डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांचा लाभलेला प्रेमळ सहवास, त्यातून साधिकेला उमगलेल्या ‘साहित्य, कला, ज्योतिष, संगीत’ आदी विविध विषयांची जाण असलेल्या डॉ. (सौ.) कुंदाताई आणि त्यांची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

‘२१.२.२०२६ या दिवशी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या समवेत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. या वेळी परम भाग्याची गोष्ट म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीत मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि मार्गदर्शनही लाभले. मी त्यांना सांगितले, ‘‘कुंदाताई पनवेल येथे आमच्या घरी बर्‍याचदा वास्तव्यास असतात. त्यांच्या सत्संगामुळे माझ्यामध्ये बराच पालट झाला आहे. त्यांचे आचरण सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे असले, तरी त्यामधून मला साधनेच्या तात्त्विक आणि प्रात्यक्षिक गोष्टींविषयी अनेक सूत्रे लक्षात आली. ती सर्व सूत्रे मी लिहून ठेवली आहेत. यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘या लिखाणाचा सर्वांनाच लाभ घेता येईल. यासाठी ते लिखाण इकडे आश्रमात पाठवा !’’

घरी आल्यावर याविषयी विचार करत असतांना मला आठवले, ‘एकदा मी प.पू. जोशीबाबा यांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘तुमच्याकडे डॉ. (सौ.) कुंदाताई येत असतात, तर त्यांचा लाभ करून घ्या. त्यांच्याकडे ‘व्यक्ती’ म्हणून नाही, तर ‘तत्त्व’ म्हणून बघा.’’ काही वेळा माझ्या बहिणी, जावा आणि मैत्रिणी यांना मी सांगते, ‘‘आमच्याकडे डॉ. (सौ.) कुंदाताई आल्या आहेत.’’ तेव्हा त्या मला विचारतात, ‘‘त्या वेळी तू सेवा म्हणून वेगळे काय करतेस ? त्यातून तुला सत्संग कसा मिळतो ? आणि तुझी साधना कशी होते ?’’ याविषयी विचार करतांना माझ्या लक्षात आले, ‘दैनंदिन काम साधना म्हणून कसे करायचे ? तेव्हा नेमके आचरण कसे असावे ?’, हे डॉ. कुंदाताई प्रत्यक्ष कृतीतून दाखवतात. त्यामुळे याचे टिपण व्हायला हवे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या गोष्टीचे महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यानुसार डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या आतापर्यंतच्या भेटीतील बर्‍याचशा ठळक घटना, प्रसंग, लक्षात आलेली सूत्रे, अनुभूती, त्यांच्याबरोबरच्या प्रवासातील गमती इत्यादी सर्व येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने ‘डॉ. कुंदाताई यांच्याबरोबर असतांना शिकायला मिळालेली सूत्रे सर्वांनाच साधनेसाठी उपयुक्त ठरतील’, असा मला विश्वास आहे. हे लिखाण आमच्या मनाचा थेट ठाव घेणार्‍या आमच्या डॉ. (सौ.) कुंदाताई यांनाच मी समर्पित करते. हे लिहिण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती दिली’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

भाग १ 

डॉ. (सौ.) कुंदा आठवले

१. इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात डॉ. (सौ.) कुंदाताईंची झालेली प्रथम भेट !

१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूरच्या आश्रमातील भंडारा आणि कार्यक्रम यांची माहिती मिळाल्यावर इंदूरला जाण्याची उत्सुकता निर्माण होणे : यापूर्वी मी ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून विविध प्रकारच्या समष्टी सेवा साधना म्हणून करत होते; पण काही कालावधीपासून घरगुती कारणामुळे मी केवळ व्यष्टी साधनाच करत होते. त्या वेळी मला डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या संपर्कात येण्याचा योग आला नव्हता. माझ्या होमिओपॅथीच्या औषधांच्या दुकानात आणि यजमानांच्या, म्हणजेच डॉ. मिलिंद जोशी यांच्या चिकित्सालयात पनवेल येथील श्री. आणि सौ. अनंत कुलकर्णी औषधोपचारांसाठी येतात. ते बर्‍याचदा इंदूरला प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) आश्रमात जायचे. त्या संदर्भात आमचे बोलणे होत असे. तेथील भंडारा आणि कार्यक्रम यांची माहिती मिळाल्यावर माझ्या मनात इंदूरला जाण्याची उत्सुकता निर्माण झाली.

१ आ. गुरुपौर्णिमेला इंदूरच्या आश्रमात गेल्यावर ‘तेथील सहजपणा’ आणि ‘सनातनची शिस्तबद्धता’ असा मुख्य भेद लक्षात येणे : जुलै २०११ मध्ये मला तेथील गुरुपौर्णिमेला जाण्याचा योग आला. आतापर्यंत मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केली होती; मात्र इंदूर येथील आश्रमातील वातावरण मला वेगळे वाटले. प.पू. बाबांच्या शिकवणीचा मी थोडाफार अभ्यास केला होता. त्यामुळे तेथील आश्रमजीवन आणि साधना यांची पद्धत मला अनुभवता आली. एक वेगळा अनुभव म्हणूनच मी तेथे गेले होते. ‘सनातनची शिस्तबद्धता’ आणि ‘इंदूरच्या आश्रमातील सहजपणा’ हा मुख्य भेद त्या वेळी माझ्या लक्षात आला. आरंभी माझ्या मनात थोडेफार विकल्प आले; परंतु कालांतराने ते दूर झाले.

सौ. अश्विनी मिलिंद जोशी

१ इ. सकाळी आश्रमातील खोलीत डॉ. (सौ.) कुंदा आठवले आल्यावर त्यांची प्रथम भेट होणे आणि त्यांच्या भेटीनंतर आरंभी मनात आलेले थोडेफार विकल्प दूर होणे : आश्रमातील एका खोलीत आमची रहाण्याची सोय केली होती. सकाळी आम्ही सर्व जण आवरण्याच्या गडबडीत होतो. त्या वेळेपर्यंत मी कधीच डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या संपर्कात आले नव्हते. येथे सेवेचे कोणते दायित्व नसल्यामुळे मी निवांत होते. तेवढ्यात डॉ. (सौ.) कुंदाताई आमच्या खोलीत आल्या आणि त्यांनी सर्वांची चौकशी केली, ‘‘प्रवास कसा झाला ? चहा घेतला का ?’’ इत्यादी. त्याही वेळी मी त्यांची ओळख करून घ्यायला पुढे सरसावले नाही. नंतर त्या प्रसाधनगृहात गेल्या आणि येतांना ते स्वच्छ करूनच बाहेर आल्या. त्या वेळी त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘सगळ्यांनी लवकर आटपा. प्रत्येकाने बाहेर येतांना प्रसाधनगृह स्वच्छ करून या.’’ खोलीच्या बाहेर जातांना त्या शेवटचे वाक्य माझ्याकडे बघून म्हणाल्या, ‘‘सनातनचे (साधक) ना तुम्ही !’’ त्यानंतर येथे आल्यावर आरंभी जे थोडेफार विकल्प माझ्या मनात आले होते, ते लगेचच दूर झाले. आता त्या वातावरणात मी रुळू लागले होते.

१ ई. डॉ. (सौ.) कुंदाताईंनी आग्रह केल्यामुळे रांगेत उभे राहिल्यावर प.पू. रामानंद महाराज यांच्याकडून गुरुमंत्र मिळणे आणि ‘कुंदाताईंमुळेच हे शक्य झाले’, असे लक्षात येणे : नंतर तेथे गुरुमंत्र घेण्यासाठी सर्व जण रांगेत उभे राहिले होते. पुन्हा एकदा माझ्या मनात विकल्प आला. ‘गुरुमंत्र मागू नये’, असे माझ्या वाचनात आले होते. त्यामुळे मी त्या रांगेत उभी राहिले नव्हते. त्या वेळी माझ्याकडे बघून सौ. कुंदाताई म्हणाल्या, ‘‘हिलासुद्धा रांगेत उभे रहायला सांगा.’’ तसे मी म्हणाले, ‘‘नको ! मी पहिल्यांदाच आले आहे.’’ तरीही त्या म्हणाल्या, ‘‘जा, गं !’’ मी परत म्हणाले, ‘‘माझे एकही भजन पाठ नाही.’’ त्यानंतर मात्र त्या ओरडून म्हणाल्या, ‘‘जा म्हणते ना !’’ तशी मी घाबरून रांगेत उभी राहिले. नंतर प.पू. रामानंद महाराज यांच्याकडून मला गुरुमंत्र मिळाला. ‘पहिल्याच भेटीत अनुग्रह मिळाला’, यासाठी तेथील भक्तांनी माझे अभिनंदन केले. ‘असे सहसा घडत नाही’, असे काहींनी सांगितले. तेव्हा ‘माझ्या बाबतीत काहीतरी अनाकलनीय झाले आहे’, याची मला जाणीव झाली. नंतर मी डॉ. (सौ.) कुंदाताई यांचा आशीर्वाद घ्यायला गेले. ‘त्यांच्यामुळेच हे शक्य झाले’, असे नंतर माझ्या लक्षात आले.

अशी झाली माझी डॉ. (सौ.) कुंदाताई यांची पहिली भेट ! या भेटीत ‘दुसर्‍याच्या मनातील ओळखणे, शूद्र वर्णाची सेवा करणे आणि वाणीत संकल्पाची शक्ती असणे’, ही त्यांची वैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली.

(क्रमशः)

– सौ. अश्विनी मिलिंद जोशी, पनवेल, रायगड. (१२.३.२०२६)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024367.html