साधना करण्यास तीव्र विरोध असूनही ‘तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा’ या बळावर संतपद गाठलेल्या सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार (वय ६२ वर्षे) !

‘याआधीच्या लेखात आपण पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ, त्यांच्या यजमानांचा सत्संगाला जायला झालेला विरोध’, यांविषयी जाणून घेतले. या लेखात ‘पू. डगवारकाकूंना यजमानांनी केलेल्या विरोधाचे स्वरूप आणि पू. काकूंचा पूर्णवेळ साधनेला आरंभ’ यांविषयी जाणून घेऊया.

भाग २ 

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1018890.html

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

साधनाप्रवास

४. यजमानांनी केलेल्या विरोधाचे स्वरूप !

४ अ. पत्नी घरातील सर्व कामे करत असूनही यजमानांनी एका साधकाला ‘पत्नीला सत्संगाला येऊ देऊ नका’, असे सांगणे : ‘मी सत्संगाला जाऊ नये’, यासाठी ज्या साधकाच्या घरी सत्संग होत असे, त्यांना यजमानांनी सांगितले, ‘‘हिला सत्संगाला येऊ देऊ नका.’’ ‘माझ्यामुळे मुले अभ्यास करणार नाहीत’, असे यजमानांना वाटत होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘मी दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम पहात नाही किंवा कुणाशी गप्पा मारण्यात वेळ घालवत नाही. घरातील सर्व कामे व्यवस्थित करते, तरीही तुम्ही मला सत्संगाला जायला विरोध का करता ?’’

४ आ. गुरुपौर्णिमेच्या निमित्तची सेवा रात्री असल्याने महोत्सवाला जाता न येणे आणि ‘जीवनातील पुष्कळ काहीतरी गमावले आहे’, असे वाटून दुःख होणे : मी सत्संग घेत असतांना इतर सेवांचेही दायित्व घेऊ लागले. ‘देवच सेवा करून घेतो’, असे सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक सेवा करायला होकार देत असे. एकदा गुरुपौर्णिमेच्या महोत्सवाहून घरी यायला उशीर होणार होता आणि त्या वेळी घरी येतांना माझ्या समवेत कुणी नव्हते; म्हणून मला गुरुपौर्णिमेला जाता आले नाही. त्यामुळे मला पुष्कळ खंत वाटली. तेव्हा मला ‘जीवनातील पुष्कळ काहीतरी गमावले आहे’, असे वाटून दुःख झाले. नंतर मी ‘प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित रहायचे’, असे ठरवले. मी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना मनातील सर्व विचार सांगितले. तेव्हा माझ्याजवळ गुरुदेवांचे छायाचित्र नव्हते. सनातनच्या ध्वनीचित्रफीतीच्या आच्छादनावर गुरुदेवांचे छायाचित्र होते. मी त्या छायाचित्राकडे पहात त्यांना आत्मनिवेदन करत असे. तेव्हा ‘प.पू. डॉक्टर मी सांगितलेले सर्व ऐकतात’, याची मला प्रचीती येत होती.

‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा सर्वांसमोर आदर्श ठेवणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधना करतांना साधिकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रसंगी घरातील व्यक्तींचा विरोधही पत्करावा लागतो. साधनेला विरोध होत असल्यास काही साधिका घरी राहून साधना करतात, तर काही साधिका साधना करण्याचे सोडून देतात; मात्र पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे उदाहरण विरळाच !

पू. (श्रीमती) डगवार यांनी त्यांच्या यजमानांचा तीव्र विरोध सहन करून तळमळीने साधना केली. प्रसंगी त्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलांच्या समवेत घराबाहेर काही घंटे थांबावे लागले. त्यांना यजमानांच्या समोर त्यांच्या नातेवाइकांशी बोलायलाही अनुमती नव्हती. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी परिश्रम घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून व्यष्टी अन् समष्टी साधना केली आणि अल्पावधीत संतपद गाठले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या साधनेमुळे त्यांचे यजमानही साधना करू लागले आणि त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा आदर्श सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१.२०२६)

४ इ. मुलांना बालसंस्कारवर्गात जाण्यास विरोध करणे : आमच्या घराजवळ बालसंस्कारवर्ग चालू झाला. माझा मुलगा अमित आणि मुलगी मयुरी दोघेही रविवारी बालसंस्कारवर्गात जाऊ लागले. एका रविवारी मी स्वयंपाक करत होते. तेव्हा ज्यांच्याकडे बालसंस्कारवर्ग असतो, त्या गृहस्थांना यजमान ‘माझ्या मुलांना बालसंस्कारवर्गात बसू द्यायचे नाही’, असे सांगून आले. मला ही गोष्ट एक मासानंतर समजली, तरीही मी याविषयी घरी काही बोलले नाही. ‘आपण साधना चालू ठेवायची. गुरुदेव सांभाळतीलच’, या विचाराने मुले बालसंस्कारवर्गात जात राहिली.

४ ई. मुलांना सेवेची पुष्कळ आवड असणे आणि त्यांनी वडिलांचा विरोध असूनही सेवेसाठी बाहेर जाणे : अमित आणि मयुरी यांनाही सेवा करण्याची पुष्कळ आवड आहे; परंतु घरून विरोध असल्याने त्यांना सेवेला बाहेर पडण्यास मर्यादा येत असत. वडील (यजमान) झोपल्यावर अमित रात्री ११ वाजता गुरुपौर्णिमेचे कापडी फलक लावण्यासाठी भिंतीवरून उडी मारून बाहेर पडत असे आणि पहाटे घरी येत असे. त्या वेळी आम्ही दार उघडेच ठेवत असू. इतर वेळी ते दोघेही ‘शिकवणीवर्गाला जात आहोत’, असे सांगून सेवेसाठी जात असत. मयुरी सातव्या इयत्तेत शिकत असतांना तिच्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे आणि अहवाल बनवणे या सेवा होत्या. दोन्ही मुले लहानपणापासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वितरण करणे, स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेणे, प्रसार करणे, अशा सेवा करत असत.

४ उ. नोकरी करून सेवा करणे : यजमान मला सेवा करण्यासाठी विरोध करत असत. त्यामुळे मी पुष्कळ रडायचे. मला रात्री झोप लागत नसे. त्यामुळे माझे डोके दुखायचे. मी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शाळेत असे आणि शाळा सुटल्यावर २ घंटे मैत्रिणीसह साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे, सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणे, अशा सेवा करत असे.

५. पुढचे शिक्षण न घेता ‘पूर्ण वेळ साधनाच करायची’, असे ठरवणे 

शाळेत मुलांना शिकवून पैसे मिळतात; मात्र ‘सत्संग घेतला, तर माझी साधना होईल’, असे मला सारखे वाटायचे. मला लिहिण्याची आणि अभ्यास करण्याची आवड होती. मी ‘एम्.एड’ला प्रवेश घेणार होते आणि त्या कालावधीत माझा सनातन संस्थेशी संपर्क आला. तेव्हा मी शिक्षण न घेता ‘आता पूर्णवेळ साधनाच करायची’, असे (वर्ष १९९९ ला) ठरवले.’

(क्रमशः)

– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा (२५.१०.२०२५)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020304.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक