साधकांवर आणि झाडांवरही प्रीतीचा वर्षाव करणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ६३ वर्षे) !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा १९ मार्च २०२६ या दिवशी ६३ वा वाढदिवस झाला. यानिमित्त कुडाळ सेवाकेंद्रातील साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम

१. झाडांची पितृवत् काळजी घेणे

१ अ. साधिकेने २ झाडांना पाणी घातले नसल्याचे सद्गुरु सत्यवानदादांनी तिच्या लक्षात आणून देणे आणि पाणी घातल्यावर झाडांना तहान लागली असल्याचे जाणवणे : ‘एकदा मी झाडांना पाणी घालत होते; परंतु माझ्याकडून २ झाडांना पाणी घालायचे राहून गेले. सद्गुरु सत्यवानदादांनी ‘त्या झाडांना पाणी घालायचे आहे’, हे माझ्या लक्षात आणून दिले. मी त्या झाडांना पाणी घातल्यावर मला जाणवले, ‘जणू झाडांना पुष्कळ तहान लागली होती. त्यांना पाणी हवेच होते. त्यांना पाणी घातल्याने त्यांच्या मनात सद्गुरु दादांविषयी पुष्कळ कृतज्ञता दाटून येत आहे.’

१ आ. झाडांशेजारी पांढर्‍या प्रकाशाच्या माध्यमातून सद्गुरु दादांचे अस्तित्व जाणवणे आणि झाडांचा सद्गुरु दादांविषयी कृतज्ञताभाव वाढल्याचे जाणवणे : नंतर दोन दिवसांनी मी झाडांना पाणी घालत असतांना मला त्या झाडांशेजारी पांढरा प्रकाश जाणवत असल्याने माझे लक्ष तेथे वेधले गेले. तेथे मला सूक्ष्मातून सद्गुरु दादांचे अस्तित्व जाणवत होते. ‘त्या झाडांचा सद्गुरु दादांविषयी कृतज्ञताभाव वाढल्याने तेथे सद्गुरु दादांचे अस्तित्व जाणवत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘सद्गुरु दादा स्थुलातून, तसेच सूक्ष्मातूनही सर्वांची पितृवत् काळजी घेत असतात’, हे मला शिकायला मिळाले.

सौ. मनीषा वाघमारे

२. सद्गुरु दादांनी झाडांना पाणी घातल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. काही दिवस सद्गुरु दादांनी स्वतः झाडांना पाणी घातले. त्यानंतर मी झाडांना पाणी घालत असतांना मला त्या झाडांतून ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महाशून्य’, हे नामजप सूक्ष्मातून ऐकू आले.

आ. यावरून ‘सद्गुरु दादा झाडांना ऊर्जा देऊन साधनेची पुढची गती देत आहेत’, असे मला जाणवले.’

– सौ. मनीषा वाघमारे, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग.

३. सद्गुरु दादांनी सांगितल्याप्रमाणे झाडांना पाणी घालण्याची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

अ. ‘मी सेवाकेंद्रातील झाडांना पाणी घालण्याची सेवा करते. मी जेव्हा झाडांना पाणी घालायचे विसरायचे, तेव्हाच सद्गुरु दादा मला त्याविषयी आठवण करून देत. यावरून ‘झाडे सद्गुरु दादांना त्यांच्या अडचणी सूक्ष्मातून सांगत असावीत’, असे मला जाणवले.

आ. त्यानंतर मी आज्ञापालन म्हणून झाडांना पाणी घालण्याची सेवा नियमित चालू केली. तेव्हा झाडांना पाणी घालतांना मला थकवा जाणवत नव्हता. मला पुष्कळ आनंद मिळत होता.

इ. आता सध्या बागेमधील अननसाच्या झाडाला ४ – ५ वर्षांनी ९ अननस लागले आहेत, तसेच मोगराही फुलला आहे.’

– सौ. जयंती परब, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग.

४. सद्गुरु दादांची अनुभवलेली वात्सल्यमय प्रीती !

४ अ. त्रासामुळे सेवाकेंद्राच्या बाहेर जाणार्‍या साधिकेला सद्गुरु दादांनी सूक्ष्मातून अडवल्याचे जाणवणे : ‘सेवाकेंद्रातील एका साधिकेला पुष्कळ आध्यात्मिक त्रास व्हायचा. सद्गुरु दादा सेवाकेंद्रात असतांना तिचा त्रास उणावत असे; पण सद्गुरु दादा सेवाकेंद्रात नसतांना तिला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असे. एकदा तिला पुष्कळ त्रास होऊ लागला आणि त्रासामुळे तिच्या मनात ‘सेवाकेंद्राच्या बाहेर जावे’, असा विचार येऊन ती बाहेर जाऊ लागली. ‘तिला कसे थांबवायचे ?’, ते लक्षात येत नव्हते. त्या वेळी ती बाहेर जात असतांना मला माझ्या हाताची लांबी जास्त वाटली. मी अवाक् होऊन माझ्या हाताकडे पहात होते. ‘माझ्या हाताच्या पुढे घड्याळ घातलेला एक हात त्या साधिकेला धरून ओढत आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवले. मला ‘हा हात कुणाचा आहे ?’, असा प्रश्न पडला. दुसर्‍या दिवशी सद्गुरु दादांच्या हातात मला घड्याळ दिसले. तेव्हा ‘काल दिसलेला हात हाच होता’, असे मला जाणवले. ‘साधिकेला धरून सेवाकेंद्रात आणण्याची कृपा त्यांचीच असावी’, हे माझ्या लक्षात आले.’ – सौ. मनीषा वाघमारे, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग.

सौ. जयंती परब

४ आ. सद्गुरु सत्यवान दादा प्रसारातून सेवाकेंद्रात उशिरा आल्यावर त्यांनी त्रास असणार्‍या साधिकेसाठी नामजप करूनच स्वतः महाप्रसाद घेणे : ‘एकदा सद्गुरु सत्यवान दादा प्रसारातून उशिरा सेवाकेंद्रात आले. त्यांना महाप्रसाद घ्यायला उशीर झाला होता. भोजनकक्षात येऊन ते महाप्रसाद घेणार, तेवढ्यात त्यांनी विचारले, ‘‘त्रास असलेली साधिका जेवली का ? तिला त्रास होत आहे का ?’’ ‘ती जेवली नाही’, हे कळल्यावर त्यांनी महाप्रसाद वाढून घेण्याचे रहित केले आणि संबंधित साधिकेकडे जाऊन तिची विचारपूस केली आणि तिच्यासाठी नामजपादी उपाय केले. त्यानंतर तिला महाप्रसाद घ्यायला सांगूनच त्यांनी स्वतः थोडासा महाप्रसाद घेतला. या प्रसंगात ‘मूल आजारी असल्यावर आईचे मन जसे कळवळते आणि ते बरे झाल्यावर तिला बरे वाटते’, तशी सद्गुरु दादांची स्थिती मला अनुभवता आली.

सद्गुरु दादा बाहेरगावी असले, तरी ते तेथून त्रास असणार्‍या त्या साधिकेसाठी नामजप करायचे. त्या वेळी तिचा त्रास आटोक्यात येत असे.’ – सौ. जयंती परब

५. सद्गुरु दादांनी स्वतः पेटवलेल्या चुलीविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. ‘पावसाळा असल्याने सेवाकेंद्रातील चूल ओली झाली होती. त्यामुळे स्वयंपाकासाठी चूल पेटवणे आमच्याकडून टाळले जायचे. जेव्हा हे सद्गुरु दादांना कळले, तेव्हा त्यांनी स्वतःहून चूल पेटवली. तेव्हापासून तेथे अग्निनारायणाचे अस्तित्व जाणवते.

आ. त्यांनी चूल पेटवल्यानंतर तो अग्नी यज्ञकुंडातील अग्नीप्रमाणे तेजोमय जाणवला.

इ. चुलीवर सौ. जयंती परब या साधिका महाप्रसाद बनवतात. चुलीपुढे सेवा करत असतांना ‘जयंतीताईंना अग्निनारायण आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.

ई. चूल पेटवल्यानंतर मला सूक्ष्मातून अग्निनारायणाचे टप्प्याटप्प्याने दर्शन झाले. प्रथम यज्ञकुंडाप्रमाणे चैतन्य जाणवले. नंतर पिवळ्या प्रकाशाच्या स्वरूपात मला अग्निनारायण दिसत होता. त्यानंतर त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातात पिवळसर कडे दिसले. नंतर त्याचे कमरेपर्यंतचे अस्तित्व कधी पिवळ्या, तर कधी निळसर रंगात जाणवत होते.

उ. सेवाकेंद्रात बाहेरून आलेल्या साधकांनाही चुलीकडे गेल्यावर चांगले वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.’

– सौ. मनीषा वाघमारे

ऊ. ‘एकदा सद्गुरु दादांनी चूल पेटवली. त्यानंतर ती चूल पेटवतांना कोणताही अडथळा येत नाही.

ए. त्या चुलीवर स्वयंपाक करत असतांना माझे मन एकाग्र होऊन मला हलके वाटते.

ऐ. मी प्रतिदिन चुलीला नमस्कार करून महाप्रसाद बनवते. एकदा महाप्रसाद बनवण्यापूर्वी मी प्रार्थना केली, ‘हे अग्निनारायणा, माझा त्रास आणि स्वभावदोष तुझ्या तेजाने नष्ट कर.’ तेव्हा मला एकदम तेजोमय वाटू लागले. मी एक क्षण स्तब्ध झाले. त्या वेळी माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले.

ओ. तेव्हा ‘मी सूर्यनारायणाची आरती करत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग माझ्याकडून आपोआप झाला.

औ. त्या वेळी ‘माझी पाठ, मान आणि खांदा यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण अग्निदेव नष्ट करत आहे’, असे मला जाणवले.

अं. त्यानंतर माझा नामजप चालू झाला. ‘त्या अवस्थेतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते. सेवा करत असतांना जवळजवळ ४ घंटे माझा नामजप चालू होता.

क. तेव्हापासून चुलीवर महाप्रसाद बनवतांना मला उष्णता जाणवत नाही, तसेच थकवा येत नाही. तेथे गेल्यावर माझ्या अंगावर रोमांच येतात. मी घातलेल्या दागिन्यांनाही चकाकी आली आहे.’

– सौ. जयंती परब, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग. (मार्च २०२६)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक