साधनाप्रवास
‘याआधीच्या लेखांत आपण ‘पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ, त्यांच्या यजमानांचा सत्संगाला जायला झालेला विरोध, साधनेला विरोध असल्याचे काही प्रसंग, त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ करणे, पू. काकूंना विरोध झाल्याच्या प्रसंगांत त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा’ यांविषयी जाणून घेतले. या लेखात ‘यजमानांचा विरोध सहन करूनही पू. डगवारकाकूंनी निष्ठेने साधना चालू ठेवली’, याविषयी जाणून घेऊया.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020304.html

७. यजमानांचा विरोध सहन करूनही निष्ठेने साधना चालू ठेवणे
७ अ. मुलांना घेऊन शिबिराला गेले असता यजमानांनी ‘प्रकृती ठीक नाही, तू लवकर घरी ये’, असे पुष्कळ वेळा भ्रमणभाष करून सांगणे आणि ३ दिवसांनंतर घरी आल्यावर यजमानांनी दार न उघडता ‘तुम्ही तिकडेच रहा’, असे सांगणे अन् २ घंट्यांनी दार उघडून घरात घेणे : एकदा हिंगणघाट येथे ३ दिवसांचे निवासी शिबिर होते. आम्ही त्या शिबिराला जाण्यासाठी यजमानांची अनुमती घेतली आणि मी मुलांना घेऊन शिबिराला गेले. आम्ही शिबिराला गेल्यावर यजमानांनी मला पुष्कळ वेळा ‘माझी प्रकृती ठीक नाही. तू लवकर घरी ये’, असे भ्रमणभाष करून सांगितले. मी त्यांना प्रतिदिन भ्रमणभाष करत असे. तेव्हा ते माझा आवाज ऐकून भ्रमणभाष संच जोरात आपटून ठेवून द्यायचे. आम्ही ३ दिवसांनी रात्री घरी आलो. तेव्हा यजमानांनी दार उघडले नाही आणि ‘तुम्ही तिकडेच रहा’, असे सांगितले. आम्ही तिघांनी रात्री ११ ते १२ या वेळेत नामजप केला आणि प्रार्थना केली. त्यानंतर यजमानांनी २ घंट्यांनी दार उघडले आणि आम्हाला घरात घेतले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘यजमानांची प्रकृती चांगली आहे. यजमान मला खोटे सांगत होते.’ या कठीण प्रसंगातही ‘गुरुदेव आमच्याकडून साधना करून घेत आहेत’, यासाठी मला कृतज्ञता वाटत होती.
७ आ. दुचाकी गाडीवरून जातांना यजमानांचे बोलणे ऐकू न आल्यास त्यांनी मध्येच गाडीवरून उतरवून पुढे जाणे आणि नंतर पुन्हा येऊन घेऊन जाणे : आम्ही काही वेळा अमित आणि मयुरी यांना समवेत घेऊन दुचाकी गाडीवरून काही कामानिमित्त बाहेर जात होतो. तेव्हा यजमानांनी काही बोललेले मला ऐकू आले नाही, तर ते मला आणि मुलांना मध्येच उतरायला सांगायचे. आम्ही पायी चालत थोडे पुढे गेलो की, ते गाडी घेऊन यायचे आणि आम्हाला घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोचवत असत.
‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा सर्वांसमोर आदर्श ठेवणार्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

‘साधना करतांना साधिकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रसंगी घरातील व्यक्तींचा विरोधही पत्करावा लागतो. साधनेला विरोध होत असल्यास काही साधिका घरी राहून साधना करतात, तर काही साधिका साधना करण्याचे सोडून देतात; मात्र पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे उदाहरण विरळाच !
पू. (श्रीमती) डगवार यांनी त्यांच्या यजमानांचा तीव्र विरोध सहन करून तळमळीने साधना केली. प्रसंगी त्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलांच्या समवेत घराबाहेर काही घंटे थांबावे लागले. त्यांना यजमानांच्या समोर त्यांच्या नातेवाइकांशी बोलायलाही अनुमती नव्हती. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी परिश्रम घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून व्यष्टी अन् समष्टी साधना केली आणि अल्पावधीत संतपद गाठले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या साधनेमुळे त्यांचे यजमानही साधना करू लागले आणि त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा आदर्श सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१.२०२६)
७ इ. यजमानांनी माझ्या भावाला ‘तुझी बहीण गावभर हिंडत असते, तू घरी येऊ नकोस’, असे सांगणे आणि ‘भाऊ घरी आला नाही, तरी चालेल; पण साधना सोडायची नाही’, असे साधिकेने ठरवणे : एकदा मी प्रसाराला गेले असतांना माझा भाऊ घरी आला. तो घरी येणार असल्याचे मला ठाऊक नव्हते. तेव्हा यजमानांनी त्याला सांगितले, ‘‘तुझी बहीण गावभर हिंडत असते. ती घरी रहात नाही. त्यामुळे तू तुझ्या बहिणीला ‘बाहेर जायचे नाही’, असे सांग आणि यापुढे तू माझ्या दारात पाय ठेवायचा नाही.’’ मला याविषयी ठाऊक नव्हते. नंतर ४ ते ६ मास झाले, तरीही भाऊ एकदाही घरी आला नाही; म्हणून मी सहजच भावाला भ्रमणभाष केला. तेव्हा तो म्हणाला, ‘‘भावोजींनी ‘येऊ नको’, असे सांगितल्यामुळे मी आलो नाही आणि मी येणार नाही.’’ माझा भाऊ ३ वर्षे घरी आला नाही. ‘भाऊ घरी आला नाही, तरी चालेल; पण साधना सोडायची नाही’, असे मी ठरवले आणि गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन केले. याविषयी मी यजमानांशी काहीही बोलले नाही.
७ ई. यजमानांनी सेवेला जाण्यास कितीही विरोध केला, तरी ‘त्यांना कधीतरी साधना करण्याचे महत्त्व पटेल’, या विचाराने त्यांना शांतपणे सांगणे : आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घ्यायला जात होतो. तेव्हा यजमानांचे मित्र आम्हाला पहात असत. ते यजमानांना सांगायचे, ‘‘वहिनी दिसल्या होत्या.’’ तेव्हा यजमान मला सांगत, ‘‘तुला किती पैसे हवेत, ते सांग; पण घरोघरी फिरायचे नाही.’’ यावरून ते मला पुष्कळ वेळा घराबाहेर काढत असत. ते शांत झाल्यावर मी त्यांना ‘अर्पण मिळवण्यासाठी घरोघरी जाण्याचे महत्त्व काय आहे’, याविषयी सांगत असे. ‘यजमानांनी कितीही विरोध केला किंवा कितीही त्रास दिला, तरीही त्यांना कधीतरी साधना करण्याचे महत्त्व पटेल’, या विचाराने मी त्यांना शांतपणे सांगत असे.
७ उ. चाळीसगाव येथे शिबिराला जातांना यजमानांना ‘रेल्वेचे आरक्षण केले आहे’, असे सांगणे आणि रेल्वेच्या डब्यातील आसनांच्या दोन रांगांमधील जागेत खाली चादर अंथरून तेथे झोपून प्रवास करणे : एकदा अकस्मात् माझे चाळीसगाव येथे शिबिरासाठी जायचे ठरले. त्यामुळे रेल्वेगाडीचे आरक्षण मिळाले नाही. यजमानांचा माझ्या साधनेला विरोध असल्याने मला सर्व गोष्टी यजमानांना कळू न देता कराव्या लागत असत. मला काही वेळा साधकांचे साहाय्य मिळत असे. यजमान मला कधीही रेल्वेगाडीचे तिकीट काढायला साहाय्य करत नसत. मी यजमानांना ‘आरक्षण केले आहे’, असे खोटे सांगून गेले. तेव्हा मी रेल्वेच्या डब्यातील आसनांच्या दोन रांगांमधील जागेत खाली चादर अंथरून तेथे झोपून प्रवास केला. हे सर्व मी गुरुकृपेमुळेच करू शकले.
(क्रमश:)
– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा (२५.१०.२०२५)
भाग ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021383
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान