३१.३.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पनवेल येथील घरी साधिकेला डॉ. (सौ.) कुंदाताईंचा लाभलेला सत्संग आणि व्यवहार अन् अध्यात्म यांविषयी शिकायला मिळालेली सूत्रे, डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या मार्गदर्शनानुसार झालेले प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. अच्युतानंद महाराज या त्रयींच्या जन्मशताब्दी सोहळ्यांचे नियोजन’ आदी भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
भाग ३
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1024367.html

७. मुंबई येथील वास्तव्यात डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
७ अ. शांत आणि प्रसन्नता देणारी मुंबई येथील वास्तू ! : ‘मी मुंबई येथील डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या निवासस्थानी अनेक वेळा जाते. तेथील आश्रम नेहमीच झाडून पुसून स्वच्छ ठेवलेला असतो. तेथे पुष्कळ प्रसन्न वाटते. तेथील मोठे बाबा (श्री अनंतानंद साईश), प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांची छायाचित्रे जिवंत वाटतात. तेथे रहाण्याचा मला योग आला. तेव्हा रात्री मला पुष्कळ शांत वाटले आणि गारवा जाणवला.

७ आ. परिपूर्णता – ‘काम चोख तर करावेच; पण ते पद्धतशीरही झाले पाहिजे’, हे डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या आचरणातून लक्षात येणे : येथील वास्तव्यात एकदा भांडी धुवून आणि पुसून जागेवर लावतांना भांड्याला एक थेंब तसाच लागला होता, तो डॉ. (सौ.) कुंदाताईंनी तो बरोबर दाखवला. अशा वेळी घरी आपण एकतर पटकन हातानेच थेंब पुसतो किंवा पदराने वा ओढणीने तो पुसून टाकतो. त्यांनी शेजारी ठेवलेला रुमाल उचलला आणि तो थेंब पुसला. तेव्हा ‘काम चोख करावेच; पण ते पद्धतशीरपणेही झाले पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘डॉ. (सौ.) कुंदाताई किती सूक्ष्म विचार करतात’, हे कळले.
७ इ. काटकसरीपणा – ‘वस्तू लगेच टाकून न देता ती जपून आणि शेवटपर्यंत वापरावी’, याची जाणीव होणे : एकदा माझ्याकडे चहा करण्याची सेवा होती. त्या वेळी मी पाहिले, तर तेथील गाळणे तुटलेले होते. आजकाल मी वस्तू थोडी जुनी झाली किंवा खराब झाली की, लगेच ती टाकून देते. ‘एवढी काटकसर कशासाठी करायची ?’, असा माझा विचार असतो; पण आता लक्षात आले की, ‘सगळ्याची सवय हवी.’ वस्तू लगेच फेकून देणारे आपण आपत्काळात काय करणार आहोत ? ‘वस्तू मुळातच जपून वापरावी आणि ती शेवटपर्यंत वापरावी’, हे सूत्र मला कळले.
७ ई. प्रेमभाव – कामवाली बाईच्या अडचणीचाही विचार करणे : ‘कामवाली बाई’ हा सगळ्याच बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कधी कधी कुंदाताईंकडची बाई सुटी मागते. त्यामुळे कुंदाताईंना अधिक काम पडते. त्यामुळे एकदा मी पटकन त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही इथे असतांना ती सुटी का घेते ?’’ तेव्हा कुंदाताई म्हणाल्या, ‘‘तिच्याकडे पाहुणे येणार आहेत, तर ती कशी घराबाहेर पडू शकेल ?’’ त्यांच्याकडून हे वाक्य अशा पद्धतीने उच्चारले गेले की, त्यामुळे माझा दृष्टीकोनच पालटला. ‘कामवाली बाईचाही त्या किती विचार करतात’, हे मला कळले. यातून त्यांचा प्रेमभाव शिकायला मिळाला.
