सनातन संस्थेला लाभलेले एक दुर्लभ दैवी संतरत्न – सद्गुरु सत्यवान कदम !

सद्गुरु सत्यवान कदम

 १. सद्गुरु सत्यवान कदम हे शिवाच्या ‘पिनाक’ या धनुष्याचे अवतार असणे

‘सद्गुरु सत्यवान कदम हे शिवाच्या प्रख्यात ‘पिनाक’ या धनुष्याचे अवतार आहेत. त्रेतायुगात त्यांचा जन्म ‘पिनाकऋषि’, या नावाने झाला. त्यानंतर त्रेता, द्वापर आणि कलि या ३ युगांमध्ये त्यांचे एकूण २० जन्म झाले. हा त्यांचा २१ वा जन्म आहे. ते मागील प्रत्येक जन्मी श्रीविष्णूच्या अवताराला साहाय्य करण्याच्या दृष्टीने पृथ्वीवर धर्मराज्य स्थापन करण्यासाठी कार्यरत होते. या जन्मातही ते हेच कार्य करत आहेत. हा त्यांचा शेवटचा मनुष्यजन्म असून या जन्मात त्यांनी देहोत्सर्ग (टीप) केल्यावर ते सत्यलोकात जाणार आहेत आणि तेथूनच पृथ्वीवरील हिंदुत्वनिष्ठ अन् साधक यांना धर्मराज्याची स्थापना करण्यासाठी साहाय्य करणार आहेत.

टीप – देहोत्सर्ग : देह पंचतत्त्वांत विसर्जित करणे

२. सद्गुरु सत्यवान कदम यांच्यामध्ये कार्यरत असणारी देवतांची तत्त्वे

मागील २० जन्मांमध्ये सद्गुरु सत्यवानदादांनी शिवाची पुष्कळ उपासना केली. त्याचप्रमाणे श्रीरामावताराच्या वेळी त्यांनी ध्यानयोगाद्वारे हनुमानाची उपासना करून श्रीरामाच्या कार्यातील सूक्ष्मातील अडथळे दूर केले होते. त्यामुळे त्यांच्यात ७ टक्के शिवतत्त्व आणि ३ टक्के हनुमानतत्त्व आहे.

३. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्यात कार्यरत झालेल्या दैवी घटकांचे होणारे प्रक्षेपण !

टीप १ – ७० टक्के आध्यात्मिक पातळीनंतर जिवात्म्याचे रूपांतर शिवात होण्याची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे त्याच्यातील शक्तीचे रूपांतर चैतन्यात होऊन त्याच्याकडून चैतन्याचे प्रक्षेपण वाढू लागते.

टीप २ – ७० टक्के आध्यात्मिक पातळीनंतर जिवात्म्याचे रूपांतर शिवात होण्याची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे त्याच्यातील भावाचे रूपांतर भक्तीत होऊन त्याच्याकडून भक्तीमुळे निर्माण झालेल्या आनंद आणि शांती या घटकांच्या लहरींचे प्रक्षेपण वाढू लागते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

४. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरींचे प्रमाण वाढल्याने ते रहात असलेल्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले असणे

सद्गुरु सत्यवानदादांच्या आध्यात्मिक पातळीसह त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाने साधकाचे अस्तित्व, स्थान आणि सभोवतालचे संपूर्ण वायूमंडल यांची अखंड शुद्धी होत आहे अन् साधकांची सात्त्विकता आणि चैतन्य वाढत आहे. त्यामुळे सद्गुरु सत्यवानदादा रहात असलेल्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावरून ‘सद्गुरु हे अस्तित्वाच्या स्तरावर कशा प्रकारे सूक्ष्मातून कार्य करतात ?’, याची प्रचीती येते.

५. भाव आणि भक्ती यांच्यातील भेद !

६. जिवाच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्याच्या भावना, भाव आणि भक्ती यांचे स्वरूप, येणारी अनुभूती अन् आध्यात्मिक उपाधी !

टीप १ – सकाम भक्ती : या अवस्थेत जिवाच्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा केवळ आरंभ झाल्यामुळे जिवावरील मायेचा प्रभाव पूर्णपणे गेलेला नसतो. त्यामुळे व्यष्टी संत झालेल्यांमध्ये भगवंताची सकाम भक्ती करण्याचा कल अधिक असतो. परिणामी काही संतांनी केलेल्या सकाम भक्तीचे फलस्वरूप त्यांना विविध प्रकारच्या दैवी सिद्धी प्राप्त होऊन हे संत सिद्धींमध्ये अडकतात. जेव्हा व्यष्टी संत श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सकाम इच्छेच्या पूर्तीसाठी नव्हे, तर केवळ मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना करू लागतात, तेव्हा त्यांच्यातील सकाम भक्तीचे रूपांतर हळूहळू निष्काम भक्तीत होऊ लागते.

टीप २- निष्काम भक्ती : या अवस्थेत जिवाचा कल मायेकडून पूर्णपणे अध्यात्माकडे वळलेला असतो. त्यामुळे तो सकाम साधना न करता निष्काम साधना करू लागतो. या अवस्थेत ‘धनदौलत, प्रसिद्धी, पद, सिद्धी’ इत्यादी मोहमायेचा त्याग करून त्याचे मन पूर्णपणे ईश्वरप्राप्ती करण्यावर केंद्रित झालेले असते; कारण त्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानामुळे त्याच्या भोगी प्रवृत्तीचे रूपांतर वैराग्यात झालेले असते. त्यामुळे अशी निष्काम भक्ती करणारे सद्गुरु भगवंताला अतिशय प्रिय असतात.

टीप ३ – ज्ञानोत्तर भक्ती : या अवस्थेत आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे जीवनात आणखी काहीच प्राप्त करण्यासारखे उरलेले नसते, तरीही समष्टीच्या कल्याणासाठी परात्पर गुरूंना कार्यरत रहावे लागते. परात्पर गुरूंची अवस्था संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ।।’, अशी झालेली असते. यालाच आध्यात्मिक परिभाषेत ‘ज्ञानोत्तर भक्ती’, असे संबोधले आहे. त्यामुळे अशी ज्ञानोत्तर भक्ती करणारे परात्पर गुरु हे भगवंताचे मूर्तीमंत स्वरूपच असतात. या अवस्थेतील शिवात्म्यांचे व्यष्टी जीवन संपूर्णपणे संपुष्टात येऊन ते केवळ समष्टी जीवन जगत असतात. त्यामुळे ते समाजातील सात्त्विक जिवांना धर्माचरण आणि मोक्षप्राप्तीसाठी साधना करण्याचे मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार करण्यासाठी मोक्षगुरूंच्या रूपात अखंडपणे कार्यरत असतात.

कृतज्ञता

असे सद्गुरु सत्यवानदादा हे सनातन संस्थेला लाभलेले एक दुर्लभ दैवी रत्न आणि निष्काम भक्त आहेत. ते मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे परम प्रिय शिष्य आणि संतरत्न आहेत. त्यामुळे त्यांचे दर्शन आणि मार्गदर्शन यांचा लाभ साधकांनी अधिकाधिक करून घेतल्यास साधकांचा निश्चितपणे आध्यात्मिक उत्कर्ष होऊ शकतो. अशा या थोर सद्गुरूंच्या चरणी आमचे कोटी कोटी नमन ! त्यामुळे म्हणावेसे वाटते, ‘झाले बहु, होतिल बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा ।’, म्हणजे ‘अनेक जण होऊन गेले, पुढे होतीलही आणि आहेतही; पण यांच्यासारखा हाच !’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १.३.२०२६)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक