गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर यजमानांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतरही स्थिर राहून परिस्थितीला खंबीरपणे सामोर्‍या जाणार्‍या श्रीमती प्रियांका वाडकर !

सौ. ज्योत्स्ना जयवंत जगताप

१. जावयांच्या निधनापूर्वी

१ अ. जावई अतीदक्षता विभागात (आय.सी.यू.मध्ये) असतांनाही स्थिर राहून त्यांची सेवा करणे : ‘माझी मुलगी प्रियांका हिचे यजमान (माझे जावई) प्रदीप वाडकर अतीदक्षता विभागात (आय.सी.यू.मध्ये) असतांना सभोवतालचे वातावरण फार गंभीर होते. प्रदीप यांची प्रकृती कधी बिघडायची, तर कधी चांगली असायची. अशा परिस्थितीतही प्रियांका स्थिर राहून त्यांची सेवा करत होती. ती केवळ ‘प्रदीप बरे होतील’, याच विचाराने निःस्वार्थीपणे त्यांची सेवा करत होती.

१ आ. यजमानांच्या आरोग्याविषयी प्रतिदिन नवीन अडचण उद्भवणे आणि गुरूंवरील श्रद्धेमुळे प्रियांकाने त्या प्रसंगाला धिराने सामोरे जाणे : सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ तिला उपायांसाठी नामजप सांगत असत. ती तो नामजप करायची आणि श्री. वाडकरकाका (प्रदीपचे काका) यांनाही पाठवायची. ते घरी राहून जप करायचे. प्रियांका मला, तिच्या वडिलांना आणि साधिका श्रीमती भारती पालन (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६९ वर्षे) यांना जप करायला सांगत असे. ती स्वतः महामृत्युंजयाचा जप सातत्याने करत होती. तिची गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ती कुठेही डगमगत नव्हती. आधुनिक वैद्य प्रत्येक दिवशी नवीन अडचण सांगत असत. ती धिराने त्या प्रसंगांना सामोरी जात होती.

श्रीमती प्रियांका वाडकर

१ इ. ‘गुरुदेवांनी मुलीला लहान वयात धीट बनवून तिला साधनेचे कवच दिले’, असे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे : एक दिवस ती मला म्हणाली, ‘‘आधुनिक वैद्यांनी मला प्रदीप यांची सर्व स्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुला प्रदीप यांच्याविषयी सांगायला मला भीती वाटत नाही. तू फार धीट आहेस.’’ तेव्हा मला गुरुदेवांची फार आठवण आली. मला‍ नेहमी वाटायचे, ‘प्रियांका लहानपणापासून साधना करत आहे; पण तिची अजून आध्यात्मिक प्रगती कशी झाली नाही ?’ आता मला गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता वाटते. एवढ्या लहान वयात एवढे धैर्य तिच्यामध्ये कसे आले ? गुरुदेवांनी तिला धीट केले आणि साधनेचे कवच दिले. ‘ती गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली आहे’, हे मला अनुभवायला मिळाले. त्या वेळी मी गुरूंच्या चरणी क्षमायाचना केली.

१ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी बोलल्यावर मनातील विचार न्यून होऊन ऊर्जा मिळणे : प्रदीप रुग्णालयात असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ प्रियांकाला भ्रणभाष करत असत. तेव्हा ‘त्या तिला चैतन्य देत आहेत’, असे मला अनुभवायला मिळाले. त्या वेळी प्रियांकाने स्वतःचा न विचार करता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आमच्याशीही बोलण्यास सांगितले. त्यांच्याशी बोलल्याने आमच्या मनातील विचार न्यून झाले. देवाने आम्हालाही ऊर्जा दिली. ‘सनातनच्या कुटुंबात कठीण प्रसंगातही गुरुदेव आपल्याला सांभाळून घेतात’, याबद्दल माझ्याकडून गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. जावयांच्या निधनानंतर

२ अ. अखंड नामजप करणे आणि कुणीही काही सांगितले, तरी ते स्वीकारणे : प्रदीप यांच्या निधनानंतर आम्ही काही दिवस त्यांच्या घरी राहिलो होतो. तेथे पुष्कळ माणसे येत होती. प्रियांका अखंड नामजप करत होती. ‘ती गुरुदेवांच्या अनुसंधानात आहे’, असे तिच्या चेहर्‍यावरून वाटत होते. तिच्या दिरांनी तिला डोळे बंद करून न बसता डोळे उघडे ठेवून बसण्यास सांगितले. तिने लगेच ते स्वीकारले. कुणीही काही सांगितले, तरी ती त्यांचे ऐकत होती.

२ आ. मुलीच्या सासू-सासर्‍यांनी तिचे पुष्कळ कौतुक करणे : प्रियांकाच्या चुलत सासू-सासर्‍यांनी तिचे पुष्कळ कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘तुमची मुलगी फार चांगली आहे. तिच्यावर चांगले संस्कार आहेत. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची मने सांभाळते, सगळ्यांचा आदर करते आणि नम्रतेने बोलते.’’ हे ऐकल्यावर मला पुन्हा एकदा गुरुदेवांची आठवण झाली. गुरुदेवांनी तिच्यावर लहानपणापासून फार चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे ती कुठल्याही परिस्थितीत सांभाळून घेते.

२ इ. माझे भाऊ (प्रियांकाचे मामा) कोल्हापूरला प्रियांकाला भेटायला आले होते. त्यांचा साधनेला नेहमीच विरोध असायचा. ते मला म्हणाले, ‘‘तुझी मुलगी धिराची आहे. तिच्याकडे साधनेचे बळ आहे.’’

२ ई. प्रदीप यांच्या निधनानंतर कसलीही भीती न वाटणे आणि घरामध्ये शांत वाटणे : आम्ही प्रदीपच्या घरी १२ दिवस होतो; पण आम्हाला कसलीही भीती वाटली नाही. घरात दत्ताचा नामजप लावला होता. दहाव्या आणि बाराव्या दिवशी काही त्रास जाणवला नाही. प्रदीप तरुण असल्यामुळे तरुण व्यक्ती गेल्यानंतर त्या घरामध्ये भीतीचे वातावरण असते; पण त्यांच्या घरामध्ये पुष्कळ शांत वाटत होते.

२ उ. प्रदीप कुणाच्याही स्वप्नात आले नाहीत. ‘गुरुदेवांनी त्यांनाही पुढची गती दिली असावी’, असा विचार माझ्या मनात आला.’

– सौ. ज्योत्स्ना जयवंत जगताप (श्रीमती प्रियांका वाडकर यांची आई), फोंडा, गोवा. (४.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक