साधना करण्यास तीव्र विरोध असूनही ‘तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा’ या बळावर संतपद गाठलेल्या सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

साधनाप्रवास

‘याआधीच्या लेखांत आपण ‘पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ, त्यांच्या यजमानांचा सत्संगाला जायला झालेला विरोध, साधनेला विरोध असल्याचे काही प्रसंग, त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ करणे’, यांविषयी जाणून घेतले. या लेखात पू. डगवारकाकूंना विरोध झाल्याच्या प्रसंगांत त्यांनी अनुभवलेल्या गुरुकृपेविषयी जाणून घेऊया.  

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019310.html

(पू.) श्रीमती मंदाकिनी डगवार

६. अनुभवलेली गुरुकृपा ! 

६ अ. ‘देव सेवा करून घेतो आणि नामानिराळा रहातो’, या संदर्भात आलेली अनुभूती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवल्यानंतर यजमानांनी भांडण न करणे : आमच्या घरी दूरभाष (लँडलाईन फोन) होता. माझ्याकडे दायित्वाची सेवा असल्याने मला पुष्कळ साधकांना दूरध्वनी करावे लागायचे. तेव्हा ‘माझा दूरभाषचा वापर अधिक आहे किंवा मला पुष्कळ दूरभाष येतात; म्हणून खर्च वाढतो’, असे म्हणून यजमान मला पुष्कळ ओरडले. एकदा त्यांनी कार्यालयातून आम्ही केलेल्या दूरध्वनींची सूची आणली. तेव्हा मी ‘भांडण होऊ नये’, यासाठी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आळवले. मी यजमानांनी आणलेली नावांची सूची पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘यजमानांनी अधिक दूरध्वनी केले होते.’ त्यामुळे आमचे भांडण टळले. तेव्हा मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘देव सेवा करून घेतो आणि नामानिराळा रहातो’, अशी मला अनुभूती आली.

६ आ. सेवा करून घरी यायला उशीर झाल्यावर प.पू. गुरुदेवांचा पुष्कळ धावा करणे आणि घरी गेल्यावर यजमानांनी सौम्य आवाजात रागावणे : माझ्याकडे दायित्वाची सेवा असल्याने मला घरी यायला पुष्कळ विलंब होत असे. यजमान म्हणायचे, ‘‘तू संध्याकाळी ७ वाजायच्या आधी घरी यायला हवेस.’’ मी तसा प्रयत्न करायचे; परंतु काही ना काही सेवा आल्याने मला विलंब होत असे. तेव्हा मला पुष्कळ भीती वाटत असे. मी घरी येतांना प.पू. गुरुदेवांचा पुष्कळ धावा करत असे, ‘गुरुदेव, तुम्ही माझ्या पुढे रहा आणि श्रीकृष्ण माझ्या पाठी राहील. मी तुमच्या दोघांमध्ये राहीन. आपण तिघे मिळून घरात प्रवेश करू.’ नंतर मी घरी गेल्यावर यजमान मला सौम्य आवाजात रागवायचे. तेव्हा मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.

यजमानांनी घरी आलेल्या नातेवाइकांना ‘पत्नी बाहेर जाते, ऐकत नाही’, असे सांगणे आणि त्याच वेळी दूरदर्शनवरील सत्संगात ‘सत्संगासाठी कितीही विरोध झाला, तरी घराबाहेर पडायला हवे’, असे सांगणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकदा मला यजमानांनी सांगितले, ‘‘सत्संगाला अन्यत्र जायचे नाही. दूरदर्शन वाहिनीवर पूज्यपाद आसारामबापूंचा सत्संग असतो, तोच ऐकायचा.’’ तेव्हा आमच्या घरी माझ्या सासूबाई, जाऊबाई, नणंद आणि इतर पाहुणे होते. आम्ही सगळे जण दूरदर्शन वाहिनीवरील सत्संग ऐकत होतो. त्या वेळी यजमान सर्वांच्या समोर रागाने म्हणाले, ‘‘ही बाहेर जाते. ऐकत नाही.’’ त्या वेळी पू. आसारामबापू सत्संगात सांगत होते, ‘‘कितीही विरोध झाला, तरीही सत्संगासाठी संत मीराबाईंप्रमाणे घराबाहेर पडायला हवे.’’ तेव्हा ‘ही देवाने मला दिलेली प्रचीती आहे’, असे मला वाटले आणि गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. तो सत्संग ऐकल्यावर घरातील सर्व जण शांत होते आणि मीही शांत राहिले. ‘गुरुदेव माझ्यासाठी किती करतात !’, असे मला वाटले.

६ इ. साधकांनी यजमानांचे बोलणे सहन करणे : मला घरी यायला विलंब होत असल्याने ज्यांच्या घरी सत्संग असेल, त्यांच्याशी माझे यजमान भांडत असत. ‘साधक माझ्यासाठी माझ्या यजमानांचे बोलणे सहन करतात’, हे मला समजल्यावर मी त्या साधकांना ‘माझे यजमान काही बोलले असतील, तर मी क्षमा मागते’, असे सांगत असे. ‘साधकांनी साहाय्य केल्यामुळे मला साधना करता येत होती’, असे वाटून मला कृतज्ञता वाटत असे.

६ ई. गृहकृत्य साहाय्यिकेने साधनेत साहाय्य करणे : यजमान अधिकाधिक वेळ कार्यालयीन कामासाठी बाहेर जात असत. त्या वेळेत मी सेवा करत असे. एखादे वेळी मी बाहेर गेल्यावर यजमान घरी आले, तर गृहकृत्य साहाय्यिकेला ‘मी आताच बाहेर गेले आहे’, असे सांगण्यास सांगायची. त्या गृहकृत्य साहाय्यकही साधना करत होत्या. त्या मला पुष्कळ साहाय्य करत असत.

६ उ. मैत्रिणीने केलेले साहाय्य : यजमान मला एकटीला बाहेर जाऊ देत नसत. मी माझी मैत्रीण श्रीमती सुमती सरोदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६४ वर्षे) हिच्या समवेत प्रसाराच्या सेवेला जात असे. ती नेहमी मी सांगितलेल्या वेळेत येत असे. आम्ही शाळेचे काहीतरी कारण सांगून सेवेसाठी बाहेर पडत असू. मी तिच्यामुळे सेवा करू शकले.

‘देव सेवा करून घेतो आणि नामानिराळा रहातो !’

६ ऊ. हिंगणघाट येथील सार्वजनिक प्रवचनाला जाण्यासाठी यजमानांच्या मानलेल्या बहिणीचे साहाय्य मिळणे : एकदा वर्ध्यापासून दीड ते दोन घंट्यांच्या अंतरावर हिंगणघाट येथे श्री. विनय पानवळकर यांचे सार्वजनिक प्रवचन होते. मला त्या प्रवचनाला जायचे होते; पण माझ्या मनात ‘बाहेरगावी कसे जायचे ?’, असा विचार येत होता. वर्धा येथे यजमानांची मानलेली बहीण रहात होती. त्यांना प्रवचन, भजन-कीर्तन अशा कार्यक्रमांना जाण्याची आवड होती. मी त्यांना हिंगणघाट येथील सार्वजनिक प्रवचनाविषयी सांगितले. मी त्यांना माझ्या यजमानांची अनुमती घेण्यास सांगितले. तेव्हा माझ्या यजमानांनी होकार दिला. मी सार्वजनिक प्रवचनाला जाऊ शकले. ‘यजमानांचा पुष्कळ विरोध असूनही गुरूंच्या कृपेने मला प्रत्येक संधीचा लाभ घेता आला’, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

६ ए. नातेवाइकांना धर्मशास्त्राविषयी सांगितल्यावर यजमानांनी ‘त्यांचा मुलगा तुला मारायला येणार आहे’, असे सांगणे आणि दिवसभर देवाजवळ बसून ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ म्हणणे अन् भाचा घरी न येणे आणि ‘देवानेच रक्षण केले’, असे जाणवून कृतज्ञता वाटणे : एकदा मी सेवेला गेल्यावर एका नातेवाइकांच्या घरी गेले होते. त्यांनी मला ‘तुम्ही समाजातील व्यक्तींना साधनेच्या संदर्भात काय सांगता ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना धर्मशास्त्राविषयी १ – २ उदाहरणे सांगितली. मी त्यांना ‘शास्त्रानुसार देवघराची मांडणी कशी करावी, सण कसे साजरे करावे’, यांविषयी सांगितले. त्यांनी यांविषयी त्यांच्या मुलाला सांगितले. तेव्हा त्यांचा मुलगा पुष्कळ चिडला. त्याने माझ्या यजमानांना सांगितले, ‘‘मी तुमच्या घरी येऊन मामींना मारीन.’’ तेव्हा माझे यजमान मला म्हणाले, ‘‘दुसर्‍याच्या घरी जाऊन काहीतरी सांगून भांडण लावते. त्यांचा मुलगा तुला मारायला येणार आहे. मी त्याला अडवणार नाही.’’ ‘माझा भाचा मला मारायला येणार’, असे समजल्यावर मी घाबरले होते. मी माझ्या मैत्रिणीला याविषयी सांगितले. तेव्हा तिने मला ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ म्हणायला सांगितले. मी दिवसभर देवाजवळ बसून ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ म्हटले. त्या दिवशी ‘माझा भाचा घरी आला नाही आणि देवानेच माझे रक्षण केले’, त्याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती.

६ ऐ. यजमानांचे मित्र आणि त्यांची पत्नी ‘प्रसारासाठी बाहेर जाऊ नको’, असे समजावण्यास आले असता ‘त्यांना तुम्ही व्यावसायिक कामासाठी बाहेर जाता ना’, असे सांगितल्यावर त्यांनी यजमानांना ‘वहिनींना आवडते, तर त्यांना सेवेला जाऊ दे’, असे सांगणे : ‘मी बाहेर प्रसाराला जाऊ नये’, यासाठी यजमान आमचे नातेवाईक आणि मित्र यांना ‘हिला समजवा, असे सांगत, तसेच ही सेवेसाठी बाहेर जात असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होते. हिने घरीच रहायला हवे’, असे मला सांगायला सांगत. मला नातेवाईक आणि यजमानांचे मित्र समजावत असत. तेव्हा मी त्यांना सांगायचे, ‘‘मी घरातील सर्व कर्तव्ये पूर्ण करते आणि सेवेला जाते.’’ एकदा यजमानांचे एक मित्र आणि त्यांची पत्नी आमच्या घरी आले होते. त्यांनी मला समजावले, ‘‘साहेबांना जे आवडत नाही, ते तुम्ही कशाला करता ? घरी एवढे सुख असते ना ! बाहेर जाऊ नका.’’ यजमानांच्या मित्राची पत्नी मोत्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करत होती. त्या मोत्यांचे दागिने आणण्यासाठी विमानाने भाग्यनगर आणि मुंबई येथे जात असत. त्यांना एक मुलगा होता. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘वहिनी व्यवहारासाठी बाहेरगावी जातात ना ? मग मी गावातच देवासाठी प्रसार करते, तर काय चुकले ?’’ माझे बोलणे ऐकून ते शांत झाले. त्यांनी यजमानांना सांगितले, ‘‘वहिनींना आवडते, तर त्यांना सेवेला जाऊ दे.’’ नंतर मी त्यांना साधना करण्याचे महत्त्व सांगितले.

६ ओ. कितीही भांडणे झाली, तरी दोघांमध्ये अबोला धरला न जाणे : आमच्यामध्ये पुष्कळ भांडणे होत असूनही ‘दोघांमध्ये अबोला झाला’, असे कधी झाले नाही. मला यजमानांचा कधी रागही आला नाही. ही माझ्यासाठी मोठी गुरुकृपा होती. मी अनेक वेळा ‘त्यांच्याशी बोलायचे नाही’, असे ठरवत असे; मात्र शाळेतून घरी आल्यावर मी त्याविषयी विसरून जायचे. मी घरी आल्यावर यजमानांशी बोलायचे आणि त्यांना सांगायचे, ‘‘ मी आज तुमच्याशी बोलायचे नाही’, असे ठरवले होते; मात्र मी विसरले. तेव्हा ते म्हणत, ‘‘अबोला धरून काय करणार ? एकाच ठिकाणी रहावे लागते.’’ त्यामुळे ‘मुलांवर चांगले संस्कार कसे करता येतील’, याचीही मला सतत जाणीव असायची.’

(क्रमशः)

– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा (२५.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा –  https://sanatanprabhat.org/marathi/1020604.html