’, हे आमच्यासाठी सर्वार्थांनी पर्वणीच असतात. त्या वेळी व्यवहार आणि अध्यात्म या संदर्भातील बर्‍याच गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळतात.

सौ. अश्विनी मिलिंद जोशी

२ आ. ‘डॉ. (सौ.) कुंदाताई किती प्रेमळ आणि इतरांचा विचार करणार्‍या आहेत’, याची प्रचीती वेळोवेळी येणे : त्या वेळी माझा मुलगा कु. श्रेयस मिलिंद जोशी इयत्ता सातवीत शिकत होता. ‘‘कुंदाताई आल्यानंतर मी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम लावायचे कि नाही ? मी मित्रांबरोबर खेळायला जायचे कि नाही ?’’, असे त्याचे निरागस प्रश्न असायचे. तेव्हा मी त्याला सांगायचे, ‘‘हे आपण कुंदाताईंनाच विचारून करूया.’’ कुंदाताईंनी यासाठी त्याला कधीही ‘नाही’ म्हटले नाही. ‘त्या किती प्रेमळ आणि जीव लावणार्‍या आहेत, तसेच त्या किती इतरांचा विचार करतात’, याची प्रचीती आम्हाला वेळोवेळी आली. ‘‘श्रेयसला शाळेत घेऊन जाण्यासाठी डबा काय दिलास ? डॉ. जोशी यांची न्याहरी झाली का ? घरातील सर्व आधी बघ’’, अशा त्यांच्या प्रेमळ सूचना आणि विचारपूस माझ्या मनाला संवेदनक्षम बनवत होत्या.

२ इ. समोरच्याला प्रेमाने आपलेसे करणे : डॉ. (सौ.) कुंदाताई समोरच्याला लगेच आपलेसे करून घेतात. माझ्या सासूबाईंसमवेत त्यांच्या छान गप्पा व्हायच्या. कुंदाताई म्हणायच्या, ‘‘या (सासूबाई) वेगळ्या आहेत. त्यांची पूर्वजन्मीची साधना पुष्कळ आहे.’’

२ ई. ‘साहित्य, कला, ज्योतिष, संगीत, राजकारण’ आदी विविध विषयांची जाण असलेल्या डॉ. (सौ.) कुंदाताई यांची वेगवेगळी रूपे प्रत्येक वेळी अनुभवणे : कुंदाताईंना बर्‍याच विषयांची जाण आहे. ‘साहित्य, कला, ज्योतिष, संगीत, राजकारण’ आदी सर्वच विषयांवर त्या मार्मिक टिपणी करू शकतात. एकदा श्रेयसने दूरचित्रवाणीवर क्रिकेटचा सामना लावला होता. त्या वेळी क्रिकेटमधील खेळाडूंची नावे घेऊन कुंदाताईसुद्धा रुची घेऊन सामना बघत होत्या. भारतीय खेळाडूंनी षट्कार मारल्यावर त्यांनी श्रेयसच्या हातावर टाळी देऊन आनंद व्यक्त केला. इतके सहज आणि निखळ आचरण पाहून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आले. त्यांची वेगवेगळी रूपे मी प्रत्येक वेळी अनुभवत होते.

२ उ. डॉ. (सौ.) कुंदाताई पनवेल येथे आल्यानंतरचा दिनक्रम : कुंदाताई असतांना कुलकर्णी, माळगावकर, सावंत आणि कर्देकर असे सर्व जण घरी येतात. ‘दिवसभर गप्पा, अनुभूती, वैयक्तिक मार्गदर्शन आणि स्वयंपाकाचे विविध पदार्थ बनवणे’, असा दिनक्रम असतो. १२ – १५ जणांची जेवणे प्रतिदिन एकत्र होतात. त्या घरी असतांना ‘दिवस कसे जातात’, हे कळतही नाही. कुंदाताई पनवेलला येतात. तेव्हा श्रेयस म्हणतो, ‘‘अच्छे दिन आ गये ।’’ मग ताई मनापासून हसतात.

२ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधनेतील पारदर्शकतेवर भर दिला, तर ‘डॉ. (सौ.) कुंदाताईंनी त्या पारदर्शक काचेवर प्रामाणिकपणाचा पारा चढवला आहे’, असे वाटणे : डॉ. (सौ.) कुंदाताई यांचे वागणे अतिशय उत्स्फूर्त आणि मनापासून असते, तसेच ‘त्यांचे बोलणे अत्यंत गोड आणि ऐकत रहावे’, असे असते. त्यांचा राग हा वास्तविकतेला धरून असतो आणि तो सत्यासाठी असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधनेतील पारदर्शकतेवर भर दिला, तर ‘डॉ. (सौ.) कुंदाताईंनी त्या पारदर्शक काचेवर प्रामाणिकपणाचा पारा चढवून आम्हाला आरसा दाखवला आहे’, असे मी मानते. त्यांच्या समोर ‘खोटेपणाचा निभाव लागत नाही’, हे आम्ही सर्व जण जाणून आहोत.

२ ए. प.पू. डॉक्टरांनी ‘प.पू. बाबांची सेवा कशी केली ?’, याविषयी डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी पोटतिडिकीने सांगणे आणि तेव्हा ‘साधनेत मी पुष्कळ न्यून पडते’, याची जाणीव होणे : प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या (प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांच्या) आठवणींविना कुंदाताईंचा क्षणही जात नाही. ‘कुंदाताईंकडून त्यांच्या अनुभूती ऐकणे’, ही आम्हा साधकांसाठी पर्वणीच असते. अनुभूती ऐकतांना ‘आम्ही बाबांच्या काळातच आहोत’, असे आम्हाला वाटत रहाते. ‘गुरूंशी कसे वागावे ? त्यांचे आज्ञापालन कसे करावे ? प.पू. डॉक्टरांनी प.पू. बाबांची सेवा कशी केली आहे ?’, यांविषयी त्या पोटतिडिकीने सांगतात. तेव्हा ‘साधनेमध्ये आपण पुष्कळ न्यून पडतो’, याची जाणीव होते. ‘आजही प.पू. बाबा आणि प.पू. दादाच माझी काळजी घेतात’, अशी त्यांना १०० टक्के निश्चिती आहे. ‘कुंदाताईंच्या समवेत राहिल्याने साधना, अध्यात्म आणि व्यवहार यांचा कसा मेळ घालावा ?’, हे कळते.

२ ऐ. डॉ. (सौ.) कुंदाताई परात्पर गुरु डॉ. आठवले यांची घेत असलेली काळजी : कुंदाताई कोठेही असल्या, तरी त्यांचे परात्पर गुरु डॉक्टरांची काळजी घेणे चालूच असते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी जप-जाप्य करणे, प्रार्थना करणे, त्यांना चावता येईल आणि पचेल, असे धान्याचे पीठ करून ते गोव्याच्या आश्रमात पाठवणे, त्या गोव्यात नसल्यास प्रतिदिन दूरभाष करून परात्पर गुरु डॉक्टरांची विचारपूस करणे, अर्धा लिटर दुधावरील एक चमचा साय बाजूला काढून तिचे तूप करणे आणि त्या साजूक तुपातील लाडू प.पू. डॉक्टरांना पाठवणे’, असे त्या करत असतात.

२ ओ. नेत्र रुग्णालयात डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : ‘डॉ. (सौ.) कुंदाताई परात्पर गुरु डॉक्टरांशी किती एकरूप झाल्या आहेत’, याची मला एकदा अनुभूती आली. या अनुभूतीसाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. एकदा कुंदाताईंच्या समवेत मी डोळ्यांच्या रुग्णालयात गेले होते. कुंदाताई शस्त्रक्रिया कक्षात (‘ऑपरेशन थेटर’मध्ये) जाण्यापूर्वी मला त्यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले. तो दिव्य क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. कुंदाताईंनी या अनुभूतीचा लगेचच उलगडाही केला होता. त्या म्हणाल्या, ‘‘ही माझी सरूपता मुक्ती आहे.’’ या अनुभूतीबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला बक्षीस दिले होते आणि माझ्याशी दूरभाषवरून संवादही साधला होता. तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वांत गोड आठवण आहे. याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

३. डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या मार्गदर्शनानुसार झालेले प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. अच्युतानंद महाराज या त्रयींच्या जन्मशताब्दी सोहळ्यांचे नियोजन

३ अ. प.पू. भक्तराज महाराज यांचे सर्वत्रचे भक्त, साधक आणि संत यांच्या उपस्थितीत पनवेल येथील सभागृहात सर्व सोहळे भावपूर्ण वातावरणात पार पडणे : डॉ. (सौ.) कुंदाताईंनी आतापर्यंत आम्हाला सेवेची भरपूर संधी दिली आहे. प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. अच्युतानंद महाराज या त्रयींच्या जन्मशताब्दी सोहळ्यांचे आयोजन त्यांनी पनवेल येथे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सोहळ्यांचे नियोजन झाले.

प.पू. भक्तराज महाराज यांचे सर्वत्रचे भक्त आणि संत यांच्या उपस्थितीत एका मोठ्या सभागृहात हे सर्व सोहळे भावपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यांना देवद, पनेवल येथील सनातनच्या आश्रमातील साधक, तसेच सनातनचे काही जुने साधकही उपस्थित होते. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या सोहळ्यानंतर इंदूर येथील भक्त म्हणाले, ‘‘ही तर ‘छोटी (मिनी) गुरुपौर्णिमा’च झाली.’’ विशेष म्हणजे त्यानंतर कोरोना महामारीमुळे वर्ष २०२० मध्ये इंदूर येथील गुरुपौर्णिमा साजरी करता आली नाही.

३ आ. डॉ. (सौ.) कुंदाताईंमुळे प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांचे (सूक्ष्मातील) अस्तित्व सोहळ्यांत अनुभवणे : प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या काळात आमच्या घरी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद यांच्या पादुकांचे आगमन झाले. त्यामुळे ‘ते दोघेही जणू प्रत्यक्ष घरी आले’, असे जाणवून आम्ही कृतकृत्य झालो. प.पू. बाबांच्या सोहळ्याच्या वेळी २७५ जणांचा महाप्रसाद करण्यास सांगितला असतांना ४४० साधकांनी महाप्रसाद घेतला. हीसुद्धा एक मोठी अनुभूती होती. ‘कुंदाताईंमुळेच प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांचे अस्तित्व या सोहळ्यांमध्ये होते’, याची आम्हाला खात्री पटली.

३ इ. साधिकेच्या मनातील विचार सूक्ष्मातून ओळखणार्‍या डॉ. (सौ.) कुंदाताई ! : नियोजनाच्या या काळात असे व्हायचे की, ‘माझ्या मनात एखादा विचार यायचा आणि कुंदाताई तो बोलून दाखवायच्या अन् म्हणायच्या, ‘‘झाले का तुझ्या मनासारखे ?’’ या अनुभवाने मी एका निराळ्याच बंधनामध्ये गुंफले जात होते.

३ ई. सोहळ्याच्या निमित्ताने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, अशी अनुभूती घेता येऊन डॉ. (सौ.) कुंदाताईंचा ‘उत्साह, गुरुसेवेची तळमळ, संस्कृती जपण्याची वृत्ती, तसेच आनंद लुटण्याची कला’ यांनी मन भारावून जाणे : या प्रत्येक सोहळ्यात कुंदाताईंनी घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा आणि त्यांचे कुटुंबीय यांचा यथोचित मान राखला, तसेच इंदूर आश्रमातील विश्वस्त यांचाही मान राखला. या सोहळ्यांना प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा (प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी आणि चिरंजीव) यांचीही उपस्थिती लाभली. एका सोहळ्यात भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचे प्रवचन ठेवले होते. एकंदरीतच काय, तर कुंदाताई यांच्यामुळे आम्हाला ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, अशी अनुभूती आली. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरही रामनाथी, गोवा येथील आश्रमातून हे सोहळे बघू शकले’, याचाही आम्हाला पुष्कळ आनंद झाला. सोहळ्यांचे आयोजन आणि संचालन डॉ. (सौ.) कुंदाताईंनीच केले होते. यातून त्यांचा ‘उत्साह, गुरुसेवेची तळमळ, प.पू. भक्तराज महाराज यांचे जुने भक्त आणि साधक यांच्याविषयी असलेली ओढ, संस्कृती जपण्याची वृत्ती, तसेच आनंद लुटण्याची कला’ इत्यादी गोष्टी लक्षात आल्या आणि कुंदाताईंचे चित्र मनावर अधिक कोरले जाऊ लागले.

३ उ. डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी पहाटे ४ वाजता उठून नैवेद्य आणि प.पू. जोशीबाबांसाठी स्वयंपाक बनवणे : या सोहळ्यांना प.पू. जोशीबाबा यांचीही उपस्थिती लाभली. ते बाहेरचे काही खात नाहीत; म्हणून कुंदाताईंनी पहाटे ४ वाजता उठून स्वतः त्यांचा स्वयंपाक, तसेच नैवेद्य बनवला होता. ही त्यांची सेवावृत्ती पाहून माझी भावजागृती झाली.

४. साधिकेच्या परिवाराशी आत्मीयतेने वागणार्‍या डॉ. (सौ.) कुंदाताई !

४ अ. डॉ. (सौ.) कुंदाताई आपणहून घरी आल्याने साधिकेच्या सासूबाई आणि आई यांना सत्संग मिळणे अन् ६ – ८ मासांनंतर त्या दोघींना देवाज्ञा झाल्यावर कुंदाताई स्वतःहून घरी येण्यामागचे कारण उमगणे : माझ्या वडिलांना कोरोना काळामध्ये देवाज्ञा झाली होती. नंतर आई आजारी असल्याने माझ्याकडे आली होती. तेव्हा एकदा अकस्मात् मला डॉ. (सौ.) कुंदाताईंचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी ‘‘मी येऊ का ?’’ असे विचारले. घरी वेगळी खोली नसल्याने त्यांना अडचण होईल; म्हणून ही गोष्ट मी त्यांना सांगितली, तरीसुद्धा ‘मी येते’, असे म्हणून त्या घरी आल्या. त्या वेळी आमच्या घरी माझ्या सासूबाई, माझी आई आणि सौ. कुंदाताई या तिघीही वास्तव्यास होत्या. त्यांच्या पुष्कळ गप्पा व्हायच्या. जुन्या काळातील आठवणी आणि गाणी यांमुळे त्यांची छान गट्टी जमली होती. माझ्या आईला बोलायला त्रास व्हायचा; पण त्या काळात तिने भरपूर गोष्टी सांगितल्या. कुंदाताई घरी आल्यावर माझ्या सासूबाईसुद्धा आनंदी व्हायच्या. केशरी भात, खीर आदी पदार्थ करण्यासाठी त्या तत्पर असायच्या. धक्कादायक गोष्ट अशी की, पुढील ६ – ८ मासांच्या काळात दोघींनाही देवाज्ञा झाली. त्या वेळी ‘सौ. कुंदाताई स्वतःहून घरी का आल्या ?’, याचे उत्तर आम्हाला मिळाले. ‘दोघींनाही ताईंचा सत्संग मिळाला’, हे त्यांचे परम भाग्यच होते.

४ आ. माझे आई-वडील आणि बहिणी प्रत्येक सोहळ्याला आवर्जून आल्या अन् त्याही कुंदाताईंशी जोडल्या गेल्या. माझ्या आई-वडिलांच्या बाबतीत कुंदाताई म्हणायच्या की, ‘‘ते अध्यात्म जगत आहेत.’’

४ इ. निरपेक्ष प्रीतीमुळे इतरांच्या समस्या ओळखून त्यांना तत्परतेने साहाय्य करणार्‍या डॉ. (सौ.) कुंदाताई !

१. डॉ. (सौ.) कुंदाताई आमच्या घरातील सर्वांनाच ओळखतात. मध्यंतरी माझ्या चुलत दिराच्या घरी कौटुंबिक कलह आणि आर्थिक समस्या चालू होत्या. त्या वेळी कुंदाताईंनी त्यांना प.पू. जोशीबाबांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याचा दिराला आणि मला पुष्कळ लाभ झाला, म्हणजे दिराच्या समस्यांबद्दलचे माझ्या मनातील विचार न्यून झाले. ‘दुसर्‍याच्या प्रारब्धामुळे स्वतःला होणारा त्रास आणि त्यामुळे नामजपावरील लक्ष न्यून होणे’, या माझ्या समस्येतून कुंदाताईंनीच मला बाहेर काढले.