७ उ. ‘देवा हे प्रेम कसे ।’, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीचे स्मरण करून देणारी डॉ. (सौ.) कुंदाताई यांची प्रीती !
७ उ १. साधकांच्या प्रेमापोटी त्यांनी आणलेला खाऊ खाऊन संपवणे : कुंदाताईंकडे अनेक साधक भेटायला येत असतात. त्या प्रत्येकाचे आदरातिथ्य करतात आणि त्यांना चहा अन् खाऊ देतात. साधकही येतांना त्यांच्यासाठी खाऊ घेऊन येतात; पण त्यांना एकटीला हा खाऊ वेळेत संपवता येत नाही. बरेच दिवस झाल्यावर कधी कधी त्या खाऊतील चिवडा आदी मऊ पडतो; पण केवळ साधकांच्या प्रेमाखातर त्या तो खाऊ गरम करून खातात.
७ उ २. ‘प्रसाद’ म्हणजे प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांचा आशीर्वाद असल्याने ‘तो सगळ्यांना मिळायला हवा’, या भावाने अन् तळमळीने तो सर्वांपर्यंत पोचवणे : भंडार्याहून येतांना ‘प्रत्येकाच्या प्रसादाच्या पुड्या घेऊन येणे, त्यांच्यापर्यंत त्या पोचवणे, तसेच ‘प्रत्येकाला प्रसाद मिळेल’, याची दक्षता घेणे, यांमागे कुंदाताईंची तळमळ आणि सेवावृत्ती दिसून येते. ‘प्रसाद’ म्हणजे प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि प.पू. दादा (प.पू. रामानंद महाराज) यांचा आशीर्वादच असतो. तो सगळ्यांना मिळायला हवा’, असा त्यांचा भाव असतो. माझा मुलगा श्रेयस नोकरीच्या निमित्ताने पुण्याला असतो. ‘त्याच्यासाठी प्रसाद शीतकपाटामध्ये ठेव’, हे आवर्जून आठवण करून देणारी माऊली आम्हाला मिळाली आहे, हे आमचे थोर भाग्य आहे. या अनुषंगाने मला प.पू. भक्तराज महाराज यांचे एक भजन ‘देवा हे प्रेम कसे’ यातील ओळी आठवतात,
‘प्रीत लावुनी वेडे केले । मधुर वचने मज तोषवियले ।
आपुले म्हणूनी त्वा संबोधियले । ते विसरू कसे ।
देवा हे प्रेम कसे ।। १ ।।’
७ ऊ. सातत्य – डॉ. (सौ.) कुंदाताईंनी अनेक गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची प्रकृती सांभाळणे, त्यातून ‘देहाची काळजीही त्या ‘साधना’ म्हणून घेतात’, हे लक्षात येणे : कुंदाताईंना डोळ्यांच्या उपचारांसाठी बर्याचदा नेत्रतज्ञांकडे जावे लागते. प्रत्येक अर्ध्या घंट्याने त्यांना डोळ्यांत ‘आय ड्रॉप’ घालावे लागतात. अगदी दिवसातून १५ – १६ वेळा ते घालावे लागतात; पण हे सर्व त्या पूर्ण दक्षतेने करतात. एरव्हीही ‘औषधे वेळच्या वेळी घेणे, नियमित रक्ताच्या चाचण्या करणे, चालण्याचा व्यायाम करणे’, यांचे त्या काटेकोरपणे पालन करून स्वतःची प्रकृती सांभाळतात. यावरून वाटते, ‘त्यांनी घराचा आश्रम तर केलाच आहे; पण देहाचेही मंदिर केले आहे !’ त्यांच्या अंतरंगात केवळ त्यांचे गुरु विराजमान आहेत. त्यामुळे देहाची काळजीही त्या ‘साधना’ म्हणूनच घेतात. ‘त्यांचे हे असामान्यत्व जवळून बघता येणे’, हे आमचे भाग्यच आहे.
डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या सत्संगामुळे होत असलेली साधना

१. पूर्वी ‘डॉ. (सौ.) कुंदाताई येणार असल्या की, ‘सर्व गोष्टी नियोजनानुसार व्हाव्यात’, असा आग्रह असणे; पण आता तसे घडले नाही, तर त्याचा त्रास न होता ‘वर्तमानात रहायला हवे’, हे लक्षात येणे
कुंदाताई घरी येणार असल्या की, माझे पूर्वनियोजन चालू होते. ‘सर्व गोष्टी नियोजनानुसारच व्हाव्यात’, असा माझा पूर्वी आग्रह असायचा; पण पुढे सर्व गोष्टी नियोजनानुसार घडत नाहीत’, असे माझ्या लक्षात आल्यावर माझा गोंधळ उडायचा आणि वाईट वाटायचे. नंतर माझ्या लक्षात आले, ‘कुंदाताईंना काय अपेक्षित आहे ?’ याचा विचार व्हायला हवा आणि त्यांना विचारून गोष्टी करायला हव्यात’, तरच माझी साधना होईल !’ त्यानंतर मी नियोजन करायचे; पण त्याप्रमाणे घडले नाही, तर त्याचा त्रास करून घेणे सोडले. त्यामुळे ‘वर्तमानात रहायला हवे’, हे माझ्या लक्षात आले. यामुळे बुद्धीचा अडथळा बर्याच प्रमाणात न्यून होणे चालू झाले; कारण आता ‘मी आयत्या वेळीही नियोजनासाठी सिद्ध आहे’, हे अनुभवत आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सेवा भक्तीने करता येऊ लागणे
एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना प्रश्न विचारला होता, ‘‘मी बुद्धीने सेवा करत आहे; पण ती भक्तीने करणे मला जमत नाही.’’ त्यावर त्यांनी ‘‘भक्तीने करणेही जमेल’’, असे सांगितले. त्यानंतर खरेच ‘तसे घडत आहे’, असे मला वाटते.’
३. साधनेमध्ये स्थिरता येणे काय हे अहोभाग्य अमुचे की, आलो तुझिया पायी ।
करीतसे स्वीकार, देते आकार जिवाला, अशा आमच्या कुंदाताई ।।
डॉ. (सौ.) कुंदाताईंचा सहवास हा मला नवविधा भक्तीचा एक प्रवास वाटतो. यांपैकी एक म्हणजे सख्यभक्ती. ही ईश्वराकडून चालू होते, त्याप्रमाणे कुंदाताईंनी आम्हाला जवळ केले आहे, स्वीकारले आहे; म्हणूनच ‘साधनेमध्ये मला स्थिरता येत आहे’, अशी माझी श्रद्धा आहे. यासाठी त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
– सौ. अश्विनी मिलिंद जोशी
७ ए. टापटीपपणा आणि परिपूर्णता – प्रवासासाठी आवराआवर करतांना डॉ. (सौ.) कुंदाताईंकडून ‘व्यस्ततेमध्येही कामांत समतोल कसा साधायचा ?’, हे शिकता येणे : मुंबई येथून इंदूर किंवा गोवा येथे जातांना ‘सामानाची बांधाबांध’ हे एक मोठे काम असते. ‘भांडी धुवून-पुसून आत ठेवणे, धूळ बसू नये; म्हणून बिछान्यावरील चादरीवर आच्छादन घालणे, कामवाल्या बाईला सूचना देणे, बरोबर घेऊन जायच्या कपड्यांना इस्त्री करून घेणे, उरलेली फळे, खाऊ, उपवासाचे पदार्थ आदी आठवणीने सोबत घेणे, शीतकपाटातील खराब होणारे पदार्थ किंवा संपवायचे पदार्थ यांचे नियोजन करणे, तसेच गोव्याला काही न्यायचे असल्यास त्याचे वेगळे ‘पॅकिंग’ करणे, इंदूरला नेण्याच्या वस्तू व्यवस्थित भरून ठेवणे इत्यादी सर्व तयारी करायची असते. हे त्यांची प्रत्येक वेळचीच तयारी आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत टापटीपपणा आणि परिपूर्णता दिसून येते. त्यांच्याकडे व्यस्ततेमध्येही कामांत समतोल साधण्याचे तंत्रज्ञान आहे. यातून ‘योग्य आणि परिपूर्ण कृतीमधून समाधान मिळते’, हे शिकता येते.
७ ऐ. कृतज्ञताभाव – ‘डॉ. (सौ.) कुंदाताई जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी गुरुतत्त्व अनुभवत असून ‘हीच त्यांची उन्मनी अवस्था आहे’, असे वाटणे : सध्या वयोमानानुसार काही गोष्टींसाठी त्यांना साहाय्याची आवश्यकता असते. जे कोणी त्यांच्याबरोबर असतात, त्यांना त्या म्हणतात, ‘‘मी तुम्हाला त्रास देते ना गं ?’’ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या सेवेमध्ये जे साधक आहेत, त्यांना तर त्या हात जोडून म्हणतात, ‘‘तुमच्या इतके करणे मला जमले नसते.’’ मला डॉ. (सौ.) कुंदाताईंची ही उन्मनी अवस्था वाटते. त्यांच्या गुरूंप्रती त्या सतत कृतज्ञताभावामध्ये असतात. तोच त्यांचा भाव आता साधकांसाठीही दिसतो; कारण साधकांमध्येही त्यांना गुरूंचे दर्शन होत असावे ! कुंदाताईंचे एक ब्रीदवाक्य आहे, ‘‘प.पू. दादा आणि प.पू. बाबा मला सांभाळतात.’’ त्या आता जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी गुरुतत्त्व अनुभवतात अन् हीच त्यांचे मन उन्मन झाल्याची खूण आहे.
– सौ. अश्विनी मिलिंद जोशी, पनवेल, रायगड. (१२.३.२०२६)
प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथील आश्रमातील वास्तव्यात डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची अनुभवलेली सेवाभावी वृत्ती आणि त्यांनी दिलेली साधनेची शिकवण

१. इंदूर येथील आश्रमात ‘साधना बुद्धीने नाही, तर भाव आणि सेवा या माध्यमांतून करावी’, याविषयी डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी दिलेली शिकवण
१ अ. अखंड सेवारत असलेल्या डॉ. (सौ.) कुंदाताई ! : प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील आश्रमात डॉ. (सौ.) कुंदाताई अखंड सेवाभावात असतात. बर्याच दिवसांनी भेटलो; म्हणून भक्तांशी गप्पा मारणे किंवा साधकांनी भंडारा होण्याच्या आधी खरेदीसाठी बाहेर पडणे, हे त्यांना फारसे पटत नाही. प.पू. भक्तराज महाराज असतांनाही डॉ. (सौ.) कुंदाताई स्वतः कधीच आश्रमाच्या बाहेर पडल्या नव्हत्या.
१. इंदूरला कुंदाताईंच्या हातची सोलकढी आणि पोहे खाण्यासाठी भक्तमंडळी आवडीने त्याची मागणी (फर्माईश) करतात.
२. भंडार्याच्या शिदोरीसाठी लागणार्या चटणीची सेवा सौ. कुंदाताई करतात.
३. इंदूर आश्रमात होणार्या श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी लागणारा शिर्याचा प्रसाद त्या आणि जोगकाकी मिळून करतात.
४. अनंत चतुर्दशीच्या भंडार्याला कुंदाताईंचे ‘२१ मोदकांसाठी लाट्या करणे, मोदक करून ते तळणे आणि त्यांची आहुती देणे’, हे सर्व ठरलेले असते.
१ आ. इंदूरच्या आश्रमात साधिकेला बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी अनुभवास येणे : एकदा एका यज्ञाच्या वेळी आहुती म्हणून दिल्या गेलेल्या नारळावर श्री गणपतीचे दर्शन झाले. हे प्रथम सौ. कुंदाताईंनीच निदर्शनास आणून दिले. त्या वेळी गणपतिबाप्पाचे चित्रीकरण करण्याची सेवा त्यांनी माझ्याकडून करून घेतली. इंदूरच्या आश्रमामध्ये बुद्धीच्या पलीकडचे काही ना काही नेहमीच अनुभवायला येते. या प्रसंगानंतर, म्हणजे श्री गणपतीचे दर्शन घडल्यानंतर मात्र माझ्या बुद्धीने माघार घेणे चालू केले.
१ इ. डॉ. (सौ.) कुंदाताईंचे आपुलकीचे वागणे पाहून साधिकेला आश्चर्य वाटणे आणि ‘कल्पनेच्या पलीकडे जाऊन भगवंत देत असतो’, हे उमगल्याने तिचे कल्पनेच्या विश्वात रहाणे न्यून होणे : माझा कल्पनेच्या विश्वात रमणे किंवा मनोराज्यात रमणे, असा स्वभाव आहे. कुंदाताईंच्या संदर्भातील सेवा करतांनाही काही वेळा मी कल्पनेच्या विश्वात रमते. आश्रमात कुंदाताईंच्या खोलीमध्ये कपडे अडकवण्याचा एक ‘बार’ आहे. त्याचा फारसा वापर होत नाही; पण हाताळायला सोपे व्हावे; म्हणून कुंदाताईंच्या काही गोष्टी, उदा. पाण्याची पिशवी, घडी घालून ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, दाराचे कुलूप आदी सर्व मी त्या बारवर अडकवायला चालू केले. एकदा त्यांची फळांची पिशवी सापडत नव्हती. बरेच शोधल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘त्या बारवर बघा.’’ तेव्हा ती पिशवी तिथे सापडली. ‘ही पिशवी मी तिकडे कधी अडकवली होती’, हे मला आठवतच नव्हते. हे झाल्यावर त्या माझ्यावर न रागवता त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाने आणि आपुलकीने एक थाप मारली अन् म्हणाल्या ‘‘ही एक सगळे लटकवून ठेवत असते !’’ असे बोलून त्या हसू लागल्या. मला त्यांचे असे आपुलकीचे वागणे पाहून आश्चर्य वाटले; कारण मी अशी कल्पनाच कधी केली नव्हती. त्या वेळी ‘कल्पनेच्या पलीकडे जाऊन भगवंत आपल्याला देत असतो’, हे उमगल्यावर माझे कल्पनेच्या विश्वात रहाणे न्यून झाले.
१ ई. आरंभी डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या कृतींमागचा कार्यकारणभाव न कळणे; मात्र ‘या प्रक्रियेतून स्वतःच्या चित्तावरील संस्कार पुसट होत असून स्वतःत चांगले पालट होत आहेत’, याची साधिकेला जाणीव होणे
अ. प्रवासामध्ये डॉ. (सौ.) कुंदाताईंचे पुष्कळ साहित्य असते. त्यामुळे एखादी वस्तू ‘नेमकी कुठल्या बॅगेत ठेवली आहे ?’, हे शोधावे लागते. त्यासाठी परत परत त्याच बॅगेतही शोधावे लागते. असे शोधूनही ती वस्तू मला न सापडता शेवटी कुंदाताईंनाच सापडते. त्या वेळी ‘माझ्याकडून नीट सेवा झाली नाही’, असे मला वाटते.
आ. कुंदाताईंच्या धुतलेल्या साडीची घडी घालून ती मी वाळत टाकल्यावर ‘अशी नव्हे, तशी घडी कर. दांडीवर इकडच्या बाजूला नको, तर तिकडच्या बाजूला साडी वाळत घाल’, असे त्या सांगतात.
