कलियुगात सत्त्व गुण न्यून होऊन दुष्प्रवृत्तींपासून रक्षण होण्यासाठी साधना आवश्यक !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

आजचा आपला विषय आहे, ‘देव, देवता आणि असुर यांच्यातील युद्ध.’ हा विषय केवळ पुराणांपुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाचे जीवन आणि अंतर्मन यांच्याशी संबंधित आहे. आपल्याला शिकवले आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितकेच साधनेचे मार्ग’; कारण प्रत्येक मनुष्य जन्माला येतांना स्वतःसमवेत संचित आणि प्रारब्ध कर्म यांची शिदोरी घेऊन येतो. मागील जन्मातील कर्मानुसार त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत वा कुटुंबात जन्म मिळतो.

(भाग २१) 

भाग २० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1013423.html

१. व्यक्तीमध्ये असलेले त्रिगुण आणि गुणधर्म यांवरून असलेले गणस्वरूप

आपल्या शास्त्रांनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘सत्त्व’, ‘रज’ आणि ‘तम’ हे ३ गुण असतात. ज्यांच्यामध्ये सत्त्वगुण अधिक असतो, ते स्वभावतः सात्त्विक असतात आणि त्यांना साधना, अध्यात्म किंवा ईश्वरभक्ती आवडते अन् त्यांना त्याविषयी सहज समजते. अनेकदा त्यांचा जन्मही सात्त्विक संस्कार असलेल्या कुटुंबात होतो. रजोगुणी प्रवृत्तीचे लोक क्रियाशील असतात. शौर्य, व्यापार, क्रीडा किंवा कर्मप्रधान क्षेत्र यांमध्ये त्यांची प्रवृत्ती दिसते, तर तमोगुणी प्रवृत्तीमध्ये अज्ञान, हिंसा किंवा स्वार्थप्रधान वृत्ती अधिक दिसून येते. आपल्या पुराणांमधील अनेक संदर्भांमध्ये अशा प्रवृत्तींचे वर्णन आढळते.

जसे आपण म्हणतो, ‘किती गंगाजळी साठवली ?’, म्हणजेच प्रत्येक मनुष्य जन्माला येतांना पूर्वकर्मांची एकप्रकारची खात्यातील शिल्लक घेऊन येतो. या गुणधर्मांवरूनच काही प्रवृत्ती देवस्वरूप, काही मनुष्यस्वरूप, तर काही आसुरी स्वरूपाच्या दिसून येतात. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये देव, मनुष्य आणि राक्षस अशा ३ प्रवृत्तींचा उल्लेख केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याचे देव, मनुष्य आणि राक्षस असे ३ गण सांगितलेले आहेत. देवप्रवृत्ती, म्हणजे सात्त्विकता, साधना आणि इतरांच्या हिताचा विचार. मनुष्यप्रवृत्ती ही मध्यम स्वरूपाची जिथे चांगल्या-वाईटाचा संघर्ष चालू असतो, तर आसुरी प्रवृत्ती स्वार्थ, अहंकार आणि विध्वंस यांकडे झुकणारी असते. विशेष म्हणजे मनुष्याला साधनेच्या माध्यमातून देवत्वाकडे जाण्याची संधी असते; पण साधना सोडली, तर त्याचे अधःपतन होऊन तो आसुरी प्रवृत्तींकडेही जाऊ शकतो. म्हणूनच साधना ही अत्यंत आवश्यक आहे.

२. युगांनुसार सात्त्विकतेचे प्रमाण न्यून होणे

हे समजण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ. जसे नवीन तांब्याचे किंवा पितळेचे भांडे प्रारंभीला पुष्कळ चमकत असते; पण कालांतराने त्यावर ऑक्सिजनचा परिणाम होऊन ते काळे पडायला लागते. जर ते वेळोवेळी घासले नाही, तर त्याची मूळ चमक हरवते; पण ‘पितांबरी’सारख्या उत्पादनाने ते घासले, तर ते पुन्हा नव्यासारखे चमकू लागते. मानवी स्वभावाचेही असेच आहे. जर साधना केली नाही, तर मनावर नकारात्मक संस्कारांचे थर जमा होऊ लागतात. युगांच्या प्रवाहातही हीच प्रक्रिया दिसते. सत्ययुगात सात्त्विकता सर्वाधिक होती. त्यानंतर त्रेतायुग, द्वापर आणि शेवटी कलियुग आले. प्रत्येक युगानुरूप सात्त्विकतेचे प्रमाण न्यून होत गेले. आजच्या कलियुगात तमोगुणाचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक संतांनी सांगितले आहे.