२. माझ्या आईच्या शेवटच्या काळात मी पुष्कळ उदास होते. तेव्हा अकस्मात् कुंदाताईंचा भ्रमणभाष आला आणि ‘देवाण-घेवाण हिशोब’, या सूत्रावर त्यांनी मला जे मार्गदर्शन केले, त्यामुळेच मी आईची सेवा करू शकले. त्यानंतर ४ – ५ दिवसांतच आईचे देहावसान झाले.

३. माझ्या आतेसासूबाईंची वाचन, पठण, नामस्मरण आदी साधना पाहून कुंदाताई आनंदी झाल्या. आत्यांनी ‘केवळ रात्री एका विशिष्ट वेळी मला आम्लपित्ताचा त्रास होतो आणि औषधांचा काही उपयोग होत नाही’, असे त्यांना सांगितले. ‘याचे कारण वेगळे आहे’, हे कुंदाताईंनी जाणले आणि या आजारावर ‘स्वयंसूचना देणे’ हा उपाय सांगून त्यांनी आत्यांना रोगमुक्त केले.

४. माझ्या एका मैत्रिणीच्या समस्यांसाठी कुंदाताईंनी तिच्यावर संमोहन उपचार केले.

त्यामुळे ‘केवळ साधक आणि भक्तच नव्हेत, तर समाजातील कोणालाही साहाय्य करण्यास त्या तत्पर असतात’, हे लक्षात येते.

५. डॉ. (सौ.) कुंदाताईंची समष्टी साधना पाहून ‘त्यांचे गुरुकार्य साचेबद्ध नाही, तर पुष्कळ विशाल आहे’, असे लक्षात येणे : सध्या काही साधक पनवेल येथे कुंदाताईंना भेटायला आवर्जून येतात. त्यांनाही सत्संग मिळतो. असे कित्येकांना कुंदाताईंनी प्रीतीने जवळ केले आहे, समजून घेतले आहे आणि त्यांच्या साधनेतील अडथळे दूर केले आहेत. त्यांची ही समष्टी साधना पाहून वाटते, ‘त्यांचे गुरुकार्य हे साचेबद्ध नाही, तर पुष्कळ विशाल आहे.’ त्या प्रत्येकालाच म्हणतात, ‘‘प.पू. दादा आणि प.पू. बाबा सगळे बघून घेतात. आपण केवळ नामस्मरण करायचे !’’

६. डॉ. (सौ.) कुंदाताईंना साधनेच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारल्यावर त्यांनी पुस्तकी उत्तर न देता उत्स्फूर्तपणे उत्तर देणे : जेव्हा मी डॉ. (सौ.) कुंदाताईंना साधनेच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारते, तेव्हा त्यांचे उत्तर पुस्तकी नसते, तर ते उत्स्फूर्तपणे दिलेले असते. त्या वेळी त्या उदाहरण देतात. प्रसंग सांगतात. परिस्थितीचा विचार करण्यास सांगतात आणि ‘अनुभवातून शिकायचे’, असे म्हणतात. ज्या वेळी मी उत्तराच्या पुष्कळ खोलात जायचा प्रयत्न करून बौद्धिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या म्हणतात, ‘‘अगं, ते आपोआप घडते. प.पू. दादा आणि प.पू. बाबा घडवतात !’’ त्यानंतर माझा प्रश्न हा प्रश्न न रहाता मला तो विकल्प वाटू लागतो. प.पू. भक्तराज महाराज म्हणतात, ‘शंका म्हणजे भूत आणि पुनःपुन्हा विचारणे, म्हणजे पिशाच.’ याचा अर्थ तेव्हा उलगडला.                                                           (क्रमशः)

– सौ. अश्विनी मिलिंद जोशी, पनवेल, रायगड. (१२.३.२०२६)  

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024745.html