राष्ट्रहितार्थ
देहलीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मयंक जैन यांची ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी ‘बांगलादेशातून होणारी घुसखोरी, विविध राष्ट्रीय समस्या आणि हिंदूंची दुःस्थिती’, अशा विविध विषयांवर मुलाखत घेतली. त्यावर आधारित लेख वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

१. सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून बांगलादेशी घुसखोरीकडे दुर्लक्ष
आम्ही ‘द बांगला क्रिसेंट : आय.एस्.आय., मदरसा, इन्फिलट्रेशन’ हा चित्रपट वर्ष २००४ मध्ये बनवण्यास घेतला होता आणि वर्ष २००५ मध्ये तो प्रदर्शित झाला. त्यापूर्वी त्रिपुराचे पोलीस महासंचालक बलजित राय यांचे ‘डेमोग्राफिक ॲग्रेशन अगेन्स्ट इंडिया’ हे पुस्तक पू. सीताराम गोयल यांनी मला दिले आणि त्यांनी मला ‘बांगलादेशी घुसखोरीवर काम झाले पाहिजे’, असे सांगितले होते. तेव्हापासून माझ्या मनात हा विषय घोळत होता. तो काँग्रेस राजवटीचा काळ होता. देहलीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर रहात होते. वर्ष २०१३ मध्ये ‘देहलीत १३ लाख बांगलादेशी रहात आहेत’, असे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट केले होते. याविषयीचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झाले होते. ते बांगलादेशी असल्याचे उघडपणे सांगत होते. त्यांना कशाचीही भीती नव्हती. काँग्रेसचे सरकार असल्यामुळे या घुसखोरांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाले. भाजप सत्तेत आल्यापासून देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत लक्षणीय वाढ झाली. त्यांची तुलना काँग्रेस पक्षाशी करता येणार नाहीच; पण आताच्या प्रशासनानेही बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी विशेष काही केल्याचेही दिसले नाही. ५ वर्षांपूर्वी नोएडाच्या एका सोसायटीमध्ये एक बांगलादेशी मोलकरीण चोरी करतांना सापडली. लोकांनी तिला एका खोलीत बंद केले आणि पोलिसांना बोलावले. त्यानंतर थोड्याच वेळात त्या सोसायटीवर किमान ५०० बांगलादेशी लोकांनी आक्रमण केले. यावरून त्यांचे लक्षणीय प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
मयंक जैन यांचा परिचय

श्री. मयंक जैन एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते असून हिंदुत्वयोद्धा आहेत. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, प्राणी संरक्षण, मानवी विकास, आरोग्य आदी अनेक विषयांवर व्यापक काम केले आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना जैन यांनी ‘इंडिया टुमॉरो : द गुजरात मिरेकल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांनी भारताला उद्ध्वस्त करू पहाणार्या बांगलादेशी घुसखोरीच्या संदर्भात ‘द बांगला क्रिसेंट’ नावाचा महत्त्वाचा चित्रपट बनवला होता. आता त्याचाच पुढचा भाग (सिक्वेल) म्हणून ‘क्रिमसन क्रिसेंट : द लास्ट क्वॉर्टर’ नावाचा चित्रपट त्यांनी काही महिन्यांपूर्वीच बनवला. या माध्यमातून त्यांनी इस्लामी विचारसरणीच्या व्यापक विषयावर प्रकाश टाकला आहे.
२. हिंदूंनो, शौर्याला पर्याय नाही, हे जाणा !
या घुसखोरांना भारतातील मदरशांमध्ये प्रशिक्षण मिळते. त्यांची लोकसंख्या वाढत असून ते आपल्या लोकांकडून नोकर्या हिसकावून घेत आहेत. बांगलादेशात असतांना ते तेथील हिंदूंवर आक्रमण करतात आणि भारतात आल्यानंतर येथील हिंदु बहुसंख्यांकांवर आक्रमण करतात. हिंदू तेथेही (बांगलादेशात) आणि भारतातही मार खात आहेत. हिंदूंची अशी स्थिती असेल, तर देवही त्यांना वाचवू शकत नाही. त्यामुळे शौर्याला पर्याय नाही. जर तुमच्याकडे आधीच शौर्य नसेल, तर भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुणीही तुमच्यात शौर्य निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आत्महत्येच्या मार्गावर असलेला समाज शौर्यविरहित समाज आहे. त्याच्यावर आक्रमण होणार नाही, असा तो विचार करत असेल, तर ते चूक आहे. काही लोक धूम्रपान करतात. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची आकडेवारी दाखवली, तरी त्यांना वाटते की, ‘‘मला हा कर्करोग होणे शक्य नाही’’; म्हणून ते धूम्रपान करत रहातात आणि एक दिवस मृत्यूमुखी पडतात. हिंदु समाजाचीही अशीच मानसिकता आहे; कारण ते स्वतःच्या जिवाला धोका असल्याखेरीज सक्रीय होत नाहीत. त्यामुळे हिंदूंनी जागृत होणे अत्यंत आवश्यक आहे.
हिंदूंना जागृत करण्यात ‘सनातन प्रभात’ची मोठी भूमिका !

‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह चांगले कार्य करत आहे. त्यांनी जे कार्य केले त्याविषयी मी अतिशय आभारी आहे. ‘सनातन प्रभात’ने माझ्या चित्रपटावर विविध भाषांमध्ये लेख लिहिले आणि तुम्ही त्याची ‘लिंक’ घरोघरी पोचवली. ‘सनातन प्रभात’ने ‘यू ट्यूब’द्वारे माझी मुलाखत प्रसारित केली. त्यामुळे या कामासाठी हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा नेहमीच ऋणी राहील. हिंदूंना जागृत करण्यात ‘सनातन प्रभात’ची मोठी भूमिका आहे. सर्वत्र अंधार आहे, असे नाही; कुठेतरी प्रकाश आहे आणि आपल्याला त्या प्रकाशाचा स्रोत शोधून त्याच्यासमवेत काम करावे लागेल. हिंदु समाजासाठी खरोखर काम करणार्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ते शक्य तितक्या समुदायांमध्ये पसरवणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे.’
– श्री. मयंक जैन
३. हिंदूंमध्ये शत्रूबोधाचा अभाव
अशा गंभीर परिस्थितीतही ‘मी वाचेन’, असे प्रत्येकाला वाटते. अशा लोकांना बेशुद्धावस्थेतून (‘कोमा’तून) बाहेर काढावे लागेल. इतका मोठा धोका समजून घेण्यासाठी कोणतेही गणितीय समीकरण आवश्यक नाही. हिंदूंवरील आघातांचे आकडे प्रतिदिन येतात. गोध्रा हत्याकांडात अयोध्येहून आलेल्या रामभक्तांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतरही काहींना वाटत असेल की, ‘आम्ही त्या रेल्वेगाडीत नव्हतो; म्हणून वाचलो आणि भविष्यातही वाचू’, तर हा त्यांचा अपसमज आहे. अशा समाजाचे रक्षण करणे अशक्य आहे. शहामृगाला ठाऊक असते की, आक्रमण होणार आहे; म्हणून तो वाळूमध्ये त्याचे तोंड लपवतो. देशाच्या शत्रूकडून आततायीपणा होत आहे, तरी हिंदू उभा राहू इच्छित नाही. ‘शेजार्यावर आक्रमण होईल; पण मी वाचेन’, असे हिंदूला वाटते. ही बेशुद्ध अवस्था आहे. ती बरी करणे कठीण आहे. या हिंसक विचारसरणी स्वतःहून नष्ट झाल्या, तरच हिंदु समाज वाचेल.
देशभरात वाढत असलेला कट्टरतावाद मी २० वर्षांपूर्वी ‘द बांगला क्रिसेंट’ चित्रपटामधून प्रत्यक्षात घडलेल्या घटनांद्वारे दाखवला होता. त्यानंतर कोणतीही सुधारणा झालेली नाही, हे स्पष्ट झाले. सरकारने आकडेवारीही अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे देशात किती बांगलादेशी घुसखोर आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. ‘टास्क फोर्स’ (कृतीदल) आणि सीमा व्यवस्थापन यांनी न्यायालयाला जे सांगितले, त्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या अहवालामध्ये घुसखोरांची संख्या २ कोटी म्हटले आहे. बांगलादेशी घुसखोर ५० वर्षांपासून घुसखोरी करत आहेत आणि सध्या त्यांच्याविषयी आपल्याकडे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही.
