साधना करण्यास तीव्र विरोध असूनही ‘तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा’ या बळावर संतपद गाठलेल्या सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार (वय ६२ वर्षे) !

‘पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांना त्यांच्या यजमानांचा (आताचे कै. विजय डगवार यांचा) समाजात जाऊन समष्टी साधना करायला विरोध होता. आरंभी पू. डगवारकाकू शाळेत नोकरी आणि घरकाम करून वर्ष १९९९ पासून समष्टी सेवा करत असत. त्यांनी मुलांवरही साधनेचे संस्कार केले. ‘पू. काकूंनी बाहेर जाऊन सेवा करू नये’, यासाठी त्यांचे यजमान त्यांना विविध प्रकारे विरोध करत असत. पू. काकूंना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; मात्र गुरुप्राप्तीच्या तळमळीपोटी पू. काकूंनी त्यावर मात केली. त्यांच्यात पहिल्यापासूनच साधकत्व आहे. त्यांच्या यजमानांचा त्यांच्या समष्टी साधनेला तीव्र विरोध असूनही पू. काकूंनी त्यांच्याशी कधीही अबोला धरला नाही. संत घरी निवासासाठी येणार असतांना त्यांच्यासाठी जशी सिद्धता केली, तशीच सिद्धता पू. काकू त्यांच्या यजमानांसाठी करत होत्या. 

पू. डगवारकाकूंनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर समष्टी साधनेची एकही संधी दवडली नाही. त्यांना गुरुकृपेने अनेक अनुभूतीही आल्या. त्यांनी कौटुंबिक कर्तव्ये आणि सेवा यांची योग्य सांगड घालून अन् प्रेमाने आणि परेच्छेने वागून यजमानांनाही (वर्ष २०१४ मध्ये) साधनेकडे वळवले.

(पू.) श्रीमती मंदाकिनी डगवार

साधनेला तीव्र विरोध असतांनाही ‘तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा’ या बळावर त्यांनी संतपदही गाठले. त्यांचा साधनाप्रवास साधकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. 

या लेखात पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार वर्ष १९९८ पासून झालेल्या साधनेच्या आरंभाविषयी जाणून घेऊया.

(भाग १)

साधनाप्रवास

१. लहानपणापासून देवाची आवड असणे

‘मला लहानपणापासून ‘देवाचे काहीतरी करायला हवे. ईश्वरप्राप्ती व्हायला हवी’, असे वाटत होते. मी लहानपणी श्रीकृष्णाचे भक्तीगीत किंवा भजन ऐकण्यात रमून जात असे.

‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा सर्वांसमोर आदर्श ठेवणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधना करतांना साधिकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रसंगी घरातील व्यक्तींचा विरोधही पत्करावा लागतो. साधनेला विरोध होत असल्यास काही साधिका घरी राहून साधना करतात, तर काही साधिका साधना करण्याचे सोडून देतात; मात्र पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे उदाहरण विरळाच !

पू. (श्रीमती) डगवार यांनी त्यांच्या यजमानांचा तीव्र विरोध सहन करून तळमळीने साधना केली. प्रसंगी त्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलांच्या समवेत घराबाहेर काही घंटे थांबावे लागले. त्यांना यजमानांच्या समोर त्यांच्या नातेवाइकांशी बोलायलाही अनुमती नव्हती. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी परिश्रम घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून व्यष्टी अन् समष्टी साधना केली आणि अल्पावधीत संतपद गाठले. इतकेच नव्हे तर त्यांच्या साधनेमुळे त्यांचे यजमानही साधना करू लागले आणि त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. 


‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा आदर्श सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’


– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१.२०२६)

२. सनातन संस्थेशी संपर्क आणि सत्संगाला जाणे 

वर्ष १९९८ मध्ये माझा सनातन संस्थेशी संपर्क झाला. आमच्या घरी काही साधक आले होते आणि ते सत्संगाविषयी सांगत होते. ‘ते देवाविषयी काहीतरी सांगणार आहेत’, याचा मला पुष्कळ आनंद झाला. मी यजमानांना विचारले ‘‘आपण सत्संगाला जाऊया का ?’’ तेव्हा ते म्हणाले ‘‘मला पुष्कळ कामे आहेत.’’ ते ‘मला एकटीला जाऊ देतील कि नाही ?’, अशी माझ्या मनात शंका होती. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला सत्संगात येण्याविषयी विचारले. तिने लगेच होकार दिला. ती मला न्यायला आल्यामुळे मी तिच्यासह सत्संगाला जाऊ शकले.

२ अ. सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘कुलदेवता आणि दत्त’ यांचा नामजप करणे : मी प्रत्येक वेळी सत्संगाला दूर जाऊ शकत नव्हते; म्हणून मी साधकांना सांगितले, ‘‘आमच्या घराजवळ सत्संग चालू करूया.’’ त्या वेळी साधकांनी ते मान्य केले. तेव्हा ‘गुरुदेवांनी माझी प्रार्थना ऐकली’, याची मला प्रचीती आली. आम्हाला सत्संगात ‘कुलदेवता आणि दत्त’ यांच्या नामाचे महत्त्व सांगितले. मी सत्संगसेवकांना ‘नामजप कसा करायचा ?’, याविषयी विचारून एका कागदावर लिहून घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप २ घंटे करत असे आणि इतर वेळी कुलदेवतेचा नामजप करत असे. त्या वेळी माझी मुले (श्री. अमित आणि कु. मयुरी) लहान असल्याने मी त्यांना सत्संगाला घेऊन जात असे. आम्ही तिघे मिळून प्रतिदिन २ घंटे बसून दत्ताचा नामजप करत होतो. आम्ही नामजप करत असतांना लावलेल्या उदबत्तीची विभूती एका डब्यात भरून ती पिण्याच्या पाण्यात घालत होतो.

३. यजमानांना पत्नी आणि मुले यांनी सत्संगाला जाणे आवडत नसणे

अ. त्यानंतर आम्हाला सत्संगाची आवड निर्माण झाली. आम्ही सत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती करू लागलो. आम्ही पुष्कळ वेळा सत्संगानिमित्त घराबाहेर जायला लागल्यावर यजमानांचा विरोध वाढला. यजमानांनी सांगितले, ‘‘मुलांना अभ्यास करायचा असतो. त्यांना सत्संगाला न्यायचे नाही आणि तूही घरी बसून नोकरी कर.’’

आ. माझ्या मनात ‘यजमानांनीही सत्संगात यावे, साधना करावी’, असे अपेक्षेचे विचार येत होते. मी याविषयी उत्तरदायी साधकांना विचारले. तेव्हा उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘यजमान २ वर्षांनी साधनेत येतील. तोपर्यंत तुम्ही तुमची साधना वाढवा.’’ ‘त्यांच्या बोलण्यावर श्रद्धा ठेवून २ वर्षे एकच ध्यास घेऊन साधना करायची’, असे आम्ही ठरवले.

दोन वर्षे संपायला १ मास १५ दिवस राहिले होते. ‘आता यजमान साधनेत येतील’, असे मला वाटले. तेव्हा ‘प्रत्येकाची वेळ यावी लागते. ईश्वरेच्छेने सर्व घडते’, हे माझ्या लक्षात आले आिण माझ्या मनातील तो विचार गुरुकृपेने नष्ट झाला.

इ. ‘मी शाळेत शिक्षिका असल्याने मी सत्संग घेऊ शकते’, असा विचार माझ्या मनात आला. मी उत्तरदायी साधकांना ‘मी सत्संग घेऊ का ?’, असे विचारले. माझा सेवेचा कालावधी वाढत होता, तसा यजमानांचा विरोधही वाढू लागला.’

(क्रमशः)

– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार, फोंडा, गोवा (२५.१०.२०२५)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019310.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक