‘पॅसिव्ह युथनेशिया’ (निष्क्रीय इच्छामृत्यू) आणि अध्यात्मशास्त्र

सनातन भारत : समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भात प्रासंगिक सूत्रांवर भाष्य करणारे सदर

११ मार्च २०२६ या दिवशी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीला ‘पॅसिव्ह युथनेशिया’ (निष्क्रीय इच्छामृत्यू), म्हणजेच कृत्रिमरित्या चालू असलेले अन्न आणि उपचार थांबवण्याची अधिकृत अनुमती दिली. १३ वर्षांपासून ‘कोमा’मध्ये असलेल्या हरीश राणा या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे हे प्रकरण होते. त्याचे शरीर १०० टक्के निकामी झाले होते आणि तो केवळ नळीद्वारे दिलेल्या अन्नावर जिवंत होता. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टरांच्या देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने हरीशची अन्न आणि औषधे बंद केली जातील. मृत्यू नैसर्गिकरित्या ओढवेपर्यंत हरीशला कोणत्याही वेदना होणार नाहीत, अशी काळजी घेतली जाणार आहे.

‘अध्यात्मशास्त्रानुसार असा निष्क्रीय इच्छामृत्यू योग्य कि अयोग्य आहे ?’, अशी विचारणा काही जिज्ञासूंनी केली होती. त्या संदर्भात अध्यात्मचर्चा करणारा हा लेख येथे देत आहे.

श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

१. आधुनिक इच्छामृत्यूचे प्रकार

महाभारतात पितामह भीष्म यांना इच्छामरणाचे वरदान होते, ही कथा सर्वश्रुत आहे. महात्मा भीष्म यांची इच्छा होईल, तेव्हा त्यांना मृत्यू प्राप्त होणार होता. एवढी आध्यात्मिक क्षमता आज कुठल्याही व्यक्तीची नाही. आधुनिक काळातील इच्छामृत्यू हा पूर्णतः वेगळा आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या परिभाषेनुसार मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णाच्या इच्छामृत्यूच्या संदर्भात २ प्रकार पुढे दिले आहेत.

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

१ अ. सक्रीय इच्छामृत्यू (Active Euthanasia) : यामध्ये डॉक्टर किंवा अन्य व्यक्ती जाणीवपूर्वक रुग्णाचा मृत्यू घडवून आणण्यासाठी थेट कृती करतात. उदाहरणार्थ रुग्णाला प्राणघातक इंजेक्शन देणे. भारतात हा प्रकार अवैध आहे.

१ आ. निष्क्रीय इच्छामृत्यू (Passive Euthanasia) : यामध्ये रुग्णाला जिवंत ठेवणारी कृत्रिम साधने (जसे की, ‘व्हेंटिलेटर’ (कृत्रिम श्वासोच्छ्वास), ‘फीडिंग ट्यूब’ (अन्न नळी) किंवा औषधे) काढून घेतली किंवा बंद केली जातात, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू नैसर्गिकरित्या होतो. सर्वाेच्च न्यायालयाने हरीश राणा प्रकरणात भारतात काही अटींनुसार या प्रकारच्या इच्छामृत्यूला अनुमती दिली आहे.

थोडक्यात निष्क्रीय इच्छामृत्यूमध्ये निसर्गाच्या ओघात ढवळाढवळ न करता देह त्यागण्याची प्रक्रिया स्वीकारली जाते. याउलट सक्रीय इच्छामृत्यू हे हिंसेच्या कक्षेत येते.

२. ‘आत्महत्या’ म्हणजे इच्छामृत्यू नव्हे !

अध्यात्मशास्त्रानुसार आत्महत्या हा केवळ सामाजिक गुन्हा नाही, तर तो एक ‘आध्यात्मिक अपराध’ मानला जातो. याची कारणे पुढे दिली आहेत. 

२ अ. निसर्ग नियमाचे उल्लंघन : निसर्गाने दिलेले आयुष्य बळजोरीने संपवणे, म्हणजे ईश्वरी योजनेत अडथळा आणणे होय.

२ आ. अतृप्त इच्छा : आत्महत्या करणारी व्यक्ती मृत्यूसमयी अत्यंत दुःखी असते. गरुडपुराणानुसार एखाद्या व्यक्तीने विहित (निर्धारित) आयुष्य पूर्ण न करता (आत्महत्येने) प्राण त्यागले, तर त्याला ‘प्रेतयोनी’ प्राप्त होते; कारण त्या जीवाचे पृथ्वीवरील ‘भोग’ अद्याप शेष असतात.

धर्मशास्त्रानुसार ‘आत्महत्या’ ही निषेधार्ह आहे; कारण ती मोह, नैराश्य किंवा क्रोध यांतून केली जाते. ‘श्रीमद्भगवद्गीते’च्या ८ व्या अध्यायातील श्लोक ५ आणि ६ नुसार मृत्यूसमयी माणसाचे चित्त ज्या विचारात असते, तशीच गती त्याला प्राप्त होते. जर एखादी व्यक्ती इच्छामृत्यू (आत्महत्या) वेदनेच्या भीतीपोटी किंवा नैराश्यातून घेत असेल, तर तिचा पुढचा प्रवास त्याच नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतो. याउलट जर ईश्वराचे स्मरण करत देह त्यागला, तर त्याला ‘सद्गती’ प्राप्त होते.

कर्मसिद्धांत, प्रारब्ध आणि मृत्यू


अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचा जन्म हा विशिष्ट ‘प्रारब्ध’ (नशिबाचा तो भाग जो या जन्मात भोगायचा आहे) भोगण्यासाठी होतो. ‘जोपर्यंत व्यक्तीच्या वाट्याला आलेले सुख-दुःख भोगून संपत नाही, तोपर्यंत मृत्यू नैसर्गिकरित्या येत नाही. शरिराला होणार्‍या वेदना या पूर्वकर्माचे फळ मानल्या जातात. जर एखाद्याने वेदनांना कंटाळून स्वतःहून प्राण त्यागले (आत्महत्या किंवा इच्छामृत्यू), तर ते कर्म अपूर्ण रहाते. यामुळे पुढील जन्मात त्या वेदना अधिक तीव्रतेने भोगाव्या लागू शकतात’, असे शास्त्र सांगते.

– श्री. चेतन राजहंस

३. धर्मशास्त्रानुसार इच्छामृत्यूचे प्रकार

धर्मशास्त्रांनी इच्छामृत्यूच्या संदर्भात काही विशिष्ट आध्यात्मिक प्रक्रियांना संमती दिली आहे.

३ अ. प्रायोपवेशन : जेव्हा शरीर आता कोणत्याही धर्मसाधनेच्या कार्यासाठी उरलेले नसते आणि ‘मृत्यू जवळ आला आहे’, याची जाणीव होते, तेव्हा अन्न-पाण्याचा त्याग करून ईश्वराचे चिंतन करत देह त्यागणे, म्हणजे प्रायोपवेशन. धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाणीव होते की, तिचे या जन्मातील कर्तव्य पूर्ण झाले आहे आणि शरीर आता केवळ एक ‘ओझे’ बनले आहे, तेव्हा ती व्यक्ती आध्यात्मिक प्रेरणेने किंवा गुरूंच्या संमतीने प्रायोपवेशनाचा निर्णय घेते. थोडक्यात प्रायोपवेशन करणारी व्यक्ती आध्यात्मिक असते. प्रायोपवेशन करतांना शरिराचा द्वेष नसतो, तर त्याची ‘आसक्ती’ संपलेली असते.

३ आ. समाधी : उच्च कोटीचे संत जेव्हा त्यांचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होते, तेव्हा योगबळाने श्वास रोखून देह त्यागतात, म्हणजेच समाधी घेतात.

३ इ. जैन पंथातील ‘संलेखना’ (संथारा) : हीसुद्धा एक अत्यंत पवित्र पद्धत मानली जाते, जिथे साधक पूर्णपणे शुद्ध भावनेने शरिराचा मोह सोडतो.

४. आधुनिक इच्छामृत्यू (Euthanasia)  आणि सनातन दृष्टीकोन

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ अर्थात् सनातन धर्मात शरिराला ‘धर्मसाधन’ मानले आहे. जोपर्यंत शरीर ईश्वरी कार्य, साधना किंवा सेवा करण्यासाठी सक्षम आहे, तोपर्यंत त्याचे जतन करणे, हे कर्तव्य आहे; परंतु जेव्हा शरीर पूर्णपणे निकामी होते, तेव्हा ते ‘साधन’ न रहाता आत्म्यासाठी एक ‘कारागृह’ बनते. हरीश राणाची १३ वर्षे कोमात असणे, ही स्थिती ‘प्राण’ आणि ‘देह’ यांच्यातील एक कृत्रिम कोंडी होती, जी निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे.

‘भगवद्गीते’त मृत्यूला नैसर्गिक पालटाच्या रूपात पाहिले आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।। – भगवद्गीता, अध्याय २, श्लोक २२

अर्थ : ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे त्यागून नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर त्यागून दुसर्‍या नव्या शरिरात जातो.

अध्यात्मशास्त्रानुसार जेव्हा शरीर ‘जीर्ण’ होते (त्याद्वारे कोणतेही कर्म किंवा साधना शक्य नसते), तेव्हाच मृत्यूची प्रक्रिया नैसर्गिक ठरते. विज्ञानानुसार हृदय धडधडणे म्हणजे जीवन; पण अध्यात्मशास्त्रानुसार चेतनेचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. जेव्हा रुग्ण कोमामध्ये असतो आणि केवळ यंत्रांच्या आधारे जिवंत असतो, तेव्हा धर्मशास्त्रानुसार ‘प्राण’ अडकून पडल्यासारखी स्थिती होते. आधुनिक वैद्यकीय उपकरणे (Ventilators) कधीकधी निसर्गाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करतात, ज्यामुळे ज्या जिवाचा प्रवास संपायला हवा, तो कृत्रिमरीत्या लांबवला जातो. अशा वेळी कृत्रिम आधार काढणे, ही ‘हिंसा’ नसून देहप्रारब्धानुसार ‘मुक्ती’ देण्याचे कार्य आहे.

सर्वाेच्च न्यायालयाचा निष्क्रीय इच्छामृत्यूचा (Passive Euthanasia चा) निर्णय आधुनिक परिभाषेत असला, तरी त्याचा गाभा आध्यात्मिकदृष्ट्या योग्य आहे.

भारतात ‘संथारा’ (संलेखना), समाधी किंवा प्रायोपवेशन यांविषयी अनेकदा न्यायालयीन चर्चा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणांत असे स्पष्ट केले आहे की, जर ही कृती धार्मिक श्रद्धेचा भाग असेल आणि ती सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा (Right to life with dignity) भाग असेल, तर ती आत्महत्येपेक्षा वेगळी आहे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (१७.३.२०२६)