आता त्यांच्या मुलांच्या मुलांना मुले आहेत, तर ही घातकी वाढ आहे. असे असूनही हिंदू विश्रांती घेत आहेत. अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांना भेटी देण्यात आणि त्यांची छायाचित्रे प्रसारित करण्यात व्यस्त आहेत. सर्वच हिंदू तसे नसतील; पण माझ्या परिचयाचे हिंदू असेच वागतात. अतिशय उच्च दर्जाचा भौतिकवाद आणि लोभ हेच त्यांचे प्राधान्य आहे. सध्या आणीबाणीची परिस्थिती आहे आणि प्रत्येकाचा प्रतिसाद हा या देशाचे आणि समाजाचे रक्षण करण्याचा असला पाहिजे अन् त्यांनी या देशाचे रक्षण करण्याखेरीज दुसरे काहीही करू नये.
धर्मांध त्यांच्या ‘ईश्वरा’विषयी समर्पित आहेत. त्याविषयी त्यांच्यात कोणताही गोंधळ नाही. त्यांच्यात कोणता बौद्धिक दोष नाही. त्यांचा प्रत्येक माणूस लढायला सिद्ध आहे. हिंदूंनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. स्वसंरक्षणासाठी किंवा देश वाचवण्यासाठी आतंकवादाला नष्ट करण्याची अनुमती जगाने दिली आहे. – श्री. मयंक जैन
४. हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांची आक्रमणे
इस्लामी विचारसरणीमध्ये ‘तौहिद’ (अल्ला एकच आहे, असा विश्वास) ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. त्याचा उल्लेख कुराणमध्ये आहे. ते केवळ अल्लावर विश्वास ठेवतात आणि त्याखेरीज इतर कुणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यांच्या मतानुसार कुणी दुसर्या देवावर विश्वास ठेवत असेल, तर त्याला धडा शिकवणे अनिवार्य आहे. तेथेच ‘आयकॉनोक्लाझम्’ (मूर्तीभंजनाचा) विचार जन्माला येतो. उदाहरणार्थ वर्ष २०२४ मध्ये धर्मांधांनी गणेशोत्सवाच्या काळात एकाच दिवशी अनेक ठिकाणी आक्रमणे केली. श्रीराममंदिर आंदोलनाचा अंतिम टप्पा आला, तेव्हाही अंजार (गुजरात), इंदूर (मध्यप्रदेश) आणि देहली येथील मिरवणुकांवर प्राणघातक आक्रमणे झाली होती. हिंदु संघटनांच्या मिरवणुकांवर नेहमी आक्रमणे होतात.
५. हिंदूंनी वास्तववादी बनावे !
आता पाश्चात्त्य विद्वान किंवा तथाकथित धर्मनिरपेक्ष बुद्धीजीवी म्हणतात की, ते त्यांच्या धर्मग्रंथाची भूमिका बजावत आहेत. मुसलमानांना त्यांच्या धर्मग्रंथाविषयी काही शंका नाही; पण हिंदू, तसेच अमेरिका आणि युरोप येथील ‘वोक’ (साम्यवादी) लोक त्यांचे स्वप्नवत् विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. ते हिंदूंना वास्तवापासून लांब नेतात. मग तुम्हाला काहीही करावे लागणार नाही. येथेच लढाई संपली. त्यामुळे आता झोपी जा आणि पुढची गणेशचतुर्थी येईल, तेव्हा आणखी एका आक्रमणाला सिद्ध रहा. कोणत्याही शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला त्रास होतो; पण ती करावीच लागते. तुमच्या आधुनिक वैद्यांनी तुम्हाला कर्करोग झाल्याचे सांगितले, तर शरिराचा तो भाग काढणे किंवा ‘केमोथेरपी’ (कर्करोगावरील एक उपचार) करणे, हा उपाय आहे; पण हिंदूंना अशा जगात रहायचे आहे, जेथे त्यांना काही झालेच नाही, असे वाटावे. काहीही झाले नाही, असा समज करून घेतला, तर अमली पदार्थ घेतलेल्या माणसाप्रमाणे वास्तवापासून हिंदू लांब जात रहातील.
६. इस्लामी जगतात पालटाचे वारे
इस्लामी जगात एक बुद्धीवादी क्रांती वेगाने होत आहे, जी आम्ही आमच्या ‘द क्रिमसन क्रिसेंट’ चित्रपटात दाखवली आहे. साऊदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स एम्.बी.एस्. (महंमद बिन सलमान) यांनी ‘हदीस डॉक्युमेंटेशन सेंटर’ची स्थापना केली आणि त्यात ते म्हणाले, ‘इस्लामी धर्मग्रंथात जेथे जेथे अतिरेकीपणा असेल, तेथे तेथे मी तो काढीन.’ त्यानंतर ‘एम्.बी.एस्.’ने ९९ टक्के हदीस काढले. त्यामुळे साऊदी अरेबियात ५ सहस्र मशिदी बंद करण्यात आल्या. सर्वेक्षणातील आकडेवारीवरून असे दिसून येते की, ५० टक्क्यांहून अधिक इराणी म्हणतात, ‘ते कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाहीत.’ माझ्या चित्रपटात एक पूर्वीचा मुसलमान आरिफ आहे. तो सांगतो, ‘इराणमधील एक पूर्वीची मुसलमान (एक्स मुस्लिम) मरियम नमाझी म्हणाली की, मुद्रणालयामुळे ख्रिस्ती धर्मात एक बुद्धीवादी क्रांती आली. तशीच क्रांती आज इस्लामच्या संदर्भात इंटरनेट करत आहे.’
|
हे ही वाचा → ♦ ‘द बंगाल फाइल्स’पासून ‘क्रिमसन क्रिसेंट’पर्यंत : कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्या प्रक्रियेचे चित्रण ! |
इस्लामी विचारसरणीत ‘सेल्फ क्लेंझिंग’ (स्वतःच स्वतःतील उणिवा दूर करण्याची प्रक्रिया) होत आहे. हे पहिल्यांदाच घडत नाही आहे. इतिहासाने हे ख्रिस्ती पंथात पाहिले. गॅलिलिओ म्हणाला, ‘पृथ्वी केंद्रस्थानी नाही, तर सूर्य केंद्रस्थानी आहे.’ याविषयी वादविवाद झाला. चर्चने ‘पृथ्वी केंद्रस्थानी आहे’, असे सांगितले होते. गॅलिलिओची ही गोष्ट चर्चने लपवली. मुद्रणालये आली, तेव्हा सर्वांनी शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचले. त्यामुळे चर्चला प्रतिसाद देणे कठीण झाले. अलेक्झांडर सोल्झेनित्सिनने सोव्हिएत युनियनमध्ये होणार्या अत्याचारांविषयी एक पुस्तक लिहिले. सोव्हिएत युनियनने कामगारांचे काय केले, ते सर्व अत्याचार त्या पुस्तकातून बाहेर आले. यामुळेच अतिशय आदर्श कामगार क्रांती होऊन सोव्हिएत युनियन कोसळले.
थोडक्यात, हे पालट आतूनच घडत असतात आणि ते ‘पालटाचे वारे’ इस्लामी जगात वहातांना दिसू लागले आहे. तेथील बुद्धीवादी (रॅशनलिस्ट) बाहेर येत आहेत. भारतातही हे घडत आहे. ही जी शक्ती आहे, तिला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही; कारण प्रत्येक व्यक्तीच्या आत तार्किक आणि अतार्किक गोष्टीतील भेद जन्मतःच असतो. त्यामुळे तार्किक आणि बुद्धीवादी यांचा विजय होतो. याचा अर्थ असा नाही की, हिंदूंनी उशा घेऊन झोपी जावे. त्यांनी जागृत होऊन संघटित होणे काळाची आवश्यकताच आहे.
– श्री. मयंक जैन, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, देहली.
श्रीरामजन्मभूमी आंदोलन ही हिंदु समाजाची शेवटची चळवळ !

सध्या देशात अशी कोणतीही संघटना शिल्लक नाही, ज्यांच्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज शिल्लक आहे अन् ते काहीतरी करू इच्छितात. याला एखादी संघटना अपवाद ठरू शकते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना पुष्कळ तप:श्चर्या करणे आवश्यक आहे. आता श्रीरामजन्मभूमीची चळवळ चालू करणारे विहिंपच्या अशोक सिंघल यांच्यासारखे कोण आहेत ? त्यांनी लोकांना एकत्र केले आणि एक राष्ट्रीय चळवळ उभी झाली. कुणीही त्याला विरोध करण्याचे धाडस केले नाही. जेव्हा सर्व जण एकत्र उभे राहिले, तेव्हा प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात रामशिला पूजन करण्यात आले अन् त्या शिला अयोध्येत नेण्यात आल्या. असे सिंघल कुठून आणणार ? आता असे सिंघल परत जन्माला येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांचा आदर्श समोर ठेवून मार्ग अनुसरला पाहिजे.

श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू होण्याच्या काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘गंगाजल मोहीम’ केली आणि घराघरांत गंगाजल पोचवले. लोकांना जोडण्यासाठी अतिशय कष्ट करावे लागतात. त्यासाठी सत्तेची इच्छा न ठेवता निःस्वार्थपणे काम करावे लागेल. गंगाजल चळवळीच्या माध्यमातून ते घरोघरी गेले आणि लोकांना जोडले. त्यातून चळवळीचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण झाले. त्यानंतर हिंदु समाजात कोणतीही चळवळ झाली नाही. रामजन्मभूमी ही हिंदु समाजाची शेवटची चळवळ होती.
कोणत्याही चळवळीसाठी काही ‘लिटमस टेस्ट’ (एक चाचणी) आहेत. सर्वप्रथम त्यात भक्ती असणे आवश्यक आहे. चळवळीची संपूर्ण माहिती हवी. लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. त्यासाठी आपल्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करावे लागेल. मग या चळवळीला आर्थिक साहाय्य करणारा वर्ग हवा. रामजन्मभूमी चळवळीत या सर्व गोष्टी एकत्र आल्या होत्या. त्या वेळी ती एक अतिशय शुद्ध चळवळ बनली होती. त्यांच्यात असलेली ती भावना, तो आत्मा आणि ऊर्जा आता कोणत्याही चळवळीत दिसत नाही. तो आत्मा पुन्हा निर्माण करावा लागेल. महाभारत हा केवळ लक्षात ठेवण्याचा नाही, तर आत्मसात् करण्याचा विषय आहे. आपल्याला ब्राह्मतेजापासून शौर्य निर्माण करावे लागेल.
– श्री. मयंक जैन
भारतात ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर !

आतापर्यंत बांगलादेशी घुसखोरांची समस्या सोडवली नाही आणि आता रोहिंग्यांची समस्या येऊन ठेपली आहे. त्यांची अनधिकृत संख्या १० लाख होती. आता रोहिंग्यांनी तमिळनाडू गाठले आहे. भारत एवढा शक्तीशाली देश आहे. आपल्याकडे पोलीसदल आणि सैन्यदल आहे. बहुसंख्य हिंदु लोकसंख्या आहे, तसेच अनेक राष्ट्र्रवादी संघटना आहेत. हे सर्व असूनही आपण जणू बेशुद्ध (‘कोमा’त) असल्यासारखे वागत आहोत. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असतांना आपण वरवर रंगभूषा (मेकअप) करत बसलो आहोत.
| Hindus in COMA Racing Towards Extinction? | Podcast Ft. Filmmaker Mayank Jain | Sanatan Prabhat |
जनता प्राधान्यक्रमांची पूर्तता न करता मजेत आहे. बाजारपेठेत लोक ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्याच्या मागे लागले आहेत. ज्या दिवशी देशात गृहयुद्ध चालू होईल, तेव्हा आपल्याला या गोष्टी दिसणार नाहीत. ‘विदेशातून जे घुसखोर आले आहेत, त्यांनी त्यांच्या देशात हिंदूंना आधीच संपवले आहे’, हा ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’चा अहवाल आहे. त्याची आपल्याला पर्वा नाही. त्यांना विरोध केला, तर पुरोगामी त्यांच्या पाठीशी उभे रहातात. वर्ष २००५ मध्ये सीबीआयचे तत्कालीन संचालक जोगिंदर सिंह म्हणाले होते, ‘भारत ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना सहन करत आहे.’ ते सीबीआय प्रमुख होते; म्हणून हे अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे.
– श्री. मयंक जैन
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !