कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !

‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पणप्रसंगी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वागत करतांना ‘एस्.टी.’चे विविध अधिकारी

कोल्हापूर, ६ जून (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगारात अत्याधुनिक ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण ६ जून या दिवशी नियोजन समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पडले. या वेळी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे, तसेच या बसमुळे इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल. पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार करून नागरिकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.’’

या प्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर, कर्मचारी अधिकारी अतुल मोरे, आगार व्यवस्थापक गणेश कोळी, प्रमोद तेलवेकर, स्थानकप्रमुख मल्लेश विभुते, साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विजय निगडे, साहाय्यक वाहतूक निरीक्षक दीपक घारगे यांसह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

६ जून या दिवशी ४५ प्रवासी बसू शकतील अशा ३ गाड्या प्राप्त झाल्या आहेत. या गाड्या एकदा भारीत केल्यावर ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात, तसेच त्या केवळ अडीच घंट्यामध्ये भारीत होतात. याशिवाय ३५ प्रवासी बसतील अशा ९ मीटर लांबीच्या ५ गाड्या प्राप्त झाल्या असून त्या ‘कोल्हापूर-इचलकरंजी’ अशा लहान मार्गांसाठी वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या वतीने देण्यात आली.