इ. दुपारी फळ खायची आठवण केल्यावर ‘आता नको, नंतर खाते’, असे त्या म्हणणार आणि नंतर ‘तुम्ही आठवण केली नाही’, असे म्हणून मला ओरडणार !
त्यांच्या या कृतींमागचा कार्यकारणभाव मला पूर्वी कळायचा नाही. ‘माझ्याकडून सेवा होत आहे कि नाही ?’, हेही मला कळत नव्हते. असे अनेकदा घडल्यावर मला उलगडा झाला की, ‘या प्रक्रियेतून माझ्या चित्तावरचे संस्कार पुसट होत आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती स्वीकारण्याची माझी सिद्धता होत आहे. मी पूर्वी जे ताण घेऊन आणि भीतीने करत होते, ते आता सहजतेने अन् विनातक्रार करत आहे. माझ्याकडून आज्ञापालन सहजतेने होत आहे; कारण ‘माझ्या मनातील जडत्व किंवा अडथळा यांवरच घाव बसला आहे’, हे लक्षात आले. ‘माझ्यात हा पुष्कळ मोठा पालट केवळ डॉ. (सौ.) कुंदाताईंमुळे घडत आहे’, असे मला वाटते.
१ उ. साधिकेकडून झालेल्या चुका आणि त्या झाल्यावर तिला सांभाळून घेतांना डॉ. (सौ.) कुंदाताईंनी ‘तुम्ही अनुसंधानात नसता’, असे सांगणे
१. एकदा इंदूर ‘स्टेशन’वर उतरतांना कुंदाताईंची महत्त्वाची बॅग गाडीतून काढायची राहून गेली. नंतर त्यांच्याच ते लक्षात आले. ‘आम्ही तसेच पुढे गेलो असतो तर ? ती बॅग खरंच हरवली असती तर !’, या विचारांनी मात्र मला नंतर धडकी भरली होती.
२. एकदा ’श्याम साईं’च्या मठामध्ये जातांना त्यांनी एक पिशवी घेण्यास सांगितले होते, तरीही मी ती नेण्यास विसरले.
३. एकदा नर्मदामैयाची ओटी भरून झाल्यावर मी पुढे आले आणि त्यांची वाट बघत थांबले. नंतर कुंदाताई आल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘पाणी दे.’’ तेव्हा माझ्याकडे असलेली त्यांची पाण्याची पिशवी मी त्यांच्या खोलीमध्येच ठेवून आले होते. ‘वास्तविक ओटी भरून आल्यावर त्यांना तहान लागेल’, हे माझ्या लक्षात यायला हवे होते. अशा अनेक चुका माझ्याकडून होतात. त्या वेळी त्या सांभाळून घेतात; पण सांगतात, ‘‘तुम्ही अनुसंधानात नसता !’’
१ ऊ. इंदूर आश्रमात साधिकेने सूत्रसंचालन करतांना ‘अंगातील कलेचे सादरीकरण ‘सेवा’ म्हणून व्हायला हवे’, याची डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी स्पष्टपणे करून दिलेली जाणीव : ‘एखाद्या कार्यक्रमात मी सूत्रसंचालन करू शकते’; म्हणून एका साधकाने इंदूर आश्रमातील भक्तांना माझे नाव सुचवले होते. मी ती सेवा करण्यासाठी आश्रमातील त्या ठिकाणी गेले. नंतर डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या ते लक्षात आले. त्यांनी मला बोलावले आणि रागावून विचारले, ‘‘तुला तिथे जाण्याची काय आवश्यकता होती ? तुलाही तेच हवे होते ना ?’’ असे म्हणत त्यांनी माझा हात झिडकारला. नंतर मला त्यांच्या रागाचे कारण कळले. ‘अंगात कला आहे; म्हणून हे सर्व केले, तर अहं वाढतो; पण सेवा म्हणून केले, तर ती सत्कारणी लागते’, असे त्यांचे म्हणणे होते. माझा हेतू चुकीचा होता. त्यामुळे त्या चिडल्या आणि त्यांनी मला सावध केले. त्या वेळी ‘गुरूंचे आपल्यावर केवढे लक्ष नव्हे, तर प्रेम आहे’, याची जाणीव होऊन मीही तो नाद सोडला. नंतर पुढील वर्षी ‘प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या’निमित्त श्री. राजूदादांनी (प.पू. रामानंद महाराज यांच्या चिरंजिवांनी) कुंदाताईंना विचारले, ‘‘अश्विनीला सूत्रसंचालन करू दे का ?’’ त्यावर त्यांनी लगेच होकार दिला. नंतर मी ती सेवा स्वीकारली.