३. सकारात्मक किंवा नकारात्मक पदार्थ अथवा वस्तू यांवरून होणारा परिणाम

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

मनुष्य, म्हणजेच आपण सतत अनेक माध्यमांमधून प्रभावित होत असतो. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की, काही पदार्थांमधून ‘रेडिएशन’ (किरणोत्सर्ग) बाहेर पडत असते. अणू किंवा ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ जसे की, युरेनियम यांतून अल्फा, बीटा आणि गॅमा किरणे बाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे उष्ण वस्तूमधून उष्णतेच्या लहरी, तर बर्फासारख्या थंड वस्तूमधून थंड लहरी बाहेर पडत असतात. याच तत्त्वाप्रमाणे प्रत्येक माणसामधूनही काही स्पंदने बाहेर पडत असतात, तसेच आपण ऐकतो ती काही नकारात्मक (निगेटिव्ह) गाणी, काही चित्रपट किंवा काही चित्रे उदाहरणार्थ राक्षसांच्या चित्रांमधून राक्षसी किंवा नकारात्मक स्पंदने, तर देवतांच्या चित्रांमधून देवतांची, म्हणजेच सकारात्मक / सात्त्विक स्पंदने बाहेर पडत असतात. हा मोठा सिद्धांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितला.

४. नकारात्मक वातावरणाचा शरिरावर होणारा परिणाम आणि साधनेने निर्माण होणारे संरक्षणकवच

आजच्या काळात पाहिले, तर नकारात्मक गोष्टींचे प्रमाण तुलनेने अधिक आहे आणि त्या स्पंदनांचा आपल्यावर परिणाम होतोच. तुम्ही नामस्मरण केले, तर हा प्रभाव न्यून होतो आणि ते नाही केले, तर हा प्रभाव वाढतो. याची तुलना आपण वातावरणाशी करू शकतो. जसे आपण म्हणतो की, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. अशा वेळी आपण जेव्हा श्वास घेतो, तेव्हा ऑक्सिजनसह अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईडही आपल्या शरिरात जातो. त्यामुळे फुफ्फुसे आणि शरिरातील पेशी यांमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे वेगवेगळे आजार आणि व्याधी निर्माण होतात. म्हणूनच लोकांना सकाळी चालायला जाण्याचा सल्ला दिला जातो किंवा कोकणासारख्या अथवा ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी जाणे लाभदायी ठरते. तिथे निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध हवा मिळते आणि शरिराला नैसर्गिकरीत्या ताजेपणा मिळतो.

याचप्रमाणे आपण सतत अनेक माध्यमांमधून प्रभावित होत असतो, जसे की, ऑक्सिजन, दूषित पाणी, कार्बन डायऑक्साईड यांच्या माध्यमातून. यासह आपल्या शरिराभोवती मनाचे एक सूक्ष्म आवरण असते, ज्याला ‘ऑरा’ (प्रभावळ) म्हणतात. बाहेरच्या स्पंदनांचा यावर परिणाम होत असल्यामुळे नामस्मरण किंवा साधना यांच्यामुळे मनुष्य स्वतःभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करू शकतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत, तसेच सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेत यांवर उपाय सांगितले आहेत. दिवसभरात शरिरावर मळ, घाम आणि धूळ साचलेली असते. त्या सगळ्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते; पण जेव्हा आपण अंघोळ करतो, तेव्हा तो सगळा मळ, घाम आणि धूळ निघून जाते. त्वचेवर चिकटलेल्या त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी दूर होतात. त्वचेची जी सूक्ष्म रंध्रे असतात, ती पुन्हा मोकळी होतात आणि म्हणूनच अंघोळ केल्यानंतर आपल्याला हलके, ताजेतवाने अन् उत्साही वाटते. याखेरीज काही संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरांवरील उपायांमध्ये भीमसेनी कापूर, सुगंधी द्रव्ये, खडे मीठ घातलेल्या पाण्याचे उपाय, स्वतःभोवती सात्त्विक उदबत्ती फिरवून नकारात्मक शक्तींचे आवरण काढणे, या उपायांमुळे आपण स्वतःभोवती एक सकारात्मक संरक्षणकवच सिद्ध करू शकतो, तसेच यामुळे मन आणि वातावरण शुद्ध होण्यास साहाय्य होऊ शकते.

५. कलियुगात नामसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व

स्वतःच्या स्वभावदोषांमधूनही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू आणि अहंकार निर्माण होतो. या षड्रिपूंपासून मनामध्ये एकप्रकारची लोभाची किंवा स्पर्धेची वृत्ती निर्माण होते. आज आपण पहातोच की, सर्वत्र पैसे मिळवण्याची एक स्पर्धा चालू आहे; परंतु प्रारब्ध पालटायचे असेल, तर त्यामध्ये शरीर, बुद्धी आणि आत्मा या ३ गोष्टी महत्त्वाच्या असतात. शरिराच्या माध्यमातून आपण कर्म करतो. मेहनत करून काम केले, तर त्याचा मोबदला म्हणून पैसे मिळतात. जर बुद्धीचा उपयोग करून काम केले, तर त्यापेक्षा उच्च दर्जाचे यश आणि मोबदला मिळू शकतो; पण जर नामस्मरण केले, तर त्याचा परिणाम आणखी खोलवर होतो. ते थेट प्रारब्धावर परिणाम करते. त्यामुळे माणसाला बौद्धिकदृष्ट्या चांगले विचार प्राप्त होतात आणि शारीरिकदृष्ट्याही कोणते काम कसे करायचे, याची योग्य क्षमता अन् दिशा मिळते; कारण नामस्मरणामुळे माणूस प्रत्येक समस्येच्या मुळापर्यंत पोचू शकतो. म्हणूनच या कलियुगात नामसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे म्हटले आहे. जसे चांगल्या हवामानात फिरणे, स्वच्छ पाणी किंवा शुद्ध पाणी (उदाहरणार्थ ॲक्वागार्डचे) पिणे शरिरासाठी आवश्यक आहे, तसेच नामस्मरण केल्याने आत्म्यावर साचलेले त्रासदायक आवरण सतत दूर होत रहाते.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

६. दुष्प्रवृत्तींपासून रक्षण होण्यासाठी नामस्मरण आवश्यक !

जसे दुर्जन किंवा कुख्यात गुंड टोळ्यांमध्ये गुंतलेले लोक दुसर्‍यांना लुटून किंवा मारून स्वतःचा लाभ करून घेतात, तसेच निसर्गातही आपण पहातो की, एक छोटासा डास किंवा वाघ, सिंह अथवा इतर काही प्राणी दुसर्‍यांना मारल्याविना स्वतःचे पोट भरू शकत नाहीत. त्याचप्रमाणे असुर किंवा इतर योनींमधील शक्तींनाही जगण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. जसा पैशांचा संचय असतो, तसेच साधनेमुळे पुण्यकर्माचा संचय होऊ शकतो. भौतिक संपत्ती श्रीमंतांकडे असते, तसेच माणसाकडे दैवी संपत्ती जसे की, सत्संग, साधना, सद्गुण असते. तीच संपत्ती हरण करण्याचा प्रयत्न या आसुरी शक्ती करतात. म्हणून स्वतःचे रक्षण करण्यासाठी देवाचे नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. देवतांचे नामस्मरण केल्याने साधकाला संरक्षण मिळते. मग ते हनुमान वा भगवान श्रीकृष्ण असोत. ‘रामरक्षे’तही याचा उल्लेख आहे, तसेच ‘शिव महिम्न स्तोत्रा’मध्ये भगवान शंकरांनी सांगितले आहे, ‘यज्ञामध्ये जो अग्नि आहे, तो मीच आहे. यज्ञ केल्यावर त्याचे फळ देणारा मीच आहे.’ यासह सर्व आसुरी प्रवृत्तींचा मूलाधार ‘तमोगुण’ आहे आणि त्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा शंकर आहे. त्यामुळे ‘ॐ नमः शिवाय’ किंवा हनुमानाचे नामस्मरण हे  विशेषतः कलियुगात महत्त्वाचे आणि सर्व दुष्ट शक्तींचा नाश करणारे मानले गेले आहे. पूर्वीपासूनच देव आणि असुर यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे; पण कलियुगामध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे. त्यामुळे असुरांपासून स्वतःचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे ठरतं.

७. आसुरी प्रवृत्तीचे स्वरूप आणि माणसाचे सर्व सुखांमध्ये होत असलेले स्वरूप

याच संदर्भात आपण भगवान श्रीकृष्णाचे उदाहरण पाहू शकतो. त्याच्या दृष्टीने आप्तस्वकीय असा कोणताही पक्षपात नव्हता, धर्मासाठी जे योग्य आहे तेच त्याने केले. पांडव धर्माने वागत होते, म्हणून भगवान श्रीकृष्ण सदैव त्यांच्या पाठीशी होता; पण कौरव अधर्माने वागत असल्याने श्रीकृष्णाने त्यांना नेहमीच उपदेशपर वागणूक दिली. त्याप्रमाणे इतिहासात आपण पहातो की, अनेक राज्यकर्ते हळूहळू सत्ता आणि पैसा मिळवत जातात अन् त्यांच्यामध्ये अहंकार प्रचंड वाढू लागतो. याचे एक उदाहरण म्हणजे ‘रावण’. ‘शिव महिम्न स्तोत्रा’मध्ये त्याचा उल्लेख आहे. रावण इतका प्रबळ का झाला ? कारण त्याने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कठोर तप केले. त्याने स्वतःची ९ शिरे कापून शंकराला अर्पण केली आणि त्या असह्य वेदना सहन केल्या. त्याच्या त्या तपश्चर्येमुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला प्रचंड अस्त्रशस्त्रे अन् शक्ती दिल्या. नंतर रावणाने वर मागून स्वतःची सर्व डोकी पुन्हा प्राप्त केली; पण त्या शक्तीमुळे त्याच्यात प्रचंड अहंकार निर्माण झाला. इतका की, त्याने कैलास पर्वतच उचलून लंकेत नेण्याचा विचार केला. ज्या देवाची त्याने उपासना केली, ज्यांनी त्याला वरदान दिले, त्यांच्याच पर्वताला उचलण्याचा गर्व त्याने केला. तेव्हा भगवान शंकरांनी केवळ पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबला आणि त्या दाबामुळे रावण सप्तपाताळात गेला. नंतर त्याने दयायाचना केली, तेव्हा कसाबसा तो वाचला आणि तेथून परत पळून गेला.

राक्षसांची प्रवृत्ती अशी असते की, ज्या देवतांनी त्यांना शक्ती दिली, त्यांच्याच विरोधात ते उभे रहातात. त्रिपुरासुर असो किंवा भस्मासुर आणि अन्य असुर यांनी कठोर तपश्चर्या करून देवांकडून वरदान अन् शक्ती प्राप्त केल्या; पण नंतर त्या शक्तींचाच उपयोग देवता आणि जग यांच्यावर अत्याचार करण्यासाठी केला. पुराणांमध्ये अशा अनेक कथा सांगितल्या आहेत, ज्यामध्ये आसुरी प्रवृत्तीचे हे स्वरूप स्पष्ट दिसून येते. माणसामध्येही कधी कधी अशी आसुरी प्रवृत्ती निर्माण होते. जेव्हा माणसाला संपत्ती, सत्ता आणि सुख मिळू लागते, तेव्हा तो अनेकदा देव अन् धर्म यांचे स्मरण विसरतो. त्या क्षणी त्याचे वाईट रूप प्रकट होते आणि तेच आसुरी प्रवृत्तीचे स्वरूप मानले जाते.

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग २२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1018590.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक