रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन

ग्राहक आयोगाचे कामकाज ठप्प ! नियमित सुनावण्या पुढे ढकलल्याने ग्राहकांमध्ये नाराजी

रत्नागिरी – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालय नूतनीकरण कामामुळे नियमित सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आयोगाचे कामकाज तातडीने एखाद्या पर्यायी जागेतून चालू करावे, अशी मागणी रत्नागिरी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निबंधकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. ६ मे या दिवशी आयोगाच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटिसीनुसार कार्यालय नूतनीकरणाचे काम चालू असल्याने याचिका प्रविष्ट केल्याची सुनावणी (ॲडमिशन हिअरिंग) आणि ‘निकाल’ वगळता अन्य सर्व सुनावण्यांच्या दिनांक पुढे देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते.

२. या निर्णयामुळे आधीच प्रलंबित असलेल्या ग्राहक तक्रारींच्या निपटारा प्रक्रियेत आणखी मोठा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रविष्ट झालेल्या तक्रारींचा निपटारा ९० दिवसांच्या आत होणे अपेक्षित असते. असे असतांना केवळ इमारत दुरुस्तीच्या कारणावरून सुनावण्या लांबणीवर टाकणे, हे ग्राहकांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

४. ग्राहकांना वेळेत न्याय मिळावा आणि न्यायदानाची ही संपूर्ण प्रक्रिया खंडित होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली करणे आवश्यक आहे.

५. प्रशासनाने तात्काळ दुसरी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन आयोगाचे कामकाज पूर्ण क्षमतेने चालू ठेवावे, अशी आग्रही मागणी आहे.

संपादकीय भूमिका

कार्यालयाचे नूतनीकरण की ग्राहकांची ससेहोलपट ?