१ ए. वयाच्या ८२ व्या वर्षी डॉ. (सौ.) कुंदाताईंनी ‘गोव्याहून मुंबई आणि मुंबईहून इंदूर’, असा धावपळीचा प्रवास करून भंडार्याला जाणे, यातून त्यांची गुरुभेटीची तळमळ अन् ओढ दिसून येणे : भंडार्याला जाण्यासाठी डॉ. कुंदाताई गोव्याहून मुंबईला येतात आणि लगेच दुसर्या दिवशी इंदूरला जायला निघतात. ‘वयाच्या ८२ व्या वर्षी अशी धावपळ करणे’, यातूनच गुरुभेटीची त्यांची तळमळ आणि ओढ दिसून येते. आतापर्यंत त्यांनी एकही भंडारा चुकवलेला नाही. त्या म्हणतात, ‘‘भ्रमणाच्या बाबतीत प.पू. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे.’’
१ ऐ. डॉ. (सौ.) कुंदाताईंनी ‘साधना बुद्धीने नाही, तर भाव आणि सेवा या माध्यमांतून करायची’, असा धडा देऊन ती करूनही घेणे : कुंदाताईंच्या बाबतीत लिहिण्यासारखे, तसेच मी त्यांच्याकडून शिकलेल्या सूत्रांविषयी लिहिण्यासारखेही पुष्कळ आहे. प्रत्यक्ष सहवासातून त्यांनी मला घडवले. माझा अहं न्यून केला. ‘साधना बुद्धीने नाही, तर भाव आणि सेवा यांद्वारे करायची’, असा धडा देऊन त्यांनी ती करूनही घेतली. यासाठी मी त्यांची कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगेपर्यंत ‘या गोष्टी लिहून दिल्या पाहिजेत’, अशी मला बुद्धीही झाली नव्हती. ‘डॉ. (सौ.) कुंदाताईंची ही ओळख सर्व साधकांना सांगितली पाहिजे’, हे माझ्या लक्षातही आले नाही. मी केवळ ‘त्यांच्या सत्संगाचा मला लाभ झाला’, याच विचारांत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने ‘डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या बरोबर असतांना शिकायला मिळालेली सूत्रे सर्वांनाच साधनेसाठी उपयुक्त ठरतील’, असा मला विश्वास आहे.
कृतज्ञता आणि प्रार्थना
हे लिखाण आमच्या मनाचा थेट ठाव घेणार्या आमच्या डॉ. (सौ.) कुंदाताई यांनाच मी समर्पित करते. हे लिहिण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. ‘डॉ. (सौ.) कुंदाताई आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांना प्रकृती स्वास्थ्य लाभो अन् दीर्घायुष्य मिळो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना ! डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या सहवासातून मला जी सूत्रे उमजतात, ‘त्यांचा अवलंब कसा करावा ?’, हे तुम्हीच मला शिकवा, अशी गुरुचरणी नम्र प्रार्थना !’
(समाप्त)
– सौ. अश्विनी मिलिंद जोशी, पनवेल, रायगड. (१२.३.२०२६)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !