Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा

अंदमान – सरकारच्या ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ या आस्थापनेला अंदमान बेटांच्या पूर्व किनारपट्टीपासून अनुमाने १५ कि.मी. अंतरावर आणि ३५५ मीटर पाण्याच्या खोलीवर असलेल्या ‘श्री विजयपुरम्-३’ या शोध-विहिरीत नैसर्गिक वायूचा साठा सापडला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या घटनेचे ‘ऊर्जा संधींचा महासागर’, अशा शब्दांत वर्णन केले आहे. ‘इओसीन’ स्तरात १ सहस्र ९०० मीटरहून अधिक खोलीवर केलेल्या प्राथमिक चाचणीत सतत ‘फ्लेअरिंग’द्वारे वायूचे अस्तित्व सिद्ध झाले.

‘श्री विजयपुरम्-२’ नंतर या ब्लॉकमधील हा दुसरा निश्चित हायड्रोकार्बन शोध असून ३ शोध-विहिरींपैकी दोनमध्ये यश मिळाले आहे. या शोधामुळे अंदमान-निकोबार बेसिनमधील हायड्रोकार्बन क्षमतेविषयीचा अपेक्षा वाढल्या असून देशाच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.