दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी संघटितपणा आणि साधना यांचे महत्त्व !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

देवीदेवता आणि असुर यांच्यातील युद्ध, हा विषय केवळ पुराणांपुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाचे जीवन आणि अंतर्मन यांच्याशी संबंधित आहे. आपल्याला शिकवले आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकेच साधनेचे मार्ग’; कारण प्रत्येक मनुष्य जन्माला येतांना स्वतःसमवेत संचित आणि प्रारब्ध कर्म यांची शिदोरी घेऊन येतो. मागील जन्मातील कर्मानुसार त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत वा कुटुंबात जन्म मिळतो. 

८ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘व्यक्तीमध्ये असलेले त्रिगुण आणि गुणधर्मांवरून असलेले गणस्वरूप, कलियुगात नामसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व अन् आसुरी प्रवृत्तीचे स्वरूप आणि माणसाचे सर्व सुखांमध्ये होत असलेले स्वरूप’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                

(भाग २२)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’, ठाणे.

भाग २१ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1016147.html

१. आसुरी प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी दैवी शक्तीची आवश्यकता !

भारत ही देवभूमी आणि पुण्यभूमी समजली आहे. येथे ऋषिमुनी साधना करणारे होते. त्यांच्या तपश्चर्येने आणि ज्ञानाने ही भूमी पवित्र अन् आध्यात्मिकतेने समृद्ध आहे. इतिहासातही आपण पहातो की, अनेक परकीय राज्यकर्त्यांनी सहस्रो वर्षे भारतावर आक्रमणे केली. भारत हा गंगा, यमुना यांच्यासह सप्तनद्या यांनी समृद्ध असा प्रदेश होता. येथे सुपीक भूमी, शेती आणि समृद्ध संस्कृती होती; पण त्या आक्रमकांना स्वतः शेती किंवा निर्माणकार्य करायचे नव्हते. अनेक आक्रमक वाळवंटी प्रदेशात रहाणारे होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण करून संपन्न प्रदेशांवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात अनेक राजे-महाराजांनीही गुरूंनी सांगितलेली उपासना आणि साधना यांना विशेष महत्त्व दिले; कारण या आक्रमणांच्या काळात अनेक देवळे पाडली गेली अन् मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. त्यामुळे अशा आसुरी प्रवृत्तींचा सामना करायचा असेल, तर त्यासाठी दैवी शक्तीची आवश्यकता असते. ती शक्ती मिळवण्यासाठी मनुष्याने देवतांना प्रसन्न करणे, नामस्मरण आणि साधना करणे आवश्यक मानले जाते. अशा आध्यात्मिक साधनेतूनच माणसाला दुष्प्रवृत्तींचा सामना करण्याची खरी शक्ती मिळते.

संघटन, शौर्य आणि साधना यांचे उत्कृष्ट उदाहरण छत्रपती शिवराय !


सध्याच्या काळात संघटनही तितकेच महत्त्वाचे असते. केवळ भावनेतून किंवा आवेशाने केलेली कृती परिणामकारक ठरत नाही. इतिहास साक्षी आहे की, ‘वेडात मराठे वीर दौडले ७’, असे म्हणत ७ जणांनी शौर्याने धाव घेतली; पण योग्य नियोजन आणि संघटन नसल्यामुळे ते वीर हुतात्मा झाले. याउलट छत्रपती शिवाजी महाराज हे संघटन, शौर्य आणि साधना यांचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यांच्या जवळ नेहमी भगवान शिवाची पिंडी असायची आणि त्यांची कुलदेवता भवानीदेवी होती. कथांनुसार भवानीदेवीनेच त्यांना तलवार दिली होती. छत्रपती शिवराय नियमित साधना करत आणि त्यांच्या आई राजमाता जिजाबाईही शिवबांचे राज्य धर्मनिष्ठ अन् यशस्वी व्हावे; म्हणून तपश्चर्या करत होत्या. या आध्यात्मिक शक्तीमुळेच छत्रपती शिवरायांना विजय मिळत गेला. आजच्या कलियुगातही साधनेचे तितकेच महत्त्व आहे. काही आध्यात्मिक परंपरांनुसार असे म्हटले जाते, ‘कलियुगाच्या आताच्या काळातही एक चांगला परिवर्तनकाळ येईल आणि सत्ययुगाचा प्रारंभ होईल.’ त्या काळासाठी स्वतःची आध्यात्मिक सिद्धता करणे, साधना वाढवणे आणि दैवी गुण वाढवणे, हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. 


– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

२. संघटितपणा आणि साधना यांचे महत्त्व 

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

म्हणूनच सज्जन आणि साधक यांनी एकत्र रहाणे आणि संघटित रहाणे आवश्यक आहे. हे केवळ समाजासाठीच नाही, तर स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठीही महत्त्वाचे आहे. अनेक सज्जन कुटुंबे एकत्र राहून जर आसुरी प्रवृत्तींच्या विरोधात उभी राहिली, तरच त्यांच्यापासून संरक्षण मिळू शकते; कारण जसे बाहेर गुंडगिरी करणारे लोक दुर्बलांना त्रास देतात, तसेच आसुरी प्रवृत्तीही दुर्बल समाजावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर समाजात सज्जन आणि साधक यांची संख्या न्यून झाली अन् आसुरी प्रवृत्ती प्रबळ झाल्या, तर त्या सर्वांचीच हानी करतात. इतिहासातही आपण पहातो की, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अनेक हिंदूंना स्वतःची घरे सोडून पळून यावे लागले; पण भारतातून पळून जाण्यासाठी दुसरे कोणतेही हिंदु राष्ट्र नाही. त्यामुळे भारतियांनी साधना, नामस्मरण आणि धर्मपालन करूनच आसुरी प्रवृत्तीवर विजय मिळवण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

३. प्रत्येकात लढाऊ वृत्ती निर्माण होण्यासाठी आत्मशक्ती जागृत होण्यासह आध्यात्मिक सामर्थ्य हवे !

महाभारतातही अशीच परिस्थिती दिसते. त्या वेळी अर्जुनाला प्रश्न पडला, ‘आपलेच चुलत भाऊ असलेल्या कौरवांशी युद्ध का करावे ?’ आपण आजही बातम्यांमध्ये पहातो की, मुलाने वडिलांचा खून केला, वडिलांनी मुलाचा खून केला, भूमीच्या वादासाठी भावंडे एकमेकांना मारतात. हीच कौरवांसारखी आसुरी प्रवृत्ती आहे. दुर्योधनानेही पांडवांना संपवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. त्याने भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला. पांडवांचा वेगवेगळ्या प्रकारे नाश करण्याचे कट रचले. त्यांना वनवासाला पाठवले. द्रौपदीचा अपमान केला. द्युतामध्ये कपट करून पांडवांचे राज्य, संपत्ती सर्व काही जिंकून घेतले आणि त्यांना अज्ञातवासात पाठवले, जेणेकरून ते पुन्हा कधी राज्यावर परत येऊ शकणार नाहीत. या सर्व घटनांमधून कौरवांची आसुरी प्रवृत्ती स्पष्ट दिसून येते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, ‘सुर आणि असुर अशा २ प्रवृत्ती असतात अन् आणि आसुरी प्रवृत्तीचा नाशच करावा लागतो. स्वकीय असोत कि आप्तस्वकीय धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधर्म करणार्‍यांचा नाश करावा लागतो.’ यालाच ‘लढाऊवृत्ती’ किंवा ‘क्षात्रधर्म’ म्हणतात.

असे असले, तरी लढाऊ वृत्ती प्रत्येकामध्ये सहजपणे निर्माण होत नाही; कारण त्यासाठी आत्मशक्ती आणि आध्यात्मिक सामर्थ्य आवश्यक असते. जेव्हा माणूस साधना करतो, नामस्मरण करत रहातो आणि त्याची साधना एका विशिष्ट टप्प्यावर पोचते, तेव्हा त्याला परमेश्वराच्या काही अनुभूती येऊ लागतात. त्या अनुभूतींमुळे त्याला जाणवते की, देव स्वतःसमवेत आहे आणि तेव्हा माणसामध्ये अन्यायाविरुद्ध उभे रहाण्याची, त्याविरुद्ध बोलण्याची आणि विचार करण्याची शक्ती निर्माण होते; कारण आसुरी प्रवृत्ती अनेकदा अत्यंत शक्तीशाली असतात. त्यांच्याविरुद्ध उभे रहाण्यासाठी केवळ बाह्य शक्ती पुरेशी नसते, तर देवत्व आणि आत्मशक्तीही आवश्यक असते. जर माणसामध्ये ते देवत्व जागृत नसेल, तर त्याच्याकडे त्या अन्यायाविरुद्ध उभे रहाण्याचे धाडसही होत नाही. ही आत्मशक्ती साधनेतूनच निर्माण होते.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

५. माणसाला चुकीच्या गोष्टींचा परिणाम वा पापांची जाणीव नसणे आणि साधनेमुळे होणारे परिवर्तन !

आजच्या काळात आपण पहातो की, अनेक ठिकाणी फसवणूक, कपट आणि लोभ वाढलेला आहे. व्यापारामध्ये लोकांची फसवणूक करणे, निकृष्ट दर्जाचे उत्पादन देणे किंवा कुठल्याही मार्गाने पैसे कमावणे, हे अनेकांना चुकीचे वाटेनासे झाले आहे; कारण कलियुगात पैशालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. ‘चांदी, सोने, समभाग (शेअर्स) किंवा इतर मार्गांनी कसेही करून पैसा मिळवायचा, लोकांना लुबाडायचे, असे करण्यामध्ये काहीही गैर नाही’, असे अनेकांना वाटू लागले आहे. अशा वेळी अनेकांना हेही लक्षात येत नाही की, आपण पाप करत आहोत आणि त्याची फळे पुढील अनेक जन्मांमध्ये भोगावी लागू शकतात. त्या पापांचे परिणाम किंवा यातनामय अवस्था आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत; म्हणूनही माणूस त्या भीतीकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी असे वाटते की, जर त्या दुःखी परिणामांची जाणीव लोकांना स्पष्टपणे झाली असती, तर कदाचित् ते चुकीची कामे करण्यापासून थांबले असते. असे असले, तरी यात एक सकारात्मक भागही आहे. साधना केल्यावर माणसाला एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. साधनेचा तो आनंद एकदा अनुभवला की, माणूस हळूहळू चुकीच्या मार्गाकडे वळत नाही.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

भाग २३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020953.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक