‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करत उद्योजकतेसह साधना करून आनंदाची अवस्था अनुभवा !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

देव, देवता आणि असुर यांच्यातील युद्ध, हा विषय केवळ पुराणांपुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाचे जीवन आणि अंतर्मन यांच्याशी संबंधित आहे. आपल्याला शिकवले आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढेच साधनेचे मार्ग’; कारण प्रत्येक मनुष्य जन्माला येतांना स्वतःसमवेत संचित आणि प्रारब्ध कर्म यांची शिदोरी घेऊन येतो. मागील जन्मातील कर्मानुसार त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत वा कुटुंबात जन्म मिळतो. 

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कलियुगात नामसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व अन् आसुरी प्रवृत्तीचे स्वरूप, माणसाचे सर्व सुखांमध्ये होत असलेले स्वरूप, संघटितपणा आणि साधना यांचे महत्त्व, तसेच संघटन, शौर्य अन् साधना यांचे उत्कृष्ट उदाहरण छत्रपती शिवराय’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा आणि या लेखमालिकेचा अंतिम भाग येथे देत आहोत.                                       

(भाग २३)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’, ठाणे.

भाग २२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1018590.html

१. मनुष्याचा देवत्वाकडे जाण्याचा मार्ग केवळ साधनेतूनच !

दुष्प्रवृत्तीची माणसे अशी का वागतात ? याचे कारण, म्हणजे त्यांची प्रवृत्तीच दुष्ट असते; परंतु हेही तितकेच खरे आहे की, सज्जन माणूसही कधी दुष्प्रवृत्तीचा होऊ शकतो. इतिहासात याउलट उदाहरणही दिसते. जसा वाल्या कोळी ‘राम’, ‘राम’ म्हणत म्हणत पुढे महर्षि वाल्मीकि झाले, म्हणजे मनुष्यामध्ये पालट होऊ शकतो; परंतु अशी उदाहरणे अत्यल्प असतात. प्रत्यक्षात पाहिले, तर सज्जन माणसांचे दुर्जन होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते; कारण मनुष्याला आपल्या प्रवृत्तीवर सतत नियंत्रण ठेवावे लागते.

मनुष्याचा देवत्वाकडे जाण्याचा मार्ग हा साधनेतूनच शक्य होतो. म्हणूनच या कलियुगात आपण चुकीच्या प्रवृत्तीकडे न वळता सत्प्रवृत्तीमध्ये राहून स्वतःची आध्यात्मिक उन्नती साधली पाहिजे आणि या जन्म-मरणाच्या चक्रांतून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; कारण पुन्हा जन्म मिळाला आणि वाईट संगती मिळाली, तर माणूस पुन्हा घसरू शकतो. मग पुन्हा तेच दुःख, संघर्ष आणि आयुष्यातील कठीण प्रसंग भोगावे लागू शकतात. म्हणून जीवनात सत्संग मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा जन्मापासून तेच शिक्षण, परीक्षा, स्पर्धा, संघर्ष, प्रवास, धावपळ हे सगळे आयुष्य पुन्हा जगावे लागते. त्यातही आयुष्यात अनेक अनिश्चितता असतात, नाती कशी असतील, कुटुंब कसे असेल, आयुष्य कोणत्या परिस्थितीत जाईल, हे काही सांगता येत नाही. आजूबाजूचे नातेवाईक किंवा समाज यांच्याकडे पाहिले, तर अनेक प्रकारची दुःखे, समस्या आणि गुंतागुंत दिसते. हे पाहिल्यावर जाणवते की, आपण सध्या किती सुखात आहोत. म्हणूनच हे समजल्यावर साधनेचे महत्त्व अधिक स्पष्ट होते.

२. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार आणि चारही वर्णांनुसार साधना करावी !

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

आपल्याला सनातन संस्थेचा इतका मौल्यवान आध्यात्मिक वारसा मिळालेला आहे; पण पुढील जन्मात तो मिळेलच, याची खात्री नाही. त्यामुळे याच जन्मात साधना करून आध्यात्मिक प्रगती करून पुढे कसे जाता येईल, याचा विचार करून त्या मार्गावर दृढपणे चालणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यामुळे साधना पुन्हा चालू करणे आणि ती वाढवत नेणे, सांगितलेले नामजप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यापारी आणि समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांनी स्वतःच्या सामर्थ्यानुसार साधनेत सहभाग घ्यावा. ज्यांच्याकडे अधिक शारीरिक शक्ती आहे; पण पैसा अल्प आहे, त्यांनी शरिराने सेवा करून साधना करावी. ज्यांच्याकडे बुद्धीची शक्ती आहे, त्यांनी सत्संग घेऊन किंवा बौद्धिक मार्गाने अधिकाधिक लोकांपर्यंत सनातन संस्थेचा साधना करण्याविषयी संदेश आणि साधनेचा मार्ग पोचवावा. ज्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य आहे, त्यांनी उदारपणे धन अर्पण करून या कार्यात योगदान द्यावे, म्हणजेच ज्यांच्याकडे पैसे अधिक आहेत, त्यांनी धनाचा त्याग करून त्यानंतर बुद्धी आणि श्रम द्यावेत. ज्यांच्याकडे श्रमशक्ती आहे, त्यांनी अधिक श्रम, थोडी बुद्धी आणि शक्य तितके पैसे अर्पण करावेत. अशा प्रकारे ‘ज्याच्याकडे जे अधिक आहे, ते साधनेच्या कार्यासाठी अर्पण करणे, हीच खरी साधना आहे’; कारण ‘चारही वर्णांची साधना केली की, मोक्षप्राप्ती होते’, असे सांगितले जाते. स्वतः भगवान श्रीकृष्णानेही चारही वर्णांची साधना केली होती. त्यामुळे आपणही त्या चारही वर्णांच्या साधनेचा अवलंब करायला हवा. आपण अशा प्रकारे साधना करत गेलो की, आपल्या आयुष्यातील पालटही स्पष्टपणे जाणवतो.

३. साधना करून परमानंदाच्या अवस्थेपर्यंत पोचणे, हेच साधनेचे अंतिम ध्येय !

आपण अनुभवतो की, मागील मासापेक्षा पुढचा मास अधिक आनंदात जातो, कालच्या दिवसापेक्षा पुढचा दिवस अधिक चांगला वाटतो. असे कधीच होत नाही की, नामस्मरण करून माणसाची हानी होते. उलट भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्तांचा नाश होत नाही.’ याचा अर्थ असा नाही की, दुष्प्रवृत्ती त्रास देणार नाहीत; पण देव त्याच्या भक्ताचे रक्षण करत असतो, हे आपण अनेक संतांच्या जीवनातून हे पाहिले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या उच्च कोटी संतांच्या जीवनात अनेक प्रसंग आले; पण प्रत्येक वेळी पांडुरंगाने (ईश्वराने) त्यांचे रक्षण केले. त्यांनी हाक मारली की, देव त्यांच्या साहाय्याला धावून येत असे. आजही ती दैवी शक्ती अस्तित्वात आहे. भेद इतकाच आहे की, ती अनुभूती आपल्याला साधनेच्या माध्यमातून घ्यावी लागते. साधना करत राहिलो, तरच ती आनंदाची अवस्था आपल्याला अनुभवता येते आणि त्या परमानंदाच्या अवस्थेपर्यंत पोचणे, हेच साधनेचे अंतिम ध्येय आहे.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

४. लेखमाला सांगतेच्या निमित्ताने कृतज्ञता !

‘उद्योग ही साधनाच’ या लेखमालेचा समारोप होत आहे. या लेखमालेतून उद्योजकतेसह आध्यात्मिक साधनेचे महत्त्व निश्चितच अधोरेखित झाले असेल, अशी आशा व्यक्त करतो, तसेच ‘सर्वांना ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्याची शक्ती मिळो आणि त्यातून सर्वांना आनंद, चैतन्य अन् यश यांची प्राप्ती होवो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच या लेखमालेचे विचार माझ्या मनामध्ये आणले आणि ही सेवा माझ्या हस्ते करून घेतली. त्यांनीच दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करण्याची संधी मला दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून नतमस्तक होतो, तसेच ‘सनातन प्रभात’च्या संपादकीय विभागासह सर्व संत, सद्गुरु आणि साधक यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

(लेखमाला समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक