India Fuel Aid : बांगलादेशानंतर भारताचे आता श्रीलंकेला साहाय्य !

३८ सहस्र मेट्रिक टन तेलाचा केला पुरवठा !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा

नवी देहली – ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ बंद झाल्याने संपूर्ण जगालाच ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटात भारताने बांगलादेशाच्या पाठोपाठ आता श्रीलंकेलाही तेलाचा पुरवठा केला आहे. भारताने श्रीलंकेला ३८ सहस्र मेट्रिक तेलाचा पुरवठा केला. यांत २० सहस्र मेट्रिक टन डिझेल, तर १८ सहस्र मेट्रिक टन पेट्रोल यांचा समावेश आहे. भारताच्या या साहाय्यानंतर श्रीलंकेने भारताप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

चीनने संकटकाळात श्रीलंकेला कोणतेही साहाय्य केले नाही ! – विरोधी पक्षानेते प्रेमदासा

श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांनी भारताचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, खर्‍या नात्याची ओळख संकटकाळातच होते आणि भारताने या कठीण प्रसंगी श्रीलंकेला साथ देऊन हे सिद्ध केले. विशेष म्हणजे श्रीलंकेने याच वर्षी जानेवारी महिन्यात चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या हंबनटोटा बंदराजवळ २ लाख बॅरल क्षमतेची तेल शुद्धीकरण प्रकल्प सिद्ध करण्यासाठी चीनचे सरकारी ऊर्जा आस्थापन ‘सिनोपेक’समवेत ३.७ अब्ज डॉलरचा (३४ सहस्र ७८० कोटी रुपयांचा) करार केला असूनही या संकटकाळात चीनकडून श्रीलंकेला कुठलेही साहाय्य मिळाले नाही. (प्रेमदासा यांनी आता त्यांच्या देशाने चीनपासून लांब राहून भारताला मोठा भाऊ समजत त्याच्या सुरक्षेत कोणतीही बाधा येणार नाही, यासाठी कृती करणे आवश्यक आहे ! – संपादक)

प्रेमदासा यांच्या या ‘एक्स’ पोस्टवरून त्यांनी चीनवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे बोलले जात आहे.

संपादकीय भूमिका

भारताने अशा प्रकारचे औदार्य दाखवण्यात चुकीचे काही नाही; मात्र त्या बदल्यात अशा देशांकडून तेथील हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे होणार नाहीत, याची ग्वाही घेतली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !