आज ‘श्रीरामनवमी’ आहे त्या निमित्ताने…

१. दैवी हत्तीला पराभूत करणारी छाती (वारणमं पोरुद मारबुम्)
रावण अत्यंत शक्तीशाली होता. एकदा नारदमुनींनी त्याला सांगितले, ‘‘तुझी शक्ती छोट्या राजांवर वाया घालवू नकोस.८ दिशांचे रक्षण करणारे ८ ‘दिग्गज’ (दैवी हत्ती) आहेत. त्यांच्यावर तुझा पराक्रम गाजव.’’ रावण त्वरित ईशान्य दिशेला गेला आणि त्याने आव्हान दिले. तिथे १ सहस्र हत्तींचे बळ असलेला आणि ४ सुळे असलेला दिग्गज आला. रावणाने त्याला युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा तो हत्ती म्हणाला, ‘‘आपले युद्ध थोड्याच वेळात संपेल.’’
त्यावर रावण म्हणाला, ‘‘तू पूर्ण शक्तीनिशी माझ्यावर चालून ये. तुझ्या ४ सुळ्यांनी माझ्या छातीवर वार कर आणि त्यांना छातीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कर. मग मी माझ्या २० हातांनी तुला मारीन. तू स्वतःला वाचवून दाखव. पाहू कोण जिंकते ? तू प्राणी असल्याने पहिली संधी मी तुला देत आहे.’’ असे म्हणून रावण आपले हात मागे बांधून ताठ उभा राहिला. त्या हत्तीने धावत येऊन रावणाच्या छातीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्याचे सुळे रावणाच्या छातीतून आरपार बाहेर आले; पण रावण दगडासारखा अढळ उभा राहिला. त्याने हठयोगाद्वारे ‘श्वासबंधन’ केले होते. हत्तीला आपले सुळे बाहेर काढता आले नाहीत. शेवटी सुळे तिथेच तुटले आणि हत्ती पराभूत होऊन परतला.

रावण इतका बलाढ्य आणि शक्तीशाली होता; पण आता जेव्हा अंजनेयाने (हनुमानाने) त्याच्या पाठीवर मुष्टीप्रहार केला, तेव्हा वारुळातून साप बाहेर यावेत, तसे सर्व सुळे बाहेर गळून पडले. ‘बलाढ्य हत्तीचे आक्रमण सोसणारी ती छाती कुठे होती ? आता ती शक्ती काय कामाची ? ही छाती असली काय किंवा नसली काय ?’, या विचाराने रावणाने त्याची छाती तिथेच सोडून दिली. ‘ऐरावताचे सशक्त सुळे मी माझ्या छातीवर अलंकार म्हणून धारण केले आहेत’, असा रावणाला अहंकार होता; मात्र हनुमानाच्या एका प्रहारामुळे रावणाच्या छातीत रुतलेले हे सर्व सुळे जेव्हा बाहेर पडले, तेव्हा स्वतःच्या छातीच्या शक्तीविषयीचा त्याचा अहंकार गळून पडला. त्यामुळे ‘आता या छातीचा काय उपयोग ? मी तिला येथेच सोडून देतो’, असे त्याला वाटले. येथे छाती म्हणजे त्याचा अहंकार होय.

‘कंब रामायणात एक अतिशय सुंदर श्लोक आहे. त्यामध्ये युद्धाच्या वेळी श्रीराम रावणाला परत जाण्यास आणि दुसर्या दिवशी येण्यास सांगतो. असे सांगितले जाते की, त्या वेळी रावणाने ‘स्वतःचे वक्षस्थळ, खांदे, जिव्हा, १० मस्तकांवर विराजमान असलेले १० मुकुट, भगवान शिवाने दिलेली ‘चंद्रहास’ तलवार आणि युद्धभूमीवरील स्वतःचे शौर्य’ तिथेच सोडून दिले अन् तो रिकाम्या हाताने परत गेला.
कंब रामायणातील तमिळ भाषेतील हा श्लोक पुढे दिला आहे.
वारणमं पोरुद मारबुम, वरैयीनै एडुत्त तोळुमं
नारद मुनीवरक्कू एर्प नयमपड उरैत्ता नावुम
तार अणि मौली पत्तुमं शंकरन कोडुत्त वाळुम
वीरमुं कळत्ते पोट्टू वेरुम कैये मीण्डु पोना – कंब रामायण, युद्ध कंदम्, ६.१५.१
श्लोकाचा अर्थ : हे काव्य रावणाच्या त्या दयनीय अवस्थेचे वर्णन करते, जेव्हा श्रीरामाने त्याला जीवनदान दिल्यावर तो लंकेला परततो. यामध्ये असे म्हटले आहे, ‘ज्या वक्षस्थळावर कधी काळी दिग्गज हत्तींच्या खुणा होत्या, ज्या खांद्यांनी कैलास पर्वत उचलला होता, ज्या जिभेने नारदमुनींना प्रसन्न करणारे वेदगायन केले होते, ते १० फुलांनी सजवलेले मुकुट, भगवान शंकराने दिलेली ‘चंद्रहास’ तलवार आणि त्याचे प्रसिद्ध शौर्य’, हे सर्व रावण रणांगणावरच विसरून आला. रावण आपल्या राजवाड्यात परतला. तेव्हा त्याच्या हातात काहीही नव्हते. तो पूर्णपणे रिकाम्या हाताने आणि अपमानित होऊन परतला.
‘रावणाने स्वतःचे मुकुट आणि तलवार रणांगणावर सोडली’, हे समजू शकतो; परंतु ‘त्याने स्वतःचे खांदे, वक्षस्थळ आणि स्वतःची जिव्हा तिथेच सोडली’, याचा नेमका अर्थ काय ?
२. कैलास पर्वताला हलवणारे रावणाचे शक्तीशाली खांदे (वरैयीनै एडुत्त तोळुमं )
रावणाने त्याच्या अफाट शक्तीने प्रत्यक्ष कैलास पर्वत एखाद्या चेंडूप्रमाणे हलवला होता. हे त्याने अढळ शिवभक्तीच्या बळावर केले होते. त्या शक्तीला काय झाले ? लक्ष्मण बेशुद्ध पडला असतांना रावणाला वाटले, ‘जर मी लक्ष्मणाचे अपहरण करून त्याला कारागृहात ठेवले, तर रामाला हरवणे सोपे जाईल.’ या विचाराने त्याने लक्ष्मणाला उचलण्याचा प्रयत्न केला; पण तो लक्ष्मणाला एक इंचभरही हलवू शकला नाही. त्यामुळे त्याने त्याचे खांदे युद्धभूमीवरच सोडून दिले.
३. नारदमुनींना कौशल्याने उत्तर देणारी जिव्हा (नारद मुनीवरक्कू एर्प नयमपड उरैत्ता नावुम)
जेव्हा नारद त्यांची महती वीणा वाजवत असत, तेव्हा रावणही त्यांच्या समोर रुद्र सामगायन करत असे. सामगायनावरील वादविवादाच्या वेळी त्याच्या समोर नारदांचाही पराभव झाला होता. आज जेव्हा रामाने रावणाला ‘परत जा आणि उद्या पुन्हा ये’, असे सांगितले, तेव्हा रावणाच्या ज्या जिभेने नारदांना चातुर्याने हरवले होते, तीच जीभ जणू जखडली गेली होती. ‘मी उद्या का येऊ ? मी आजच लढीन’ आणि ‘काय होते ?’, ते पाहीन’, असे सांगण्यास रावणाची जीभ असमर्थ ठरली. त्यामुळे त्याने त्याची जीभ तिथेच युद्धभूमीवर सोडली आणि तो रिकाम्या हाताने परत गेला.
४. रावणाच्या मस्तकावर सुशोभित असलेले १० मुकुट (तार अणि मौली पत्तुमं)
५. शंकराने दिलेली तलवार (शंकरन् कोडुत्त वाळुम् )
रावणाला भगवान शिवाने ‘चंद्रहास’ नावाची तलवार दिली होती. रावणाने त्या तलवारीचा वापर केला नाही. त्यामुळे त्या तलवारीने विचार केला, ‘भगवान शिवाने मला अशा भित्र्या माणसाला का दिले ?’ आणि ती स्वतःहून शिवाकडे परत गेली.
६. रावणाने त्याचा पराक्रम युद्धभूमीवर सोडला आणि तो रिक्त हाताने परत गेला ! (वीरमुं कळत्ते पोट्टु वेरुम कैये मीण्डु पोनां)
रावणाला स्वतःचा पराभव झाल्याची चिंता नव्हती; परंतु ‘सीता माझ्याविषयी काय विचार करील ?’, असा विचार त्याच्या मनात आला. त्याच्या कामवासनेमुळे त्याचे वीर्य (पराक्रम) निघून गेले होते. अशा प्रकारे त्याने त्याच्या पराक्रमाची सर्व ओळख रामासमोर युद्धभूमीवर सोडली आणि तो रिक्त हातांनी परत गेला.
रावणाशी युद्ध करतांना भगवान श्रीरामाने रावणाची सर्व शस्त्रे, त्याचा रथ, सारथी आणि त्याचा मुकुट सर्वकाही नष्ट केले. रावण पूर्णपणे शस्त्रहीन, हतबल, थकला-भागलेला आणि हताश होऊन उभा होता. रामाने त्या क्षणी त्याला सहज मारले असते; मात्र श्रीराम केवळ एक आदर्श मुलगा, भाऊ, पती आणि मित्रच नव्हता, तर तो एक आदर्श शत्रूही होता. एकेकाळी बलाढ्य असलेल्या आणि ज्या गोष्टींचा गर्व होता, त्या सर्व गोष्टी गमावलेल्या रावणाची ती दयनीय अवस्था रामाने पाहिली. अपार दयेपोटी करुणामूर्ती रामाने रावणाला सांगितले, ‘‘तू घरी जा. विश्रांती घे. ताजातवाना हो आणि उद्या तुझी सर्व शस्त्रे घेऊन पुन्हा युद्धासाठी ये.’’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ६० वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (२५.७.२०२४)
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !