थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)

५२२ किलो गांजा जप्त !

नागपूर – महसूल गुप्तचर संचालनालयाने ५२२ किलो गांजा जप्त केला आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य अनुमाने २ कोटी ६१ लाख रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका : हे प्रमाण म्हणजे समाजाला व्यसनाधीन करण्याचे मोठे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते !


नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई – येथील विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ जून या दिवशी अनावरण झाले. या विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचे ठरलेले आहे. ‘केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा चालू असून लवकरच नामकरण होईल’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


८ लाख ९० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

अंबरनाथ – येथे पोलिसांनी ८ लाख ५४ सहस्र रुपये किमतीची २४.४२० ग्रॅम वजनाची हेरॉईन पावडर जप्त केली आहे. यासह अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. त्याचे एकूण मूल्य ८ लाख ९० सहस्र रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी शरीफ सलीम शेख याला अटक केली आहे.


रिक्शाचालकांची मनमानी पद्धतीने भाडेवसुली !

नवी मुंबई – येथील रिक्शाचालक मीटरनुसार भाडे न घेता मनमानी पद्धतीने भाडेवसुली करत आहेत. गेल्या २ वर्षांत सहस्रो रिक्शाचालकांवर कारवाई होऊनही परिस्थिती तशीच आहे.

संपादकीय भूमिका : अशांचा रिक्शा परवानाच जप्त करायला हवा, त्याविना हे प्रकार न्यून होणार नाहीत !


लाचखोर ग्राम महसूल अधिकारी कह्यात !

अंबरनाथ – तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी ईश्वर जाधव याला २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदारांच्या वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून सावत्र बहिणीचे नाव सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.